"डास चावल्यामुळे मृत्यू झाल्यास तो अपघाती मृत्यू होतो का ? काय म्हणाले मा. सर्वोच्च न्यायालय. - ऍड. रोहित एरंडे©

*"डास चावल्यामुळे  मृत्यू झाल्यास तो अपघाती मृत्यू , समजायचा का ?* 
*काय म्हणाले मा. सर्वोच्च न्यायालय ?*

*ऍड. रोहित एरंडे*©

डास चावल्यामुळे मलेरिया होऊन एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास असा मृत्यू अपघाती मृत्यू संबोधायचा का नाही असा प्रश्न राष्ट्रीय ग्राहक आयोगा पुढे . नॅशनल इन्शुरन्स कं . वि . श्रीमती. मौसमी भट्टाचार्जी (रिव्ही . पेटि . क्र. १२७०/२०१६) उपस्थित झाला होता आणि त्या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर देऊन आयोगाने इन्शुरन्स कंपनीला चांगलेच फटकारले होते. मात्र ह्या निकालाविरोधात इन्शुरन्स कंपनीने मा. सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते (सिव्हिल अपील क्र . २६१४/२०१९) आणि मा. सर्वोच्च न्यायालयाच्या  मा. न्या. धनंजय चंद्रचूड आणि मा. न्या. हेमंत गुप्ता ह्यांच्या खंडपीठाने ग्राहक आयोगाचा निर्णय रद्द करून इन्शुरन्स कंपनीला चांगलाच दिलासा  दिला. 

ह्या केस ची थोडक्यात हकीकत बघूयात.  श्रीमती. मौसमी भट्टाचार्जी यांचे पती श्री. देबाशिष यांनी बँक ऑफ बरोडा कडून गृह कर्ज घेतले होते आणि त्याच बरोबर त्यांनी "बँक ऑफ बरोडा कर्ज सुरक्षा बिमा " हि अपीलकर्त्या इन्शुरन्स कंपनीची  पॉलीसी देखील घेतली होती. ह्या पॉलीसी प्रमाणे जर विमा धारकाचा 'अपघाती मृत्यू झाला' तरच  त्यास विम्याची रक्क्म मिळणार होती. 

दरम्यानच्या काळात श्री. देबाशिष ह्यांना मलेरिया झाला आणि त्या दुखण्यातच त्यांचे हॉस्पटिल मध्ये निधन झाले. त्यामुळे त्यांच्या वारसांनी इन्शुरन्स कंपनी कडे विम्याच्या रकमेकरिता क्लेम दाखल केला. मात्र इन्शुरन्स कंपनिने क्लेम फेटाळून लावताना असे नमूद केले की विमाधारकाचा  मृत्यू हा  डास चावल्यामुळे झाला असून कुठल्याही अपघातामुळे झालेला नाही. डासा मुळे होणारा  मलेरिया हा आजार किंवा  रोग असून अपघात  नाही आणि त्यामुळे विम्याची रक्कम देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. मात्र इन्शुरन्स कंपनी विरुद्ध विमा धारकाच्या वारसांनी जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार केली आणि जिल्हा ग्राहक मंचाने इन्शुरन्स कंपनीचे म्हणणे फेटाळून लावले. त्याच्या विरुद्ध दाखल केलेले अपील देखील राज्य ग्राहक आयोगाने फेटाळून लावले आणि प्रकरण राष्ट्रीय आयोगाकडे पोहोचले. राष्ट्रीय  ग्राहक मंचाने देखील इन्शुरन्स कंपनी च्या विरुद्ध निकाल देताना खालील  दोन्ही निकालांवर शिक्कामोर्तब केले. संबंधित पॉलीसी मध्ये " कोणकोणत्या अपघतामध्ये मृत्यु झाल्यास विमा रक्कम मिळेल आणि कोणत्या नाही याची यादी दिली होती, परंतु "अपघात" ह्या शब्दाची व्याख्या काही केली नव्हती. राष्ट्रीय मंचाने पुढे नमूद केले कि संपूर्ण केस ही "अपघात" ह्या एका शब्द भोवती फिरत आहे. "एखादी घटना अनपेक्षितपणे आणि कोणतीही पूर्वसूचना ध्यांनीमनी नसताना घडणे आणि त्यामुळे नुकसान होते, म्हणजे अपघात" अशी व्याख्या मंचाने केली.  ऑक्सफर्ड शद्बकोषतील व्याख्येचा आधार घेऊन मंचाने पुढे नमूद केले एखाद्या व्यक्तीस डास  कधी चावेल ह्याची पूर्व  कल्पना असणे अशक्य असते आणि ती एक अपघातासारखीच अचानक पणे  घडणारी घटना आहे. 
मात्र मा. सर्वोच्च न्यायालायने अपघात म्हणजे काय ह्याचा विस्तृत उहापोह करताना आपल्याच पूर्वीच्या काही निकालांचा आधार घेतला, पण त्याचप्रमाणे  "अपघाताच्या व्याख्येमध्ये आजाराचा/रोगाचा अंतर्भाव होऊ शकत नाही" असे नमूद केलेल्या  बेकर-वेलफोर्ड सारख्या पाश्चात्य  शब्दकोशांचा तसेच न्यायनिर्णयांचा देखील आधार घेतला. "अपघात आणि आजार ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अपघातामध्ये हिंसा किंवा  एखादी अघटित घटना किंवा मानवी शक्तीच्या आकलनापडील काही घटकांचा समावेश बहुतांशीवेळा असतो. एखाद्या कृतीमुळे /कारणामुळे जेव्हा माहिती असते कि काही आजार होणार, तेव्हा त्यांना अपघात म्हणता येणार नाही. त्यामुळे बोटीवर  काम करीत असलेल्या खलाशाला उष्माघात होणे हा काही अपघात म्हटला जाऊ  शकत नाही" . 
तसेच "अतिश्रमामुळे  शरीरातील मांसपेशी तुटणे म्हणजे अपघात नाही" ह्या ब्रिटिश निकालांचा कोर्टाने आधार घेतला. "एखादी व्यक्तीला फ्लु झाला तर ती व्यक्ती  मला अपघात झाला असे म्हणत नाही. जिवाणू-विषाणूंमुळे होणारे आजार म्हणजे काही अपघात नाही, सबब असुरक्षित शारीरिक संबंधांतून जोडीदाराला नागीण होऊन पुढे पक्षाघाताचा आजार झाला, हि घटना अपघात होऊ शकत नाही" ह्या २००९ सालच्या कॅनेडिअन सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा देखील कोर्टाने आधार घेतला. 
*एखाद्या व्यक्तीला जिवाणू-विषाणुंमुळे आजार झाला हे अपघातासारखे कोणतीही पूर्वसूचना न देता घडणारी घटना नाही, तर ती एक नैसर्गिक घटना आहे आणि प्रत्येकाच्या शारीरिक क्षमतेवर देखील ती अवलंबून आहे*, सबब जरी एखादा आजार फैलावला तरी त्या भागातील प्रत्येक व्यक्तीला तो होईलच असेही नाही. एखाद्या व्यक्तीला ताप येणे किंवा व्हायरल आजार होणे ह्या अचानक होणाऱ्या घटना असल्या तरी त्या व्यक्तींना अपघात झाला असे अजिबात म्हणता येणार नाही  असे कोर्टाने पुढे नमूद केले 
*"डास कधी चावेल हे सांगता येत नाही, म्हणूनच ती अपघातासारखी अचानक घडणारी घटना असते" हि राष्ट्रीय आयोगाने दिलेली मिमांसा खेदपूर्वक फेटाळताना सर्वोच्च न्यायालायने नमूद केले की मयत व्यक्तीही मोझॅम्बई ह्या आफ्रिकन देशामध्ये राहत होती. ह्या देशामध्ये मलेरियाचे प्रमाण इतके प्रचंड आहे की दर ३ व्यक्तींमागे एक व्यक्तीला मलेरिया झालेला असतो, त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या आजाराला अपघात कसे म्हणता येईल ?* अशा कुठलाहि आजार पॉलिसीमध्ये कव्हर केलेला नव्हता आणि त्यामुळे ग्राहक आयोगाचा निकाल चुकीचा आहे. मात्र इन्शुरन्स क्लेमचे पैसे आधीच दिलेले आहेत हे कळल्यावर मात्र असे पैसे परत इन्शुरन्स कंपनीने वसूल करू नयेत असा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने शेवटी दिला. सर्वोच्च न्यायालायने नमूद केले कि 

हा निकाल खूप महत्वाचा आहे आणी आपल्या  सगळ्यांचे डोळे उघडणारा आहे.  *विमा पॉलीसी घेणेसाठी तज्ज्ञ व्यक्तिचा सल्ला अवश्य घ्यावा कारण लोकांची आजही आयुर्विमा आणि वैद्यकीय विमा ह्यामध्ये गल्लत होते.*

*तुमच्या पॉलिसीमध्ये मलेरियाचा समावेश असेल तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळू शकते.   त्यामुळे   पॉलीसी आणि पॉलीसीच्या अटी  आणि शर्ती ह्यावर खूप काही अवलंबून असतेमी हे लक्षात ठेवावे .  असो. 
*आपल्यापैकी अनेकांना हा लेख  वाचून  आजवर असे कित्येक 'अपघात' आपण परतावून  लावले आहेत ह्याचा अभिमान न वाटला तरच नवल*. 😊


*Adv.  रोहित एरंडे*. 
*पुणे ,  ©*

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©