ताबा माझाच.. ॲड. रोहित एरंडे ©

  ताबा माझाच...


🙂 🙂
(कोर्टातील बरेच वाद हे जागेचा ताबा वाचवण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी असतात आणि म्हणूनच कायद्यामध्ये ताब्याला १० पैकी ९ मार्क असे का म्हणतात ते ह्या मजेशीर प्रसंगातून कळेल. 🙂 )
ॲड. रोहित एरंडे. ©
मागे आपण बँक लॉकरचा मजेशीर किस्सा वाचला. आता लोकाग्रहास्तव परत एकदा असाच एक पोट धरून हसविणारा किस्सा सांगतो.
मानवी स्वभावाच्या खऱ्या पैलूंचे दर्शन कोर्टामध्ये होते. सगळ्यांचे मुखवटे तिथे गळून पडलेले असतात.
कोर्टातील विविध दाव्यांपैकी घरमालक -भाडेकरू ह्यांच्यामधील दावे पूर्वी खूप हिरीरीने भांडले जायचे आणि कधी कधी कारणे देखील खूप मजेशीर असायची/. अर्थात आता जुने वाडेच राहिले नसल्याने ह्या केसेस कमी झाल्या आहेत. असो. काही वर्षांपूर्वी पुणेरी बाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पेठेमधील एका जुन्या वाड्यातील जागेची केस आम्ही घरमालकातर्फे लढवत होतो . ह्या केस मध्येएक मजेशीर प्रश्न उद्भवला की वाड्यामधील सामाईक संडास कोणाच्या ताब्यामध्ये आहे. आचार्य अत्रे म्हणायचे तसे जुन्या वाड्यांमध्ये आत गेल्या गेल्या डावी-उजवीकडे 'जय-विजय' सारखे संडास तुमचं स्वागताला असायचे. तर घरमालक -भाडेकरू दोघेही जण दुसऱ्या ठिकाणी राहत होते, परंतु संडासाचा ताबा आमच्याकडेच आहे असे दोघांचे म्हणणे होते. शेवटी कोर्टाने "कोर्ट-कमिशनर" नेमून संडासचा ताबा कोणाकडे आहे हा अहवाल मागितला. १५ दिवसांनी "कोर्ट-कमिशनर" ने ठरविलेल्या वेळी मी, तसेच भाडेकरू आणि त्यांचे वकील जागेवर जाऊन पोहोचलो. संडासाला तर बाहेरून कुलूप लावलेले होते. मात्र अर्धा तास झाला तरी आमच्या पक्षकाराचा - घरमालकाचा काही पत्ता नव्हता. त्याचा फोन देखील बंद होता.
शेवटी तासाभराने वाट बघून कोर्ट कमिशनरने त्याच्या कामाला सुरुवात केली आणि ज्याचा ताबा असेल त्याने कुलूप उघडावे असे सांगितले. भाडेकरू आमच्याकडे विजयी मुद्रेने बघत, हसत हसत पुढे आला. खिश्यामधील किल्ली बाहेर काढून कोर्ट कमिशनरला दाखवली आणि कुलूप उघडून संडासाचे दार उघडून कमिशनर कडे बघत म्हणाला, "बघा, मी म्हणत होतो ना कि ताबा आमच्याकडेच आहे, मालक तर घाबरून आला देखील नाही". मात्र आमचे सर्वांचे अवाक झालेले चेहरे बघून त्याला काही कळेना आणि आणि त्याने मागे वळून बघितले तर घरमालक संडासाच्या आत मध्ये हसत उभा होता.!! आम्हाला काहीच कळेना. तेव्हा मालकाने सांगितले की ,"अहो मला माहिती होते की हा कुलूप लावणार, म्हणून मी हळूच २ दिवसांपूर्वी कुलुपाची दुसरी किल्ली करून आणली आणि कमिशनचे काम सुरु होण्याच्या आधी अर्धा तास आधी मुलाला घेऊन आलो, माझ्या किल्लीने कुलूप उघडले आणि मुलाला परत कुलूप लावून निघून जायला सांगितले, आता तुम्हीच सांगा कमिशनर साहेब, ताबा कोणाचा ?"
शेरास सव्वाशेर म्हणतात ते असे.
भाडेकरू वगळता आम्हा सर्वांची हसून हसून पुरेवाट झाली आणि कोर्ट कमिशरने देखील तसाच रिपोर्ट दिला आणि रिपोर्ट वाचून जज साहेबांना देखील हसू अनावर झाले.
जागेच्या मालकी पेक्षाही जागेचा ताबा असणे कायम महत्वाचे असते कारण 'ताब्याला १० पैकी ९ मार्क असतात' ह्या कायदेशीर तत्वाचा मजेशीर प्रत्यय अश्या रितीने आला. रूक्ष आणि किचकट वाटणाऱ्या कायद्यांचा सहवासात असे मजेशीर प्रसंगहि येत असतात.
धन्यवाद.
ऍड. रोहित एरंडे ©
पुणे.

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©