डिव्होर्स नंतर संयुक्त मालकीच्या फ्लॅटची मालकी कोणाकडे ? - ॲड. रोहित एरंडे ©
डिव्होर्स नंतर संयुक्त मालकीच्या फ्लॅटची मालकी कोणाकडे ?
आमच्या मुलाच्या आणि सुनबाईंच्या नावावर एक फ्लॅट आहे, मुलाचे नाव पहिले आणि दुसरे सुनबाईंचे. सर्व सुरळीत चालू आहे असे आम्हाला वाटत असतानाच अचानक त्या दोघांनी परस्पर संमतीने डिव्होर्स घेणार असल्याचे जाहीर केल्यामुळे आम्हा उभयतांवर जणू डोंगरच कोसळला आहे. त्यातून आम्ही मार्ग काढायचा प्रयत्न करत आहोतच. पण जर डिव्होर्स झाला तर या फ्लॅटची मालकी त्याचे नाव पहिले असल्याने मुलाकडे जाईल का ? दोघेही चांगले शिकलेले आणि चांगल्या नोकरीत आहेत. कदाचित आमची बिल्डिंग रिडेव्हल्पमेंटला देखील जाईल, त्यामुळे काय करावे लागेल ?
एक त्रस्त पालक., पुणे.
सध्या समाजाचे आणि त्यातही सुशिक्षित कटुंबांचे डिव्होर्स - घटस्फोट हे व्यवच्छेदक लक्षण म्हणावे लागेल एवढे हे प्रमाण वाढते आणि चिंताजनक आहे. काल परवा पर्यंत दूरवर कोणाच्या तरी बाबतीत घडणारा डिव्होर्स हा त्याचे "टॅबू -पण" सोडून आपल्या दारापर्यंत कधी येऊन ठेपला हे बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे कळलेच नाही. डिव्होर्सची करणे हि व्यक्ती प्रमाणे बदलत असतात आणि खरी कारणे समोर येतातच असे नाही. तुम्ही म्हणालात तशी परिस्थिती "अचानकच" उद्भवते आणि आपल्याला सगळे चांगले आहे असे वाटत असले तरी प्रत्यक्षात तसे नसू शकते आणि मग कधीतरी, 'आयुष्यभर खुरडत रहायचे का मोकळे व्हायचे - Bad Marriage or a Divorce" हे ठरविण्याची वेळ येते. संसार म्हणजे तडजोड हे मानणाऱ्या तुमच्या सारख्या पिढीला हे अतर्क्य वाटत असले तरी आता हे वास्तव मान्य करावे लागेल आणि यातून मानसिक त्रास खूप जास्त होतो त्यासाठी समुपदेशकांची, तज्ज्ञांची मदत घेणे इष्टच . या मोठ्या विषयावर लिहिण्यासाठी वेगळे सादर चालू करावे लागेल. असो.
विकत घेण्याऱ्याचे नाव करारात कितवे हे महत्वाचे नाही :
आपण एक लक्षात घ्यावे कि मोबदला कोणीही दिला असला तरी जेवढी नावे करारात नमूद असतात अश्या सर्वांना फ्लॅट मध्ये समान हक्क मिळतो आणि त्या सर्वांची नावे इंडेक्स-२ वर येतात, अपवाद म्हणजे जर कोणाला किती हक्क असे करारनाम्यामध्ये स्पष्टपणे नमूद केले असतील तर. त्यामुळे नाव पहिले असले म्हणून काही विशेष अधिकार नसतात आणि दुसरे नाव असलेली व्यक्ती मयत झाली किंवा त्या दोघांचा डिव्होर्स झाला म्हणून अश्या दुसऱ्या व्यक्तीचा हक्क आपोआप पहिले नाव असलेल्या व्यक्तीला मिळत नाही. नवरा बायको एकत्र फ्लॅट घेतात तेव्हा ते जरी नवरा -बायको असले तरी कायद्याने ते दोन स्वतंत्र व्यक्ती म्हणून करार करत असतात. आपल्या केसमध्येही दोघांच्या नावावर करारनामा असल्याने दोघांना समान हक्क-अधिकार फ्लॅट मध्ये आहेत आणि केवळ डिव्होर्स झाला म्हणून तुमचा मुलगा काही आपोआप मालक होणार नाही. आपल्या केसमध्ये परस्पर संमतीने डिव्होर्स घेणार असल्याने बऱ्याच गोष्टी सुकर होतील. तरीही डिव्होर्सच्या आधी सर्व अटी उदा. पोटगी ठरली असेल तर किती ? सोने -नाणे देणे घेणे, मुले असतील तर त्यांची जबाबदारी आणि खर्च आणि मिळकतींची विभागणी, कर्ज घेतले असेल तर त्याची फेड कशी करणार, या सर्व गोष्टी आधीच ठरवाव्या लागतात आणि त्यांचा उल्लेख डिव्होर्स पिटिशन मध्ये येतो. आता तुमचा मुलगा आणि सून या दोघांनाही कोण हक्क सोडणार आणि हक्क सोडण्याच्या बदल्यात काही मोबदला घेणार का हे ठरवावे लागेल. डिव्होर्स होई पर्यंत ते दोघे नवरा -बायको असणार आहेत त्यामुळे डिव्होर्स डिक्री व्हायच्या आधी एकमेकांच्या लाभात बक्षीस पत्र लिहून दिल्यास ते कमी स्टँम्प मध्ये होईल. बक्षीस पत्रासाठी नैसर्गिक प्रेम, आपुलकी हा मोबदला आहे असे लिहिण्याचा प्रघात असला तरी ती कायदेशीर गरज नाही. जर परस्पर संमतीने नसेल डिव्होर्स आणि विवादित डिव्होर्स झाला तर हिंदू विवाह कायद्याच्या कलम २७ अन्वये कौटुंबिक न्यायालयाला मिळकतींविषयी आदेश देण्याचे अधिकार आहेत.
एकदा डिव्होर्स झाला कि दोघांनाही एकमेकांच्या प्रॉपर्टी मध्ये हक्क अधिकार उरणार नाही. जर का मुले-बाळे असतील तर ते दोघे नवरा -बायको राहिले नसले तरी मुलांचे आई-वडील कायम राहतील आणि त्यामुळे मुलांना त्यांच्या आई-वडिलांच्या मिळकतीमध्ये हक्क अधिकार राहतो. आपल्या केसमध्ये जर पुनर्विकासापूर्वी फ्लॅटचे काय करायचे यावर मुलगा आणि सुनेमध्ये एकमत झाले नाही तर पुनर्विकासामध्ये दोघांच्याही सहीची गरज पडेल आणि नवीन फ्लॅट दोघानांही मिळेल. असो. या वर्षातील हा शेवटचा लेख आहे. तुमच्या आणि वाचकांच्या सर्व चिंता जावोत, अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो..
ॲड. रोहित एरंडे ©
Comments
Post a Comment