नॉमिनी सभासदाला (Provisional Member) मतदानाचा हक्क : ॲड. रोहित एरंडे ©
प्रश्न : आमच्या फ्लॅटसाठी माझ्या वडिलांनी मला नॉमिनी नेमले होते. वडिलांच्या मृत्युनंतर मी सोसायटीमध्ये सभासदत्व मिळविण्यासाठी अर्ज दिला, पण सोसायटीने माझे नाव शेअर सर्टिफिकेटवर प्रोव्हिजनल सभासद म्हणून लावले आणि मला मतदानाचा हक्क नाही असे म्हणून सोसायटीने मला सभांमध्ये भाग घेण्यापासून रोखले आहे. तरी याबाबत कृपया मार्गदर्शन करावे.
एक वाचक, अंधेरी, मुंबई
उत्तर : नॉमिनी म्हटले कि गैरसमज आणि वाद हे आलेच असे आता म्हणावे लागेल. सोसायटीमध्ये मूळ सभासद मयत झाल्यानंतर त्याच्या वारसांमध्ये आणि नॉमिनी मध्ये बऱ्याचदा वाद निर्माण होतात आणि अश्यावेळी सोसायटी कमिटीपुढे ह्या वादाचे निरसन कसे करायचे असा प्रश्न निर्माण होतो. परंतु सहकार कायद्यात दिनांक ९ मार्च २०१९ पासून झालेल्या बदलाप्रमाणे कलम १५४(बी) हे नवीन कलम दाखल झाले आहे. ज्यायोगे सभासदांच्या व्याख्येमध्ये पहिल्यांदाच नॉमिनी म्हणून नेमलेल्या व्यक्तीला "प्रोव्हिजनल मेंबर " म्हणजेच थोडक्यात कारणापुरता /तात्पुरता सभासद म्हणून मान्यता मिळाली आहे. थोडक्यात अशी तरतूद केली आहे. जो पर्यंत मयत सभासदाचे कायदेशीर वारस कोण हे ठरत नाही तो पर्यंत नॉमिनीला "प्रोव्हिजनल मेंबर " म्हणून सभासदत्व दिले जाईल, असे व्याख्येमध्ये नमूद केले आहे. त्यामुळे सोसायटीने तुमचे नाव प्रोव्हिजनल सभासद म्हणून लावले आहे ते योग्य आहे
पुढील कलम १५४(बी)( १३) मधील नवीन तरतुदीनुसार सदस्याच्या निधनानंतर मृत्युपत्र, वारस हक्क प्रमाणपत्र, कौटुंबिक व्यवस्थापत्र (फॅमिली अरेंजमेंट) ,याद्वारेअथवा कोर्ट ऑर्डर याद्वारे वारस कोण हे ठरेल. परंतु तो पर्यंत नॉमिनीस तात्पुरते (प्रोव्हिजनल) सदस्यत्व देता येते याच तरतुदीमध्ये पुढे नमूद केले आहे कि जर एखाद्या सभासदाने नॉमिनेशन केले नसेल, तर सोसायटी कमिटी त्यांच्या अखत्यारीत आणि त्यांच्या मते जी व्यक्ती कायदेशीर वारस असू शकेल अश्या व्यक्तीस उपविधी ३५ अन्वये योग्य ती प्रक्रिया पार पाडून असे तात्पुरते (प्रोव्हिजनल) सदस्यत्व देऊ शकते. अर्थात "नॉमिनी म्हणजे मालक नाही, ती एक तात्पुरती सोय आहे" हे कायदेशीर तत्व परत एकदा उद्धृत करणे गरजेचे आहे.
आता राहिला प्रश्न मतदानाचा. कलम १५४(बी)(१३) प्रमाणे ''एक सभासद - एक मत' हेच तत्व लागू राहील. व्यक्तिशः मतदान करणे (to vote personally ) क्रमप्राप्त आहे. सभासदाऐवजी प्रॉक्सि किंवा अन्य कोणी मुखत्यार म्हणून मतदान करू शकत नाही. असोसिएट मेम्बरला मुख्य सदस्याच्या पूर्वपरवानगीने मतदान करता येईल. मात्र उपकलम (१४) प्रमाणे प्रोव्हिजनल (नॉमिनी) सभासदाला मतदानाचा हक्क दिलेला आहे. याचाच अर्थ अश्या प्रोव्हिजनल सभासदाला मिटिंगला उपसस्थित राहण्याचा हक्क आहे हे उघडच आहे. कारण जर मिटिंगला उपस्थित राहता येत नसेल तर मग मतदानाचा हक्क कसा बजावणार आणि मिटिंगला उपस्थित राहून दिले नाही तर मतदानाच्या हक्काचा भंग होतो. त्यामुळे तुमच्या केसमध्ये मतदानाचा हक्क असल्यामुळे प्रोव्हिजनल सभासदाला मिटींगला उपस्थित राहता येईल.
एक महत्वाची गोष्ट नमूद करावीशी वाटते की "सभासदत्व" आणि "मालकी हक्क" ह्या दोन वेगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे नॉमिनी कोणाला नेमायचे हा अधिकार सभासदाला असतो. त्यामुळे एखादा कायदेशीर वारस हा नॉमिनी म्हणूनहि नेमलेला असू शकतो, पण नेमलेला नॉमिनी हा कायदेशीर वारस असेलच असे नाही.
ॲड. रोहित एरंडे ©
जर सभासदाच्या मृत्यूपूर्वी मिळकती बाबत न्यायालयात वाद प्रलंबित असेल तर संस्थेला नॉमिनी नेमला नसताना आणि इतर कुठल्याही कायदेशीर दस्त च्या अनुपस्थितीत provisional मेंबर म्हणून नोंदणी करता येईल का?
ReplyDelete