सोसायटी आणि सभासदांनी केलेले अतिक्रमण - ॲड. रोहित एरंडे ©

आमच्या सोसायटी मध्ये काही सभासदांनी फ्लॅट बाहेरील मोकळ्या जागेत (पॅसेज) मध्ये लोखंडी दार लावून घेतले आहे आणि ती जागा त्यांचीच असल्यासारखे ते वापरतात. २-३ सभासदांनी तर ह्या पॅसेज मधेय कुंड्या ठेवून बागच फुलवली आहे.  अश्या प्रकारामध्ये सोसायटीला काही कारवाई  करता येईल का ?


सोसायटी कमिटी मंडळ , मुंबई 


उत्तर : आपल्याला जेवढी जागा करारनाम्याने मिळाली आहे तेवढीच जागा वापरण्याचा अधिकार सभासदाला असतो.   पॅसेजला ग्रील लावून ती जागा स्वतःचीच असल्यासारखे वागणे, मोकळ्या पॅसेजमध्ये कुंड्या ठेवंणे, असे  प्रकार सर्रास बघायला मिळतात आणि कायद्याच्या भाषेत ह्याला अतिक्रमण (एन्क्रोचमेंट) असे म्हणता येईल. या संदर्भात आदर्श उपविधी १६९ (अ) मध्ये स्पष्ट तरतुदी केल्याचे आढळून येईल. ह्या तरतुदीप्रमाणे , "सोसायटी मधील जिना, पायऱ्या  तसेच जिन्याखालील  जागा, लँडिंग एरिया, टेरेस / मोकळे मैदान / लॉन / क्लब हाऊस / कॉमन हॉल इ. कोणत्याही  सभासदाला वैयक्तिक कारणासाठी वापरता येणार नाही. जो सभासद या नियमांचे उल्लंघन करेल, त्यांना दंड आकारण्याची तरतूद या कलमांतर्गत सोसायटीला आहे. अश्या प्रकारच्या सामायिक जागा ह्या सर्व सभासदांच्या वापराकरिता असतात आणि त्यामुळे कोणत्याही एका सभासदाला त्यावर हक्क सांगता येणार नाही आणि कोणताही सभासद हा अश्या जागा स्वतःच्या वापराकरिता ग्रील वगैरे लावून  बळकावू शकत नाही. ह्या सर्व जागांचा उपयोग हा त्या जागा ज्या कारणाकरिता दिल्या आहेत त्याच करता झाला पाहिजे असेही पुढे नमूद केले आहे. ज्या सभासदाने अश्या प्रकारचे अतिक्रमण केले असेल ते त्यांनी त्वरित काढून घेणे गरजेचे आहे आणि अश्या सभासदाने जितका काळ अश्या जागांवर अतिक्रमण केले असेल तेवढ्या कालावधी करता मासिक देखभाल खर्चाच्या पाचपट इतकी रक्कम देणे बंधनकारक राहील. 


त्याचप्रमाणे उपविधींप्रमाणे कुठल्याही सभासदाला सोसायटीच्या आणि महानगर पालिकेच्या परवानगीशिवाय मंजूर नकाशाच्या बाहेर जाऊन कुठल्याही प्रकारचे बांधकाम, रचनात्मक (स्ट्रक्चरल ) बदल करता येत नाहीत. त्याचप्रमाणे उपविधी ४८(अ) देखील कुठल्याही सभासदाला आपले वर्तन किंवा कृत्य हे इतर सभासदांना उपद्रवकारक आणि त्रासदायक ठरेल असे होणार नाही ह्याची काळजी घेणे बंधनकारक आहे आणि अश्या वर्तनाविरुद्ध कमिटीला स्वतःहून किंवा तक्रार अर्ज आल्यास कारवाई करण्याचे अधिकार आहेत. सभासदाचे असे  वर्तन हे उपविधी ४९ अन्वये सभासदत्व रद्द होण्याचे कारण ठरू शकते, हेही लक्षात ठेवावे. त्यामुळे आपण संबंधित सभासदांना लेखी नोटीस देऊन असे वर्तन ताबडतोब थांबवायला सांगावे.   त्यातून काही निष्पन्न झाले नाही तर अश्या सर्व गोष्टींच्या फोटो. इ. पुराव्यांसह सक्षम न्यायालयात असे अतिक्रमण काढण्यासाठी तुम्हाला केस दाखल करावी लागेल. तसेच मंजूर नकाशाच्या विपरीत बांधकामासंदर्भात महानगर पालिकेकडे देखील तक्रार करता येईल.   


ऍड. रोहित एरंडे ©




Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©