वडिलांच्या स्वकष्टार्जित मिळकतीमध्ये फक्त मुलींना हक्क, पण कधी ? : 'सर्वोच्च' निकाल आणि मिडीयाने लावलेला अर्थ !! ऍड. रोहित एरंडे

वडिलांच्या स्वकष्टार्जित मिळकतीमध्ये फक्त मुलींना   हक्क, पण कधी ? 'सर्वोच्च' निकाल आणि मिडीयाने लावलेला अर्थ !! 

ऍड. रोहित एरंडे. ©

 मागील लेखात आपण वडिलोपार्जित मिळकती आणि मुलींचा हक्क ह्याबाबत माहिती घेतली. ह्या लेखात स्वकष्टार्जित मिळकतींबाबत आपण थोडक्यात माहिती घेऊ. "ब्रेकिंग न्यूज" मुळे  एखाद्या निकालाचा कसा गैर अर्थ काढला जाऊ शकतो, ह्याचे हा निकाल एक ज्वलंत उदाहरण आहे.


वडील जर मृत्युपत्र न करता मरण पावले तर त्यांचा एकमेव वारस असलेल्या त्यांच्या  एकुलत्याएक मुलीला वडिलांची सर्व  मिळकत मिळेल का ?  आणि ती मुलगी सुद्धा मृत्यूपत्र न करता आणि  निपुत्रिक मरण पावली तर तिच्या मिळकतीचे वाटप कसे होईल ? हे प्रश्न मा. सर्वोच्च न्यायालयापुढे उपस्थित झाले. मात्र 'ब्रेकिंग न्यूज' च्या उत्साहामध्ये  'वडिलांच्या सर्वच स्वकष्टार्जित मिळकतींमध्ये फक्त मुलींनाच अधिकार मिळेल आणि भावांना - मग त्यात सख्खे देखील आले - काहीच अधिकार नाही' अश्या आशयाचे चुकीचे  काही महिन्यांपूर्वी  मेसेजेस फिरू लागले. सबब ह्या लेखाच्या निमित्ताने ह्या निकालाचा आणि संबंधित क्लीष्ट  कायद्याचा थोडक्यात परामर्श घेण्याचा प्रयत्न करू.

अरुणाचल गुंडूर विरुद्ध पुन्नूस्वामी आणि इतर  (सिविल अपील क्र. ६६५९/२०११) ह्या सदरील केसमध्ये मा. न्या.  एस. अब्दुल नझीर आणि मा. न्या. कृष्ण मुरारी ह्यांच्या खंडपीठाने आपल्या ५१ पानी निकालपत्रामध्ये हिंदू वारसा कायद्याप्रमाणे  एखादा  हिंदू पुरुष आणि महिला,  मृत्यूपत्र न करता मरण पावल्यास त्यांच्या स्वकष्टार्जित मिळकतींचे वाटप कसे होते ह्याचा उहापोह केला आहे. हि केस वडिलोपार्जित मिळकतींची नाही हेही लक्षात घ्यावे .


 एखाद्या मिळकतीमध्ये मालकी हक्क हा व्यक्तींच्या हयातीमध्ये  खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाटप-पत्र यांसारख्या नोंदणीकृत दस्तानेच तबदील केला जाऊ शकतो.    तर  एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या मिळकतीमधील मालकी हक्क हा मृत्यूपत्राने (टेस्टमेंटरी सक्सेशन) किंवा मृत्यूपत्र केले नसेल तर वारसा हक्काने (इंटेस्टेट सक्सेशन )  तबदील होऊ शकतो. खरेदीखत, बक्षीसपत्र , मृत्युपत्र  ह्यायोगे मिळालेली मिळकत हि त्या व्यक्तीची स्वष्टार्जित / स्वतंत्र मिळकत धरली जाते.

ह्या केसची पार्श्वभूमी आहे वारसा कायदा येण्याआधीची १९४९ सालची.   रामसामी गुंडूर आणि  मराप्पा गुंडूर हे सख्खे भाऊ.  मराप्पा १९४९ साली मरण पावतो आणि ततपूर्वी त्याने एकत्र कुटुंबात राहून देखील स्वकष्टार्जित मिळकत कमावलेली असते.  मात्र त्याची पत्नी आधीच मरण पावते आणि त्याला मुलगा देखील नसतो त्यामुळे त्याच्या  स्वकष्टार्जित मिळकतीमध्ये त्याच्या एकुलत्या एक मुलीलाच - 'कुप्पयी अम्मल' हिलाच मिळेल असे मा. सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले ह्यासाठी  हिंदू वारसा कायद्याचे स्रोत समजल्या गेलेल्या  याज्ञवल्क्य स्मृती, व्यवस्थाचंद्रिका असे ग्रंथ ह्यांचा संदर्भ घेतलेले ब्रिटिश कालीन तसेच पूर्वीचे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल ह्यांचा आधार घेतलेला दिसून येतो. तसेच पुढे 'कुप्पयी अम्मल' हि १९६७ साली निपुत्रिक मरण पावल्यामुळे हिंदू वारसा कायदा १९५६ च्या  कलम १५(२) प्रमाणे तिच्या वडिलांच्या वारसांकडे म्हणजेच रामसामी गुंडूरच्या ५ मुलांकडे  हि मिळकत जाईल असे कोर्टाने शेवटी नमूद केले.


१९५६ चा कायदा येण्यापूर्वी देखील स्वकष्टार्जित मिळकतीमध्ये मुलाला जन्मतःच कोणताही हक्क प्राप्त  होत नसे, हे सर्वोच्च न्यायालयाने १९५३ सालच्या सी. अरुणाचल विरुद्ध सी. मुरुगंथा ह्या निकालामध्ये नमूद केले आहेच. असो.

तर एखादा हिंदू पुरुष आणि स्त्री मृत्यूपत्र न करता मरण पावले तर त्यांच्या स्वकष्टार्जित  संपत्तीची विभागणी वेगवेगळ्या तरतुदींप्रमाणे  होते. ह्यासाठी ढोबळ मानाने  क्लास-१ -हेअर्स (वारस) आणि क्लास-२-हेअर्स (वारस) अशी विभागणी केलेली आढळते. .


हिंदू पुरुष आणि मिळकतीचे विभाजन :

एखादा हिंदू पुरुष मृत्यूपत्र न करता मरण पावल्यास त्याची स्वकष्टार्जित मिळकत हि  हिंदू  वारसा कायद्याच्या कलम  ८ अन्वये सर्व प्रथम क्लास-१ हेअर्स ज्यांच्यामध्ये प्रामुख्याने  त्याची विधवा पत्नी, मुलगा -मुलगी (मुले)  , आई , मुलगा -मुलगी आधीच मयत झाली असल्यास त्यांची मुले (नातवंडे), मुलाची विधवा पत्नी (सून)  इ. चा  समावेश होतो, ह्या वारसांना  समान पद्धतीने मिळेल. जर का क्लास-१ वारसांपैकी  कोणीही नसेल, तर मग क्लास-२ वारसांकडे  अशी संपत्ती जाते. क्लास-२ हेअर्स मध्ये प्रामुख्याने वडील, मुलाच्या किंवा मुलीच्या  मुलीचा मुलगा किंवा मुलगी (पतवंडे), भाऊ -बहीण, चुलते इ.  ह्यांचा समावेश होतो.


हिंदू महिला आणि मिळकतीचे विभाजन :


सर्वोच्च न्यायालयाने पुढे नमूद केले कि पूर्वी महिलांना मिळकतीमध्ये मर्यादित हक्क होता. म्हणून कलम १४ अन्वये  महिलांना एखादी मिळकत वारसाने, वाटपाने , पोटगीसाठी किंवा पोटगीच्या फरकापोटी,  मृत्यूपत्र किंवा बक्षीसपत्राने किंवा खरेदीने, स्त्रीधनापोटी इ. प्रकारे  आणि  कोणाकडूनही    मिळाल्यास ती महिला अश्या मिळकतींची संपुर्ण मालक होते.   ह्याला अपवाद म्हणजे ज्या  मिळकतींमध्ये फक्त तहहयात राहण्याचा हक्क दिला असेल त्या सोडून.


निपुत्रिक महिला आणि मिळकतीचे विभाजन : 


जर का एखादी हिंदू महिला  मृत्यूपत्र न करता मरण पावली तर तिची मिळकत  कलम १५ (१) प्रमाणे सर्वात प्रथम तिचा नवरा, मुलगा-मुलगी, जर मुलगा -मुलगी आधीच मयत झाली असल्यास त्यांची मुले (नातवंडे) ह्यांच्यामध्ये समानरीत्या विभागली जाईल. ह्यांच्यापैकी कोणीच नसेल तर मग नवऱ्याचे वारसांकडे आणि ते नसतील तर आई-वडील, तेही नसतील तर वडिलांच्या वारसांकडे आणि शेवटी आईच्या वारसांकडे मिळकत जाईल. मात्र , 'महिलेच्या मृत्यूनंतर अशी मिळकत हि मिळकतीच्या उगमाकडेच जाईल'  हि कलम १५(२) मधील  पूर्व अट  लक्षात घ्यावीच  लागते. मात्र अशी अट पुरुषांबाबत नाही !  त्यामुळे जर महिलेला एखादी  मिळकत तिच्या वडील किंवा आईकडून मिळाली असेल आणि ती महिला निपुत्रिक (issueless ) असेल म्हणजेच तिचे मुलगा-मुलगी किंवा जर मुलगा -मुलगी आधीच मयत झाली असल्यास त्यांची मुले (नातवंडे) ह्यांपैकी कोणी  वारस हयात नसतील तर अशी मिळकत हि कलम १५ (१) प्रमाणे न जाता  केवळ त्या महिलेच्या वडिलांच्या वारसांकडेच  जाईल. तसेच जर का मिळकत नवऱ्याकडून किंवा सासऱ्यांकडून आली असेल आणि वरीलप्रमाणेच ति निपुत्रिक असेल , तर अशी मिळकत हि तिच्या मृत्यूनंतर फक्त तिच्या नवऱ्याच्या वारसांकडे जाईल.

 वरील महत्वाचा निकाल  सर्वोच्च न्यायालयाने आहे त्याच कायद्याप्रमाणे  दिला आहे, 'ब्रेकिंग न्यूज प्रमाणे नवीन काही नाही.   तसेच ह्या केसमुळे मृत्यूपत्राचे महत्व देखील अप्रत्यक्षपणे अधोरेखित झाले आहे.   मृत्यूपत्र केलेले असेल तर वारसा कायद्याला बगल देता येते.  Will is made to give go-bye  to the  normal  line  of  succession हे ह्यासाठीच म्हणले आहे. वरील  केसमध्ये मुलगी एकुलती एक असते आणि पुढे ती निपुत्रिक होते, ह्या खूप महत्वाच्या फॅक्टस  आहेत, ज्या इतर   केसमध्ये असतीलच असे अजिबात नाही. म्हणून शेवटी, आपल्याला एखादा निकाल लागू होतो किंवा नाही हे ठरविण्यासाठी  प्रत्येक केसच्या फॅक्टस देखील तपासून बघाव्या लागतात  . 'नीम हकीम खतरा ए  जान' हि म्हण सोशल मिडियावरच्या बातम्यांवर विश्वास ठेवण्याआधी कायम लक्षात घ्यावी.


ऍड. रोहित एरंडे.



Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©