अब (तक) ३५६ ? -राष्ट्रपती राजवट ? ऍड. रोहित एरंडे. पुणे ©

 अब (तक) ३५६ ? -राष्ट्रपती राजवट ?


ऍड. रोहित एरंडे. पुणे ©

सुमारे अडीच वर्षांपूर्वी देखील  महाराष्ट्रामधील  एकंदरीतच सर्व परिस्थिती ही रामदास स्वामींनी म्हणून ठेवल्याप्रमाणे  "मतामतांचा गलबला। कोणी पुसेना कोणाला।" अशी होती.   निवडणूक निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेले बहुमत सिद्ध करण्यात सुरुवातीला कोणत्याच पक्षाला यश न आल्यामुळे अखेर महाराष्ट्रामध्ये 'राष्ट्रपती राजवट  लागू झाली होती. नंतर महाविकास आघाडी सरकार अस्तितीवर आले. मात्र आज परत तशीच परिस्थिती उद्भवली आहे आणि सरकार टिकणार का नवीन साकारकर येणार का घटनेतील अनुच्छेद ३५६ प्रमाणे राष्ट्रपती राजवट लागू होणार ह्याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत आणि परत एकदा राजकारणाचा रंग हा  काळा  किंवा पांढरा   नसून करडा (ग्रे)असतो हे परत एकदा सिद्ध झाले. 


राष्ट्रपती राजवटी संदर्भातील राज्यघटनेमधील अनुच्छेद ३५६ ही तरतूद सुरुवातीपासूनच विवादास्पद राहिली आहे त्याची थोडक्यात माहिती आपण घेवू.

 ब्रिटिशांच्या काळात देखील गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट , १९३५ च्या कलम ९३ अन्वये तत्कालीन गव्हर्नरला एखाद्या प्रांतामधील परिस्थिती हाताबाहेर जात आहे असे वाटल्यास सर्व कारभार स्वतःकडे घेण्याची तरतूद होती. ह्याच धर्तीवर अनुच्छेद ३५६ वापरून राष्टपती राजवट लागू केली जाते.

भारताची सार्वभौमत्वाता, अखंडता आणि शांती टिकविण्यासाठी केंद्र सरकारला राज सरकारपेक्षा जास्त अधिकार घटनेमध्ये दिलेले   आहेत आणि म्हणून ही तरतूद केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार :

घटनानिर्मितीच्या वेळी अशी तरतूद आपल्याकडे नको असे मानणाऱ्या प्रबळ गटाचे आक्षेप खोडून  काढताना,  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ठणकावून सांगितले  "एखाद्या तरतुदीचा गैरवापर होऊ शकतो असे गृहीत धरणे चुकीचे आहे आणि मला खात्री आहे की अनुच्छेद ३५६ हे आपल्या घटनेमधील एक मृत कलम (डेड लेटर) बनून राहील आणि अशी वेळ आलीच तर मा. राष्ट्रपती सर्व खबरदार्या घेऊनच योग्य ते पाऊल उचलतील अशी मला खात्री आहे".

अब  तक कितने ३५६ ?

 इतिहासामध्ये डोकावून बघितल्यास आपल्या लक्षात येईल की ह्या कलमाचा उपयोग कायमच विवादास्पद राहिला आहे. आत्तापर्यंत सुमारे १२५ पेक्षा जास्त वेळा ह्या तरतुदींचा वापर केला गेला आहे .  सर्वात पहिल्यांदा १९५१ साली पंजाब राज्यामध्ये ह्या तरतुदीचा वापर केला गेला, तर १९७१ ते १९९० ह्या कालावधीमध्ये आत्तापर्यन्त सर्वात जास्त म्हणजे एकूण ६३ वेळा राष्ट्रपती राजवट लागू केली गेली. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना ५० वेळा , डॉ. मनमहोनसिंग   ह्यांच्या कारकिर्दीत १२ वेळा तर वाजपेयीजी आणि नरेंद्र मोदी ह्यांच्या कारकिर्दीत आजपर्यंत अनुक्रमे ४ आणि ७ वेळा राष्टपती राजवट लागू केली आहे असे वाचण्यात आले आहे.   राज्यांचा विचार केल्यास  सर्वात जास्त वेळा  जम्मू-काश्मीर, मणिपूर आणि उत्तर प्रदेश ह्या राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. तर महाराष्ट्रामध्ये ह्या आधी २ वेळा राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.   १९८० साली जेव्हा इंदिरा गांधींनी शरद पवार ह्यांच्या नेतृत्वाखालील बहुमत असलेले "पु.लो.द. " सरकार बरखास्त केले तेव्हा सुमारे  ११२ दिवस पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये लागू झाली आणि २०१४ साली काँग्रेस आणि राष्ट्रवादी ह्यांच्या मध्ये मुख्यमंत्री पद आणि जागा वाटपावरून  फारकत झाल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ह्यांनी राजीनामा दिल्यानंतर सुमारे ३३ दिवस राष्ट्रपती राजवट लागू होती.


अनुच्छेद ३५६ प्रमाणे राष्ट्रपती राजवट कधी लागू होते ?


एखाद्या राज्यामधील शासनयंत्रणा घटनेप्रमाणे चालविणे शक्य नाही किंवा इतर कारणांनी, म्हणजेच सरकार अल्पमतामध्ये  आले किंवा कुठल्याच राजकीय पक्षाला बहुमत मिळाले नाही किंवा बहुमत असून देखील सरकारकडून घटनेची पायमल्ली झाली, ह्या सारख्या कारणांनी    यंत्रणा कोडमडायला आल्याची राज्यपालांना खात्री झाल्यास तसा अहवाल राज्यपालांकडून मा. राष्ट्रपतींना पाठवला  जातो आणि त्या अहवालामधील शिफारशींबाबत पूर्ण खात्री पटल्यावरच मा. राष्ट्रपती संबंधित राज्यसरकार बडतर्फ करू शकतात आणि त्या राज्याचा कारभार स्वतःकडे किंवा केंद्राकडे वर्ग करू शकतात. 'काळजी वाहू सरकार' अशी कोणतीही तरतूद कायद्यात आढळून येत नाही.  


एखाद्या पक्षाला बहुमत सिद्ध करण्यासाठी किती दिवसांचा अवधी द्यायचा ह्या बाबत स्पष्ट तरतुद नाही आणि ह्याचे सर्व अधिकार मा. राज्यपालांना असतात. त्यामुळे एखाद्या पक्षाला किती मुदत द्यायची ह्याचा विशेषाधिकार राज्यपालांना असतो. त्याचप्रमाणे  अशी  मुदत संपली म्हणजे आता कधीच बहुमत सिद्ध करता येणार नाही असे नाही. नंतर  देखील बहुमतची खात्री असल्यास  राजकीय पक्षांना तसे बहुमत सिद्ध करण्यासाठी मा. राज्यपालांना विनंती करता येते.


येथे पण मजा आहे. जर एखाद्या पक्षातून बाहेर पडलेल्या आमदारांची संख्या हि एकूण  संख्येच्या २/३ झाली तर पक्षांतर बंदी कायदा लागू होत  नाही आणि सद्यस्थितीत एखाद्या  पक्षप्रमुखावरच पक्षातून बेदखल  व्हायची वेळ येऊ शकते. 


राष्ट्रपती राजवटीचा वटहुकूम हा २ महिनेच अस्तित्वात राहू शकतो आणि ततपूर्वी त्यास संसदेच्या दोन्ही सभागृहांकडून त्यास मान्यता मिळवावी लागते. अशी मान्यता मिळाल्यावर ६ महिन्यांकरिताच राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. अर्थात एकूण जास्तीजास्त ३ वर्षांकरीताच राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते.  सगळ्यात महत्वाचे म्हणजे न्यायपालिका स्वतंत्रच राहते, हे आपल्या घटनेचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. राष्ट्रपती राजवटीच्या कालावधीत सर्वसामान्य लोकांच्या रोजच्या जीवनावर काहीही फरक पडत नाही.  राष्ट्रपती राजवट म्हणजे काही आणीबाणी नाही. त्यामुळे उगाच घाबरून जावू नये आणि अफवा पसरवू  नये. 


ह्या कलमाचा गैरवापर टाळण्यासाठी १९९४ साली मा. सर्वोच्च न्यायालयाच्या ९ सदस्यीय खंडपीठाने घालून दिलेली "एस. आर. बोम्मई" म्हणून ओळखली जाणारी मार्गदर्शक तत्वे आजही लागू आहेत :


१. मा. राष्ट्रपती हे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच काम करतात आणि तो सल्ला त्यांच्यावर बंधनकारक असतो. थोडक्यात  केंद्र सरकारच्या   हातात अप्रत्यक्षपणे राज्याचा सर्व कारभार जातो.


२. सरकारला बहुमत आहे कि नाही हे विधानसभेमध्येच सिद्ध होणे गरजेचे आहे, मा .राज्यपालांच्या ऑफिस मध्ये नाही.


३. राष्ट्रपती राजवटीच्या वटहुकूमाला कोर्टामध्ये  आव्हान देता येते आणि जेव्हा सकृतदर्शनी असा वटहुकूम हा राजकीय स्वार्थासाठी प्रेरित असल्याचे दिसून आल्यास असे आरोप फेटाळण्याची जबाबदारी केंद्र सरकारवर येते. मात्र अकार्यक्षम राज्यसरकार आणि घटनेची पायमल्ली करणारे राज्यसरकार ह्या मध्ये फरक आहे, हे लक्षात घ्यावे.


४. जो पर्यंत संसदेच्या दोन्ही सभागृहात वटहुकूम मान्य होत नाही तो पर्यंत मा. राष्ट्रपतींनी देखील कुठलीही आततायीपणाची कृती करू नये. वटहुकूम २ महिन्यांमध्ये मान्य  न झाल्यास किंवा  कोर्टाने देखील वटहुकूम रद्द ठरविला तर  आपोआप राज्यसरकार अस्तितवात  येते.


५. केंद्रीय मंत्रिमंडळाने काय आणि कुठल्या प्रकारचा सल्ला मा. राष्ट्रपतींना दिला ह्या बाबतीत  कोर्ट काही विचारणा  करू  शकत नाही, मात्र कुठल्या आधारावर असा सल्ला दिला, असे कोर्ट विचारू शकते.


वरील बोम्मई प्रकरणामध्ये कर्नाटक, मेघालय आणि नागालँड इथलं सरकारे बहुमतात नसल्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली तर बाबरी मशीद प्रकरणानंतर राजस्थान , मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश येथील कायदा सुव्यवस्था धोक्यात आल्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात अली, ह्या सर्व राज्यांमधील वटहुकुमांना बोम्मई प्रकरणामध्ये एकत्रितरित्या आव्हान दिले गेले होते. वरील मार्गदर्शन सूत्रे घालून देऊन मा. सर्वोच्च न्यायालायने कर्नाटक, मेघालय आणि नागालँड येथील राजवट रद्द केली, परंतु "भारतासारख्या देशात जेथे  सर्वधर्मसमभाव हे मूलभूत तत्व आहे, तिथे  धर्माचा आधार घेऊन सरकार आणि राजकीय पक्ष चालविता येणार नाहीत: ह्या कारणास्तव राजस्थान , मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश येथील सरकारे बहुमतात असून देखील तेथील राष्ट्रपती राज्यावट  तशीच ठेवण्यात आली.


आता बघूया सत्तेच्या सारीपाटावर कोण जिंकतो ते. 


ऍड. रोहित एरंडे


पुणे ©


Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©