"सर्वात शेवटचे मृत्युपत्र ग्राह्य धरले जाते" _ ॲड. रोहित एरंडे ©

"सर्वात  शेवटचे मृत्युपत्र ग्राह्य धरले जाते" 

मी माझे मृत्युपत्र सुमारे १० वर्षांपूर्वी करून ठेवले आहे आणि मृत्युपत्राने माझी मिळकत माझ्या दोन्ही मुलांना समान पध्दतीने दिली होती, मुलीला मात्र काहीही दिले नव्हते कारण तिच्या लग्नात तिला जे द्यायचे ते मी आणि माझ्या पत्नीने दिले होते.   मात्र आता परिस्थितीमध्ये बराच बदल झाला असून मला मुलांना काहीही द्यायची इच्छा नसून  सर्व माझ्या मुलीला द्यायचे आहे. तर मला आता नवीन मृत्युपत्र करता येईल का ? त्यास मुले आक्षेप घेऊ शकतील का ?

एक वाचक, पुणे. 

खरेदिखत, बक्षिस पत्र, हक्कसोड पत्र  इ. दस्त   एकदा अंमलात आले कि ते परत बदलता येत नाहीत, पण मृत्युपत्र हा असा एकमेव दस्त आहे कि तो कितीवेळा बदलता येतो आणि सर्वात शेवटचे मृत्युपत्र हे कायद्याने ग्राह्य धरले जाते (संदर्भ : के. अम्बुनी वि. एच. गणेश भंडारी  AIR 1995 SC 2491),. कारण मृत्युपत्राची अंमल हा मृत्यूपत्रकरणारा मयत झाला कि मगच सुरु होतो. आपल्या हयातीमध्ये आपण मृत्युपत्र करून ठेवले असले तरी जो पर्यंत आपण जिवंत आहोत तो पर्यंत मृत्यूपत्र म्हणजे फक्त एक कागद आहे, त्याने कोणताही हक्क दुसऱ्याला मिळत नाही आणि आपल्या हयातीनंतरच आपण लिहून ठेवल्याप्रमाणे हक्क प्राप्त होतात. सबब तुम्ही जे मृत्यूपत्र १० वर्षांपूर्वी केलेले आहे मग  ते नोंदणीकृत असो किंवा नसो, त्याची तुम्ही जिवंत असेपर्यंत कायद्याची लेखी काही किंमत नाही आणि सबब तुम्ही  आता देखील मृत्युपत्र बदलू शकता. मृत्युपत्र करताना बऱ्याचदा आपल्या जवळच्या  व्यक्तींना समोर ठेवून मृत्युपत्राची विभागणी केली जाते आणि ते नैसर्गिक आहे. पण कधी कधी  " समझ पाये न जब अपने, पराये तो पराये थे" अशी वेळ येते आणि ज्यांना आपले मानले, ते खरे रंग दाखवतात. आयुष्यात  बऱ्याचदा आपल्या जवळच्या व्यक्तींचे असे अनुभव   येतात


मृत्युपत्र करताना त्या व्यक्तीने  सगळ्या आयुष्याचा लेखा -जोखा समोर ठेवून कोणाला काय द्यायचे  आणि कोणाला का नाही द्यायचे हे लिहिणे क्रमप्राप्त आहे. एखाद्या व्यक्तील तुम्हाला काही द्यायचे नसेल किंवा पूर्वी दिले होते पण आता ते काढून दुसऱ्याला द्यायचे असेल, तर याची कारणमीमांसा थोडक्यात लिहून ठेवणे उत्तम. कारण तुमचे मृत्युपश्चात समजा मृत्युपत्र कोर्टात गेले तर तुम्ही असे का लिहून ठेवले आहे हे सांगायला तुम्ही तिथे नसणार, पण तुम्ही असे का लिहिले असेल,   याचा विचार न्यायाधीश त्यांना स्वतःला तुमच्या खुर्चीत  बसवून  करतात.  यालाच  "आर्म-चेअर रुल ' असे म्हणतात. 

In terrorem Clause  - Forfeiture Clause -  मृत्युपत्राला आव्हान दिल्यास !  

मृत्युपत्र करणाऱ्याच्या इच्छेला सर्वांनी मान द्यावा असा अलिखित नियम असला तरी   जर एखाद्या लाभार्थ्याच्या हट्टाविरुद्ध मृत्युपत्र केले असेल आणि तो मृत्यूपत्राला आव्हान देईल असे वाटत  असेल तर   "जर का लाभार्थ्यांपैकी कोणीही मृत्युपत्राला आव्हान दिले तर आव्हान दिलेल्या लाभार्थ्यास मृत्युपत्रात दिलेली मिळकत मिळणार नाही किंवा अगदी शुल्लक काहीतरी मिळेल"  अश्या आशयाचा  "इन टेरोरेम" क्लॉज   लिहून ठेवता येईल.  त्यामुळे तुम्ही जरी मुलांना आधीच्या  मृत्यूपत्रात दिले असले, तरीही नवीन मृत्युपत्राने ते तुम्ही तुमच्या मुलीला १००% देऊ शकता.   तुमचे मृत्युपत्र हे तुमचे होम-ग्राउंड आहे, त्यामध्ये काय लिहायचे हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे, त्यात काय लिहावे हे सांगण्याचा आणि जे  लिहिले आहे ते वाचण्याचा   कुठलाही कायदेशीर हक्क मुलांना नाही. 


ॲड. रोहित एरंडे ©

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©