डॉक्टर वाचले तरच आपण वाचू, हे लोकांना कधी समजणार ? ऍड. रोहित एरंडे ©

डॉक्टर वाचले तरच आपण वाचू, हे लोकांना कधी समजणार ?

ऍड. रोहित एरंडे © 

प्रसांग १ - "बोलठाण, नाशिक येथील बालरोगतज्ञाला १२ टाके पडेस्तोपर्यंत मारहाण, कारण काय तर त्याने दिलेल्या औषधाने लहान बाळाला थोडी झोप आली. प्रसंग -२ : कोरोना उपचार करणाऱ्या  मालेगाव येथील  एका डॉक्टरला, आमदाराचा . फोन घेतला नाही म्हणून मारहाण.. 

एकीकडॆ कोरोना जागतिक महामारीमध्ये सरकार बरोबर सर्वात पुढे होऊन डॉक्टर आणि त्यांचे सहकारी जीवाचे रान करीत आहेत आणि दुसरीकडे  असे कृतघ्नपणाचे प्रकार घडत आहेत. डॉक्टरांवरील हल्ल्याच्या या  लागोपाठ घडल्यामुळे वैद्यकीय विश्वात खळबळ उडाली आहे. भारतामधील खूप कमी डॉक्टर असे असतील ज्यांना कधी अश्या प्रकारच्या प्रसंगांना सामोरे जायला नसेल. 
एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते की इतर कुठल्याही प्रोफेशन पेक्षा डॉक्टरांना देवाचे दुसरे रूप म्हणून ओळखले जाते आणि इथे भक्तांची गल्लत होते.  डॉक्टर जर का देव असेल, तर  त्याची विटंबना (हल्ला )करू नका....आणि...डॉक्टर जर का देव नसेल तर, त्याच्या मर्यादा ओळखा...

 डॉक्‍टर, रुग्णालये यांच्यावर होणाऱया अश्या  हल्ल्याच्या प्रमाणामध्ये देशभर मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते . जर आता डॉक्‍टरांचे अशा हल्ल्यांपासून रक्षण केले नाही, तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. समजा डॉक्टरांनी ह्या कठीण परिस्थितीमध्ये उपचार करण्यास नकार दिला तर ?

वैद्यकशास्त्रामध्ये रोज काही ना काही नवीन शोध लागत असतात. त्याची व्याप्ती प्रचंड आहे, त्यामुळेच वैद्यकशास्त्र हे सतत विकसित होत असलेले शास्त्र आहे.  .‘व्यक्ती तितक्‍या प्रकृती’ असल्याने उपचारांचा परिणामही वेगवेगळा ठरतो. एखाद्या आजारावर उपचार करण्याच्या वेगवेगळ्या; पण मान्यताप्राप्त व वर्षानुवर्षे वापरलेल्या पद्धती असतात. प्रत्येक उपचार पद्धतीला त्याचे फायदे-तोटे असतात, त्यामुळे संबंधित तज्ज्ञ डॉक्‍टरांनी त्यांच्या ज्ञानाचा व कौशल्याचा पुरेपूर उपयोग करूनदेखील जर दुर्दैवाने उपचारास यश आले नाही तर त्याचा दोष डॉक्‍टरांना देता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने अनेक निकालांमध्ये स्पष्ट केले आहे. कोणत्याही डॉक्टरला आपला पेशंट मरावा असे वाटणार  नाही.

त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने   निष्काळजीपणापोटी डॉक्‍टरांवर दाखल होणाऱ्या खोट्या गुन्ह्यांबद्दलही  असे म्हटले आहे, की जर प्रत्येकवेळी असे गुन्हे दाखल व्हायला लागले तर डॉक्‍टरांना त्यांच्या ज्ञानाचा उपयोग समाजाकरिता करणे अवघड होऊन बसेल व अशाने समाजाचेच प्रचंड नुकसान होईल.  हे विधान डॉक्‍टरांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबतदेखील तंतोतंत लागू पडेल.एखाद्या रुग्णाने उपचारास प्रतिसाद दिला नाही किंवा दुसरीकडे उपचार नीट होऊ शकतील असा सल्ला दिला  तर यात डॉक्‍टरांची चूक कशी असू शकेल, याचा विचार न करता एकदम जाऊन डॉक्‍टरांना बेदम मारायचे, हॉस्पिटलची मोडतोड करायची, यातून काहीच साध्य होत नाही. उलट डॉक्‍टरांना रुग्णाबद्दल वाटणारी आपुलकी कमी होते. हे रुग्णांसाठी जास्त धोकादायक आहे.

आपण बेफाम पणे गाडी चालवायची आणि जबर जखमी होऊन परिस्थिती हाताबाहेर गेली, किंवा डॉक्टरांनी दारू पिऊ नका असे सांगितले तरी खूप प्यायची आणि मग किडन्या - लिव्हर निकामी झाली कि त्या परत उत्तम व्हाव्यात म्हणून डॉक्टरांकडे जायचे किंवा रिपोर्ट मध्ये शुगर कमी दिसावी म्हणून फक्त 2 दिवस अजिबातच गोड खायचे नाही आणि मग शुगर कमी होत नाही म्हणून शेवटी बोंब मारायची आणि ह्या सर्व प्रकारात गुण आला नाही म्हणून शेवटी डॉक्टरांनाच मारायचे, असे काहीसे प्रकार घडत असतात..

याचा अर्थ डॉक्‍टरविरुद्ध काहीच कारवाई करता येत नाही का? कुठलयही व्यासायिकांपेक्षा डॉक्टरांविरुद्ध दाखल होणाऱ्या केसेसचे प्रमाण खूप आहे. अप प्रवृत्ती ह्याही व्यवसायात आहेतच की. वैद्यकीय निष्काळजीपणाच्या खटल्यांत आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने संयत निर्णय दिलेले आहेत. योग्य तेथे १२ कोटी रुपयांची नुकसानभरपाईही रुग्णाला दिलेली आहे; तर त्याचबरोबर फौजदारी कारवाईचे निकषदेखील घालून दिलेले आहेत. उजव्या हाता ऐवजी डाव्याच हाताचे  ऑपेरेशन  केले, एखाद्या शाखेचे ज्ञान नसतानादेखील त्या शाखेसंदर्भात उपचार केले, ऑपरेशन नंतर पोटात कापसाचा गोळा विसरणे अशा प्रकरणांत डॉक्‍टरांना न्यायालयाने जबर दंड अथवा शिक्षा केलेल्या आहेत.

जर एखाद्या रुग्णास वाटले, की डॉक्‍टर निष्काळजीपणे वागले असतील तर संबंधित डॉक्‍टरांविरुद्ध कायद्याच्या चौकटीत राहून दिवाणी तसेच फौजदारी तक्रार दाखल करता येते. असे असूनसुद्धा दंडेलशाहीच्या जोरावर डॉक्‍टरांना लक्ष्य करण्याच्या प्रकारामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे डॉक्‍टरांच्यात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याकरिता आता केंद्रीय स्तरावरच डॉक्‍टर संरक्षण कायदा   आणणे गरजेचे आहे. याकरिता डॉक्‍टरांनी व त्यांच्या शिखर संघटनांनीच पावले उचलण्याची गरज आहे.

२०१० सालच्या  महाराष्ट्र  सरकारच्या   कायद्या  प्रमाणे   खासगी अथवा सरकारी रुग्णालये, डॉक्‍टर, कर्मचारी, नर्स, वॉर्डबॉय, मेडिकलचे विद्यार्थी इ.ना या कायद्याच्या संरक्षण कक्षेत आणले आहे. जी व्यक्ती अशा डॉक्‍टर इ.वर हल्ला करेल किंवा दुसऱ्या व्यक्तीकडून हल्ला करून घेईल त्या व्यक्तीस या कायद्याखाली दोषी धरून ३ वर्षे कैद आणि/ अथवा रु. ५० हजार दंड अशी शिक्षा होऊ शकते. या कायद्याखालचा गुन्हा हा दखलपात्र व अजामिनपात्र आहे. जर गुन्हेगारामुळे हॉस्पिटलच्या यंत्रसामग्रीचे अथवा मालमत्तेचे नुकसान झाले असेल, तर यंत्रांच्या किमतीच्या दुप्पट रक्कम; तसेच प्रॉपर्टीच्या नुकसानाची न्यायालय ठरवेल ती किंमत संबंधित गुन्हेगाराकडून वसूल करण्याची महत्त्वाची वेगळी तरतूद हे या कायद्याचे वैशिष्ट्य आहे. रक्कम जर तो गुन्हेगार देऊ शकला नाही, तर त्याचे घरदार जप्त करून अशा रकमेची वसुली करता येईल, असेही पुढे म्हटले आहे.

सध्या डॉक्टर-पेशंट ह्यांचे नातेसंबंध हे दुष्टचक्रात अडकलेले आहे. एकमेकांवरील  विश्वास वाढणे हे एकंदरीतच समाज स्वास्थ्याच्या द्रुष्टीने खूप गरजेचे आहे. डॉक्टरांनी देखील पेशंटला जास्तीत जास्त वेळ देणे गरजेचे आहे. पेशंटला तुम्ही त्यांच्याबरोबर आहेत ह्याची खात्री पाहिजे असते.

सध्याची परिस्थिती हि गंभीर आहे आणि आपल्या सर्वांसाठीच नवीन आहे. त्यामुळे तारतम्य बाळगणे सर्वांच्याच हिताचे आहे. 

ऍड. रोहित एरंडे.©

Comments

  1. सर मी एका घरात २०वर्ष भोगवटदार म्हणुन रहात आहे.त्याचे लाईट बिल माझेच नावावर आहे.मालकाने आम्हाला कोर्टात मार्फत त्रास द्यायला सुरुवात केली आहे.आमचे हातावरचे पोट आम्ही कोर्ट कचेरी करू शकत नाही. आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©