पाणी गळती : सोसायटी आणि फ्लॅट धारक ह्यांची जबाबदारी काय ? - ॲड. रोहित एरंडे ©

 प्रश्न : पावसाच्या पाण्याच्या गळतीमुळे आमच्या सदनिकेच्या पश्र्चिमेच्या बाजूच्या आतल्या बाजूने दोन्ही बेडरूममध्ये पाणी झिरपून भिंतीचे प्लॅस्टर प़डले आहे व रंगाचे नुकसान झाले आहे. सदर भिंतीच्या बाहेरच्या बाजूने प्लॅस्टरला मोठ्या भेगा पडल्या आहेत.आम्ही सोसायटीच्या निदर्शनास सदर बाब सन २०१३ पासून तोंडी आणून दिली होती. नंतर सन २०१८ पासून वारंवार लेखी कळविण्यात आले होते.परंतु सोसायटीने काहीही केले नाही. आता निविदा मागवून स्ट्रक्चरल ऑडिटर नेमून पूर्ण इमारतीची दुरुस्ती करून घेण्याचे संकेत सोसायटीने दिले आहेत, पण ते कधी होईल माहिती नाही. आमच्या सदनिकेत आम्हास नूतनीकरण करून घ्यावयाचे आहे. सोसायटीच्या निष्काळजीपणामुळे बेडरूमच्या भिंतीच्या आतील बाजूस नुकसान झालेल्या प्लॅस्टरची व रंगाची नुकसानभरपाई आम्ही सोसायटीकडून मागू शकतो का ?.

एक सदनिकाधारक 

उत्तर : पाणी गळती आणि भरपाई हा ज्वलंत प्रश्न अनेक सोसायट्यांमध्ये  भेडसावत असतो. पाणी गळतीचा खर्च हा कोणत्या सभासदाने करायचा ? का सोसायटीने करायचा, हे नेहमीचे वादाचे मुद्दे समोर येतात.   सोसायटीच्या दुरुस्त उपनियम १५९ प्रमाणे  सर्व प्रकारच्या पाण्याच्या गळत्या ज्यामध्ये पावसाच्या होणाऱ्या गळत्या आणि बाहेरील सामाईक पाईप तसेच मलनिःस्सारण वाहिनीमधून होणाऱ्या गळत्या ह्यांचा देखील समावेश होतो याचा खर्च तसेच पावसामुळे  गच्चीमधून होणाऱ्या गळतीमुळे टॉप फ्लॉवर फ्लॅटचे छत तसेच त्यावरील प्लास्टर खराब होणे, हा खर्च  सोसायटीने करणे गरजेचे आहे. ह्यात कसूर केल्यामुळे  नुकसान झालेल्या प्लॅस्टरची व रंगाची नुकसानभरपाई तुम्हाला  सोसायटीकडून मागता येईल.  स्ट्रक्चरल ऑडिट देखील सोसायटीने स्वखर्चाने लवकर  करून घेणे गरजेचे आहे

सोसायटीच्या बाबतीत २००६ साली  मा. मुंबई उच्च न्यायालयाने    'हंबल को.ऑप. सोसायटी विरुद्ध शाम आणि लता बलानी' ह्या केसमध्ये लता बलानी ह्यांच्या फ्लॅटमध्ये टॉप टेरेस मधून होत असलेल्या पाणी गळतीच्या दुरुस्तीसाठी  सोसायटीला जबाबदार धरले. तसेच पाम बीच सोसायटी, नवी मुंबई विरुद्ध सलील बोस' २०१७  ह्या केस मध्ये महाराष्ट्र राज्य ग्राहक आयोगाने 'बिल्डिंग सुयोग्य स्थितीमध्ये ठेवण्याची जबाबदारी सोसायटीची असल्यामुळे  सामाईक गच्चीवरील  वॉटरप्रूफिंगचा  खर्च करण्यास सोसायटी  बांधील आहे" असा निकाल दिला. 

 ह्याच अनुषंगाने अजून एक महत्वाची तरतूद (उपनियम  ६८ (ब) आणि १५९ (ब ) )अशी आहे की एखाद्या  फ्लॅटमध्ये ,वरील फ्लॅटमधील शौचालय /सिंकमुळे अंतर्गत पाणी गळती होत  असेल तर अशी गळती ज्याच्या फ्लॅटमधून गळती होत आहे त्याने स्वखर्चाने थांबविली पाहिजे. 

आपल्या केसमध्ये आपण आधीच कायदेशीर कारवाई करणे गरजेचे होते, नुसते तोंडी सांगून उपयोग होत नाही.  आता आधी  वकीलांमार्फत नोटीस द्यावी अन्यथा कायदेशीर कारवाई लगेच करावी.  त्याचप्रमाणे सोसायटीविरुद्ध  महानगर पालिकेच्या आरोग्य खात्याकडे  देखील 'पाणी गळतीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे" असा  तक्रार अर्ज करता येईल . 

ॲड. रोहित एरंडे ©

पुणे.


Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©