मृत्युपत्रात काय लिहिले आहे याची पूर्वकल्पना मुलांना द्यावी काय ? - ॲड. रोहित एरंडे ©
मृत्युपत्रात काय लिहिले आहे याची पूर्वकल्पना मुलांना द्यावी काय ?
सर, आम्ही आमच्या प्रॉपर्टीचे मृत्युपत्र करून ठेवणार आहोत आणि याची चर्चा आम्ही मुलांसमोर केली. तर आता आमची २ मुले त्यांना मृत्युपत्रामध्ये काय लिहून ठेवावे आणि मृत्युपत्र केल्यावर ते वाचायला मागत आहेत. तर अशी माहिती कायद्याने सांगावी काय ? आम्हाला या सर्वाचा ताण येऊन राहिला आहे.
एक वाचक, नागपूर.
तुम्ही विचारले तशी परिस्थिती कमी अधिक फरकाने बघायला मिळते आणि बऱ्याचदा पालकांची भावनिक स्थिती दोलायमान होते. त्यामुळे तुम्ही हा प्रश्न विचारून अनेक पालकांच्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली आहे असे म्हणता येईल. एकतर मृत्युपत्र हा अनेकांना मृत्युपत्राला दुसरे नाव इच्छापत्र असे हि आहे म्हणजेच मृत्यूपत्र करणाऱ्याच्या इच्छेने केली जाणारी मिळकतीची विभागणी, त्यामुळे मुलांच्या इच्छेने मृत्युपत्र केल्यास त्याला तुमचे इच्छापत्र कसे म्हणता येईल ? एकत्र कायद्यामध्ये मृत्युपत्र करण्याची पूर्वकल्पना मुलांना (लाभार्थी) द्यावी अशी कुठलीही तरतूद नाही आणि प्रत्येक मुलाला/मुलीला समानच द्यावे असेही कायदा सांगत नाही. मृत्युपत्र हे ते करणाऱ्याचे "होमपिच " असते असे आम्ही म्हणतो म्हणजेच तुम्हाला जे काही कोणाला मृत्यूपत्रात द्यायचे आहे किंवा कोणाला /विशिष्ट व्यक्तीला काही द्यायचे नाही अशी परिस्थिती असेल तर तेही तुम्ही तुमच्या मृत्युपत्रामध्ये नमूद करून ठेवू शकता आणि तसे करावे. "A Will is made to give go by to the normal line of succession and it prevails over succession " अश्या आशयाचे कायद्याचे वचन आहे,त्यामुळे वैध मृत्युपत्र असल्यास वारसा हक्क कायदा लागू होत नाही.
पालकांनी हेही लक्षात ठेवावे सगळ्यांनाच एकावेळी खुश ठेवता येणे अवघड असते आणि अगदी गणिती २+२ प्रमाणाप्रमाणे सारखे -सारखे प्रत्येक मुलाला देता येणे शक्य असेलच असेही नाही. तुम्ही देत असलेल्या मिळकतीची -स्थावर आणि जंगम यांच्या किंमतीमध्ये तफावत असणार आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला अगदी सारखे देता येईलच असेही नाही आणि याचा ताण घेऊ नका. कारण प्रत्येक पालकाला आपले मूल कसे आहे, प्रत्येकाची आर्थिक /सामाजिक परिस्थिती कशी आहे, हे माहिती असते. तसेच समजा एखादे मूल बाहेर गावी असेल आणि आपल्या जवळचे मूळ आपली सेवाशुश्रूषा करत असेल तर अश्या मुलांना द्यायच्या मिळकतींमध्ये कमी-जास्त होणे नैसर्गिक आहे. . तसेच मला कुठली मिळकत पाहिजे, हे सांगणे मुलांचा हट्ट असू शकतो, पण हक्क नाही आणि हा हट्ट पालकांवर कायद्याने बंधनकारक नाही. तसेच मृत्युपत्राची पूर्वकल्पना दिल्यास मुलांच्या वैवाहिक जोडीदाराचेही मत अप्रत्यक्षपणे का होईना लक्षात घ्यावे लागेल.
अर्थात काही केसेस मध्ये मुलेच पालकांना सांगून ठेवतात कि तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घ्या. त्यामुळे पालकांची जी इच्छा असेल तसेच त्यांनी मृत्युपत्र करून ठेवावे आणि आपल्या मृत्यूनंतर काय होईल, मुले नीट वागतील ना, याचा ताण आत्ता घेऊन काहीही उपयोग नाही. आमच्या अनुभवाप्रमाणे व्यवहार, विशेषतः मृत्युपत्रात काय द्यायचे याची पूर्वचर्चा झाली आला कि नातेसंबंध बिघडतात असे दिसून येते, अर्थात सन्माननीय अपवाद असतातच. त्यामुळॆ मृत्युपत्र करून ठेवणार आहे /केले आहे एवढी कल्पना मुलांना जरूर द्यावी पण त्यात काय लिहिले आहे हे शक्यतो सांगू नये, याला अपवाद प्रत्येकाने आपल्या मुलांना ओळखून करावा. तसेच अशी माहिती दिल्यावर मुलांच्या वैवहिक जोडीदारांची मते देखील यामध्ये अप्रत्यक्षपणे यायला लागू शकतात. तसेच मृत्यूपत्राचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते कितीवेळा बदलता येते आणि सर्वात शेवटचे मृत्युपत्र ग्राह्य धरले जाते आणि मृत्यूपत्र करणारा बोलायचा थांबला कि मृत्यूपत्र बोलायला लागते असे म्हणतात. त्यामुळे उदा. एखाद्या मुलाला एखादी बँक एफडी दिली ज्याची मुलाला कल्पना तुम्ही दिली आहे , पण अशी काहीतरी वेळ आली कि तुम्हाला तुमच्या हयातीमध्ये ती एफडी मोडावी लागली, तर त्यावर मुलगा हक्क सांगू शकणार नाही कारण मृत्यूपत्र करणारा मयत झाल्यावर जेवढी मिळकत अस्तित्वात असेल तेवढीच ती पुढे जाते आणि मग तो किंतु मुलाच्या मनात राहू शकतो. .
In terrorem Clause - Forfeiture Clause - मृत्युपत्राला आव्हान दिल्यास ! मृत्युपत्राला आव्हान दिल्यास !
जर एखाद्या लाभार्थ्याच्या हट्टाविरुद्ध मृत्युपत्र केले असेल आणि तो मृत्यूपत्राला आव्हान देईल असे वाट असेल तर "जर का लाभार्थ्यांपैकी कोणीही मृत्युपत्राला आव्हान दिले तर आव्हान दिलेल्या लाभार्थ्यास मृत्युपत्रात दिलेली मिळकत मिळणार नाही किंवा अगदी शुल्लक काहीतरी मिळेल" अश्या आशयाचा "इन टेरोरेम" क्लॉज लिहून ठेवता येईल. त्यामुळे आई-वडिलांनी त्यांच्या मृत्युपत्रात काय लिहावे हे सांगण्याचा आणि जे लिहिले आहे ते वाचण्याचा कुठलाही कायदेशीर हक्क मुलांना नाही. असो. कुठलाही प्रश्न असो "विवेके क्रिया आपुली पालटावी" हे समर्थ वाचनच कायम मदतीला येते.
ॲड. रोहित एरंडे ©
Comments
Post a Comment