सभासदत्व आणि मालकी हक्क यात फरक. ॲड. रोहित एरंडे ©
सभासदत्व आणि मालकी हक्क यात फरक.
ॲड. रोहित एरंडे ©
आमच्या वडिलांनी रजिस्टर्ड बक्षीसपत्राने त्यांचा फ्लॅट मला दिला, माझे नावे शेअर सर्टिफिकेट ही झाले. मात्र नॉमिनी म्हणून माझ्या भावाचे त्यांनी नाव लावले होते. वडील काही वर्षांपूर्वी गेले. मात्र अचानक आता माझ्या भावाला हे बक्षीस पत्र मान्य नाही असे म्हणून त्याने सोसायटी पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून त्याचे नाव असोसीएट सभासद म्हणून शेअर सर्टिफिकेटवर लावण्याचा हुकूम देखील मिळवला आहे, कारण पुनर्विकासाची शक्यता. आम्ही दोघेही ज्येष्ठ नागरीक आहोत. भावाची परिस्थिती उत्तम आहे, तो गेले अनेक वर्षे या फ्लॅट् मध्ये फिरकलेला नाही आणि मला हा एकच फ्लॅट आहे. तरीही भाऊ त्याचा हट्ट सोडत नाही याचे वाईट वाटते आणि आता त्याला सोसायटीच्या कामकाजात देखील भाग घ्यायचा आहे. तरी काय करावे ?
एक वाचक, मुंबई.
सोसायटीमध्ये बरेचदा मूळ सभासद मयत झाल्यानंतर त्याच्या वारसांमध्ये आणि नॉमिनी मध्ये वाद निर्माण होतात. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर तुमच्या लाभात वडिलांनी नोंदणीकृत आणि वैध बक्षीस पत्र करून दिले असेल तर त्या फ्लॅटची मालकी ही तुमच्याकडेच आहे आणि जो पर्यंत असे बक्षीसपत्राला विहित मुदतीमध्ये आव्हान देऊन तुमचा भाऊ ते सक्षम कोर्टाकडून रद्द करून आणत नाही तो पर्यंत भावाला या फ्लॅटमध्ये कोणताही मालकी हक्क नाही आणि सोसायटीच काय तर सहकार उपनिबंधक देखील या नोंदणीकृत बक्षीसपत्राच्या बाहेर जाऊ शकत नाहीत.
येथे एक महत्वाची गोष्ट परत एकदा नमूद करावीशी वाटते की "सभासदत्व" आणि "मालकी हक्क" या दोन वेगळ्या गोष्टी असतात. (बहुतांशीवेळा) सभासद त्याच्या कायदेशीर वारसालाच नॉमिनी म्हणून नेमतो, परंतु प्रत्येक नॉमिनी हा कायदेशीर वारस / हक्कदार असेलच असे नाही. एखादा सभासद त्याच्या मित्राला / दूरच्या नातेवाईकाला सुध्दा नॉमिनी म्हणून नेमू शकतो, जे अन्यथा कायदेशीर वारस होत नाहीत. "नॉमिनी म्हणजे मालक नाही, ती एक तात्पुरती सोय आहे" हा कायदा लक्षात घ्यावा. अर्थात मिळकतीच्या व्यवस्थेसाठी मृत्युपत्र अथवा तुमच्या सारखे बक्षीसपत्र इ. दस्त केले नसतील आणि नॉमिनी नेमलेला असेल तर नवीन कायद्याने नॉमिनीला तात्पुरते सभासदत्व विहित प्रक्रिया पार पाडून मिळू शकते.
कोणत्याही मिळकतीमध्ये मालकी हक्क हा बक्षीसपत्र, खरेदीखत इ. सारख्या नोंदणीकृत दस्तांनी किंवा मृत्युपत्राने मिळू शकतो किंवा वारसाहक्काने मिळू शकतो. मात्र तुमच्या लाभात नोंदणीकृत बक्षीसपत्र असल्याने तुम्ही मालक झालेला आहेत आणि जरी भावाचे नाव असोसीएट सभासद म्हणून लावले गेले असले तरीही तो मालक होत नाही आणि तुम्ही मुख्य सभासद असल्याने त्या नात्याने तुमच्या संमतीशिवाय भावाला मिटिंग मध्ये किंवा मतदानामध्ये सहभागी होता येणार नाही, कारण एक फ्लॅट एक मत असे तत्व असते. जसे एका म्यानात दोन तलवारी एकावेळी राहू शकत नाहीत तसे.
असे 'इगोचे ' वाद जेव्हा सख्ख्या भावंडांमधले असतात तेव्हा त्याचा मानसिक त्रास खूप होतो आणि अशी मानसिक शांतता बाजारात विकत मिळत नाही हे लोकांच्या लक्षातच येत नाही. " तुटे वाद संवाद तेथें करावा। विवेके अहंभाव हा पालटावा॥ " या सोप्या शब्दांत समर्थांनी मार्ग दाखविला आहे. तुमच्या पुढच्या पिढीला या वादात किती रस आहे हे एकदा विचारून बघा तेव्हा कळेल की दोघांनीही एकत्र बसून किंवा कोणत्यातरी मध्यस्थांमार्फत हे वाद तुमच्या हयातीमध्ये सोडविणे उत्तम. नाहीतर, मग यावा कोर्ट आपलाच असा !
ॲड. रोहित एरंडे ©
Comments
Post a Comment