वडिलोपार्जित मिळकतीमध्ये बहिणींना समान हक्क : ॲड. रोहित एरंडे ©
वडिलोपार्जित मिळकतीमध्ये बहिणींना समान हक्क :
ॲड. रोहित एरंडे ©
वडिलोपार्जित मिळकतीमध्ये बहिणींना समान हक्क :
आम्ही एकूण २ बहिणी आणि २ भाऊ. आमची काही पिढ्यांपासूनची वडिलोपार्जित मिळकत आहे. दोन्ही बहिणींचे लग्न १९९४ पूर्वी झाले आहे आणि तरीही आता त्या मिळकतींमध्ये हक्क सांगत आहेत. त्यांना लग्नात सर्व काही दिले आहे आणि म्हणून आम्ही हक्कसोडपत्र मागत आहोत, तर त्याला त्या नकार देत आहेत. तर आता बहिणींना आमच्या वडिलोपार्जित मिळकतींमध्ये हक्क आहे का ?
एक वाचक, पुणे.
बहीण-भावाचे खरे प्रेम हे भाऊबीजेला नाही तर सब-रजिस्ट्रार कचेरीत कळते असे कोर्टात गंमतीने म्हटले जाते. कायद्याच्या अज्ञानाने नात्यामध्ये वितुष्ट कसे येऊ शकते हे आपल्या प्रश्नावरून दिसून येते. वडिलोपार्जित (ancestral ) आणि वडिलार्जित (स्वकष्टार्जित)) या मिळकतीच्या हक्कांमध्ये खूप फरक आहे .
वडिलोपार्जित मिळकतींमध्ये मुलींना मुलांप्रमाणेच समान हक्क मिळण्यासाठी हिंदू वारसा कायदा १९५६ च्या कलम ६ मध्ये मध्ये २००५ साली महत्वाचे फेरबदल केले आणि ही दुरुस्ती अंमलात येण्यासाठी ०९/०९/२००५ (On & From ) हि तारीख ठरविली गेली. मात्र या दुरुस्तीचा अंमल हा या तारखेच्या आधी द्यायचा का नंतर (Retrospective /Prospective ) यावरून बराच गोंधळ उडाला, न्यायालयांचेही परसपर विरोधी निकाल आले. अखेर मा. सुप्रीम कोर्टाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने विनीता शर्मा विरुद्ध राकेश शर्मा (AIR 2020 S.C. 3717, ) या याचिकेच्या निमित्ताने ११ ऑगस्ट २०२० रोजी एकमताने निकाल देऊन 'वडिलोपार्जित मिळकतींमध्ये मुलींच्या समान हक्कांवर शिक्कामोर्तब केले आहे आणि पर्यायाने हि दुरुस्ती पूर्वलक्षी प्रभावाने लागू असल्याचे मान्य झाले आहे. अर्थात आई वडिलांच्या स्वकष्टार्जित मिळकतीमध्ये मुलांना जन्मतः अधिकार प्राप्त होत नाही.
या निर्णयामुळे मुलींना आता मुलांप्रमाणेच "को-पार्सनर" समजले जाते आणि मुलांप्रमाणेच मुलींना जन्मतः समान हक्क वडिलोपार्जित मिळकतीमध्ये प्राप्त झाला आहे. बऱ्याच जणांना मुलींचे लग्न १९९४ पूर्वी झाले असल्यास वडिलोपार्जित मिळकतीमध्ये हक्क नाही असे वाटते याचे कारण हिंदू वारसा कायद्यामध्ये १९९४ मध्ये कलम २९अ घालण्यात आले होते , ज्यायोगे १९९४ पूर्वी लग्न झालेल्या मुलींना वडिलोपार्जित मिळकतींमध्ये हक्क मिळणार नाही अशी तरतूद केली होती. मात्र २००५ च्या केंद्रीय दुरुस्तीमुळे आणि सदरील सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे सदरील कलम २९अ हे गैरलागू झाले आहे आणि त्यामुळे वरील निकालामुळे मुलींचा जन्म किंवा लग्न कधीही झाले असले किंवा वडिलांचा मृत्यू कोणत्याही तारखेला झाला असला तरी त्यांना वडिलोपार्जित मिळकतींमध्ये समान हक्क असणार आहे. त्यामुळे तुमच्या बहिणींना सदरील मिळकतींमध्ये समान हक्क आहे.
"मुलींच्या हक्कांसंदर्भात आज पर्यंत जो भेदभाव केला गेला तो चुकीचा होता आणि "मुलगा हा लग्न होई पर्यंतच आई-वडिलांचा मुलगा असतो, पण मुलगी हि आयुष्यभर मुलगीच राहते" असे (वादग्रस्त ?) विधान सुप्रीम कोर्टाने पुढे केले आहे.
मात्र या हक्काला अपवाद करताना दुरुस्त कलम ६(५) प्रमाणे २०/१२/२००४ या तारखेपूर्वी जर एखादी वडिलोपार्जित मिळकत खरेदी, गहाण,बक्षिसपत्र, हक्कसोड पत्र , मृत्यूपत्र इ. दस्तांनी कायदेशीरपणे किंवा रजिस्टर्ड वाटपपत्राने किंवा कोर्टाच्या हुकूमनाम्याने तबदील (ट्रान्सफर ) झाली असेल, तर मात्र अश्या मिळकतींमध्ये मुलींना समान हक्क मागता येणार नाही. तोंडी वाटप पात्र ग्राह्य धरले जाणार नाही. केवळ अपवादत्मक परिस्थितीमध्येच, जेथे तोंडी वाटप पत्र झाले आहे हे सिद्ध करण्यासाठी सरकारी कागदपत्रांचा पुरावा असेल आणि लेखी वाटप पत्राप्रमाणेच त्याची अंमलबजावणी झाली असेल तेथेच तोंडी वाटप पत्र ग्राह्य धरले जाईल, असेही निकालात पुढे नमूद केले आहे.
"लग्नामध्ये सर्व काही दिले आहे" म्हणून बहिणींचा हक्क जाईल अशी तरतूद कलम ६ मध्ये नाही. या न्यायाने भावांना स्वतःच्या लग्नांमध्ये देखील मिळतेच कि म्हणून काही भावांचा असा हक्क जात नाही. पण काही वेळा बहिणीची परिस्थिती उत्तम असून भावाची चांगली नाही, किंवा बहिणी आई-वडिलांचे करत नाहीत असे आरोप होतात, अश्यावेळी सुध्दा भावांच्या भावना समजा बरोबर असल्या तरी कायद्यापुढे भावना चालत नाहीत, पण परस्पर संमती आणि समजूतदारपणा असेल तर कुठल्याही वादात मार्ग निघू शकतो. हक्कसोड पत्र स्वतःहून केले तर उत्तम, नाहीतर ते "सोड-हक्क" पत्र होते.
ॲड. रोहित एरंडे
Link of Supreme Court judgment
https://main.sci.gov.in/supremecourt/2018/32601/32601_2018_33_1501_23387_Judgement_11-Aug-2020.pdf
Comments
Post a Comment