पार्किंग नियमावली ठरविण्याचे अधिकार जनरल बॉडीला - ॲड. रोहित एरंडे ©
पार्किंग नियमावली ठरविण्याचे अधिकार जनरल बॉडीला - ॲड. रोहित एरंडे ©
आमच्या सोसायटीमध्ये दोन विंग मध्ये १८ फ्लॅट + ३ दुकाने असून एकूण १८ सदस्यांपैकी १४ सदस्य त्यांच्या दुचाकी इथे पार्क करीत असत. २०११ मधील जनरल बॉडीच्या एका ठरावानुसार पार्किंग चार्जेस घेत होते. मात्र, पार्किंग योग्य नाही, गाड्यां सुरक्षा नाही म्हणून काही सदस्यांनी पार्किंग चार्जेस देणे बंद केले आणि मॅनेजिंग कमिटीने तसा ठराव २०२१ मध्ये पारित केला. बाकीचे सदस्य पार्किंग चार्जेस सुरु करून थकीत चार्जेस घ्या अशी मागणी करत आहेत, पण कमिटी काही दाद देत नाही. तर याबाबत काय करता येईल ?
एक वाचक, नेरूळ, नवी मुंबई
कितीही दिले तरी कमीच असे पार्किंग बद्दल बोलले जाते आणि सभासदांचे एकमेकांशी संबंध बिघडवण्यास पार्किंग निमित्त ठरल्याचे बरेचदा दिसून येते. बायलॉज (उपविधी) क्र. ७८-८४ प्रमाणे मोकळ्या जागेतील पार्किंगचे नियम ठरविण्याचे अधिकार जनरल बॉडीला आहेत, मॅनेजिंग कमिटीला नाहीत, पण जनरल बॉडीने केलेल्या नियमांची अंमलबजावणी करून घेणे हे कमिटीच्या अखत्यारीत येते. तसेच जनरल बॉडीने केलेले ठराव बदलण्याचाही अधिकार मॅनेजिंग कमिटीला नाही. तरी मोकळ्या जागेतील पार्किंग नियमांची थोडक्यात माहिती आपण घेऊ.
उपविधी ७८ अन्वये वाहने उभी करण्यासाठी जनरल बॉडीमध्ये नियम करावेत जे सर्वांवर बंधनकारक असतात . पार्किंगची जागा अलॉट करताना "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य" या तत्वाप्रमाणे कमिटीने पार्किंग जागेचे वाटप करावे. मिळालेले पार्किंग विकण्याचा किंवा भाड्याने देण्याचा अधिकार सभासदाला असणार नाही. तसेच जी जागा सभासदाला अलॉट झाली असेल तेवढी जागा सोडून इतर कोणत्याही जागेवर सभासदाला पार्किंग करता येणार नाही.
उपविधी ७९ - सोसायटीच्या कॉमन जागेमध्ये कोणाला अडथळा होणार नाही ह्या पद्धतीने पार्किंग स्लॉट पाडून त्यांना क्रमांक देणे आणि त्याचप्रमाणे ज्या कारणाकरिता जागा दिली आहे, त्याच कारणाकरिता तिचा वापर होतोय ना हे सर्व तपासण्याचे काम सोसायटीचे आहे.
उपविधी ८० - ज्या सभासदाकडे वाहन आहे असाच सदस्य अश्या मोकळ्या जागेतील पार्किंग मिळण्यासाठी पात्र राहील. शक्यतो एक सभासद एक पार्किंग असेच तत्व पाळले जाईल. वाहन मालकीचे असो वा नसो, तसेच कंपनीने दिलेले किंवा भागीदारी व्यवसायातील देखील वाहन असू शकते. जादा पार्किंग स्लॉट्स उरल्यास ते आधी पार्किंग स्लॉट्स मिळालेल्या सभासदांनाही देता येतील. परंतु असे जादाचे पार्किंग हे जास्ती जास्त एक वर्षाकरिताच दिले जाईल आणि ते देताना कोणत्याही सभासदाला एकही पार्किंग स्लॉट्स मिळणार नाही अशी वेळ येत नाही हेहि बघणे गरजेचे आहे.
उपविधी ८१- लॉटरी पद्धत - जर पार्किंगची मागणी जास्त आणि पुरवठा कमी असे असेल, जे बहुतेक सर्वत्र दिसून येते, अश्या वेळी मॅनेजिंग कमिटीने पारदर्शक पद्धतीने आणि जनरल बॉडीने ठरविलेल्या पध्दतीप्रमाणे त्याची वाटणी वार्षिक पद्धतीने करावी. ह्या साठी बहुतेक ठिकाणी लॉटरी पद्धत -चिट्ठ्या टाकून नाव काढणे किंवा रोटेशन पद्धत वापरली जाते. सर्व सभासदांनी सामंज्यस दाखविणे याला अर्थातच पर्याय नाही.
उपविधी ८२ - इमारतीखालील किंवा मोकळ्या जागेतील पार्किंग साठी जागा मिळविण्यासाठी सभासदाला योग्य त्या तपशिलासह सेक्रेटरीकडे अर्ज करावा लागेल. उपविधी ६३ अन्वये अश्या अर्जावर कार्यवाही होणे गरजेचे आहे.
उपविधी - ८३ - इमारतीखालील किंवा मोकळ्या जागेतील पार्किंग स्लॉट मिळालेल्या प्रत्येक सभासदाने जनरल बॉडी मध्ये ठरलेल्या दराप्रमाणे पार्किंग साठी शुल्क देणे अनिवार्य आहे, मग तो सभासद तिथे गाडी लावत असेल किंवा नसेल.
उपविधी -८४ - ज्या सभासदांकडे (वरील वाहने सोडून) इतर स्कुटर, मोटारसायकल किंवा रिक्षा असेल त्यांना अशी वाहने सोसायटी कमिटीच्या पूर्व परवानगीशिवाय लावता येणार नाहीत . तसेच जर वाहन लावायची परवानगी मिळाल्यास जनरल बॉडी मध्ये ठरलेल्या दराप्रमाणे शुल्क देणेहि अनिवार्य आहे. अपार्टमेंबद्दल असे वेगळे नियम दिसून येत नाहीत, ते जनरल बॉडीमध्ये करून घेऊन त्याप्रमाणे बायलॉज मध्ये दुरुस्ती करावी.
त्यामुळे जनरल बॉडीने केलेला ठराव जो पर्यंत दुसऱ्या ठरवणे किंवा कोर्टाच्या आदेशाने रद्द होत नाही तोपर्यंत त्या ठरावाप्रमाणेच वर्तन करावे लागेल, नाहीतर कमिटीविरुद्धच सहकार न्यायालयात / रजिस्ट्रारकडे दाद मागावी लागेल.
ॲड. रोहित एरंडे ©
Comments
Post a Comment