सही करण्याआधी खात्री करा.." "नाते आणि व्यवहार ह्यात गल्लत नको.." ॲड. रोहित एरंडे. © #किस्सेकोर्टातले

 "सही करण्याआधी खात्री करा.."

"नाते आणि व्यवहार ह्यात गल्लत नको.."

ॲड. रोहित एरंडे. © #किस्सेकोर्टातले 

कोर्टामध्ये लोकांचे मुखवटे गळून खरे चेहरे बरेचदा समोर येतात. "आपले" लोकं असे कसे वागू शकतात, ह्या प्रश्नावर बरेचदा उत्तर नसते आणि आपले "प्रेम" आडवे येते. असे गमतीने म्हणतात कि महिनाभर बदाम खाऊन जेवढी अक्कल येत नाही तेवढी  अक्कल एका विश्वासघातात येते !

एक दिवस एक  आजोबा आमच्या ऑफिस मध्ये आले. म्हणाले, "माझे वय ८५ आहे. मला २ मुले आणि २ मुली आहेत.  थोरली  मुलगी पुण्यात  राहते जी माझ्याकडे बघते, बाकीचे तिघे अमेरिकेत असतात. सगळे पैसेवाले आहेत आणि आपापल्या संसारी सुखी आहेत !.थोरल्या मुलीचा तर स्वतःचा बंगला देखील आहे" . मी म्हंटले , " वा, टाच वूड".. आजोबा म्हंटले -, जरा थांबा " मी एकटाच माझ्या फ्लॅटमध्ये राहतो. पण  थोरलीने  मला फसविले आहे असे मला वाटते आहे कारण  माझ्या फ्लॅटची  या वर्षीची  प्रॉपर्टी टॅक्सची पावती  पाहिल्यावर मला धक्काच बसला, कारण माझे जाऊन तीच नाव कसे काय आले ? मी तर रजिस्टर  विल करून ठेवले आहे आणि त्यामध्ये माझ्या सर्व मुलांना माझ्या सर्व प्रॉपर्टी मध्ये समान हक्क देऊन ठेवला आहे आणि मी मेल्यावरच ते इफेक्ट मध्ये येईल ना ? मी म्हटले बरोबर आहे. तुमच्या हयातीमध्ये तुमचे मृत्यूपत्र हा एक नुसता  कागद आहे, त्याचा उपयोग तुमच्या मृत्यूनंतरच  होईल  !!




मी विचारले, "तुम्ही काही तिला सही वगैरे कधी दिली होती का ? काही आठवते का ? त्यांनी सांगितले, "मला वयोमानाने बँकेत , मुनिसिपाल्टीत इ. ठिकाणी जायला जमत नाही. म्हणून जी थोरली पुण्यात  असते तिने एक दिवस मला  सांगितले कि बाबा तुम्ही मला पॉवर ऑफ ऍटर्नी द्या. त्याप्रमाणे   १-२ वर्षांपूर्वी आम्ही रजिस्ट्रेशन ऑफिस मध्ये गेलो होतो. तिने मला पॉवर ऑफ ऍटर्नी लिहिलेला कागद दाखवला आणि माझी सही घेतली."  मी विचारले, "तुमच्याकडे त्याची काही कॉपी आहे का ? तर ते नाही म्हणाले" . मग आम्ही जेव्हा प्रॉपर्टी सर्च घेतला आणि धक्कादायक वास्तव समोर आले कि प्रत्यक्षात ती पॉवर ऑफ ऍटर्नी नसून बक्षिस पत्र होते !! 

बक्षिसपत्राचा कायदा असा आहे कि  एकदा केले कि ते अत्यंत अपवादात्मक परिस्थिती मध्येच रद्द होते (त्यासाठी कोर्टात दावा करून आपली फसवणूक कशी झाली हे सिद्ध करावे लागते) आणि त्याची नोंदणी झाली कि मालकी लगेच ज्याच्या नावे  बक्षीस पत्र लिहून दिले आहे त्याच्या नावे  तबदील होते. त्याप्रमाणे तांत्रिक दृष्ट्या आता ती मुलगी मालक झाली होती., तरीही तिने वर्षभर थांबून मगच  टॅक्स पावतीवर नाव बदलले होते"

आजोबांना प्रचंड धक्का  बसला कारण ते म्हणाले तिने मला कधीही जाणवूनहि  दिले नाही कि तिने असे काही केले असेल  आणि मी जेव्हा ५-६ महिन्यांपूर्वी मृत्यूपत्र रजिस्टर केले तेव्हा तीच मला रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये घेऊन गेली होती आणि म्हणाली, बाबा मी काही आत येत नाही, मी बाहेरच बरी !

तर कायद्याने   बक्षीसपत्र ज्या  दिवशी नोंदविले त्याच दिवशी आजोबांची त्या फ्लॅटची  मालकी त्यांच्या थोरल्या  मुलीकडे गेली आणि त्यामुळे मृत्युपत्र जरी नंतर केले असले  तरी त्यादिवशी आजोबा त्या फ्लॅटचे मालकच नव्हते !! कारण मृत्युपत्राने आपल्या मालकीची मिळकतच देता येते ! मग आजोबा, अमेरिकेतील ३ मुले आणि आम्ही असा कॉन्फरन्स कॉल केला.. 

अमेरिकास्थित मुलांनी जे काही लागेल ते करू, आमचा हक्क ती अशी कशी काय घेऊ शकते ? कोर्टात आपण  लढूच  इ. सांगितले, . मी विचारले, " पण यासाठी   लागणार वेळ, आणि आजोबांना मदत कोण करणार ? तुमच्यापैकी कोणी येणार का ?..   ह्यावर कोणीच काही बोलले नाही. असो. 




नंतर आम्ही दावा केला आणि दुर्दैवाने आजोबांचे दावा चालू असतानाच निधन झाले. त्यांच्यावतीने वारस म्हणून दावा चालवायला  अमेरिकेतील मुले काही आली नाहीत आणि त्यामुळे प्रकरण आपोआप संपले. 




यातून  सर्वानी विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी धडा घ्यावा. कुठल्याही कागदावर सही करताना दोन वेळा वाचा. वाटल्यास तज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या. बक्षीस पत्र करायचे असेल, "जेवायला ताट  द्यावे पण बसायला पाट देऊ नये " ह्या उक्तीप्रमाणे  तर स्वतःला "life interest " म्हणजेच तहहयात त्या फ्लॅटचा उपभोग घेण्याचा हक्क ठेवता येतो तसेच ज्येष्ठ नागरिक संरक्षण कायद्याने, "माझी नीट काळजी घेईन या अटीवर मुलाला /मुलीला बक्षीस पात्र करून देत आहे, त्यात कसूर झाल्यास बक्षीस पत्र रद्द करण्याचा मी अधिकार राखून ठेवत आहे" असा स्पष्ट अट लिहिण्याची गरज आहे. अशी अट नसेल तर बक्षीसपत्र रद्द होऊ शकणार नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. सांगण्याचा उद्देश हा, कि वेळीच काळजी घेतलेली बरी,   नंतर हळहळण्यात काही उपयोग नाही. बाहेरच्या व्यक्तींनी फसवल्यास मानसिक त्रास जेवढा होतो त्यापेक्षा कितीतरी पट त्रास  रक्ताच्या नात्यातील व्यक्तींनी फसविल्यावर होतो. 

अर्थात सब घोडे बारा टक्के हा न्याय मानवी नातेसंबंधांना लावता येणार नाही. काही ठिकाणी उलटेचित्र देखील पहिला मिळू शकते. लिहिण्याचा उद्देश हाच कि   इतरांना ठेच लागली आहे, आपण शहाणे व्हावे ! 


ऍड. रोहित एरंडे. © 

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©