पॉवर ऑफ ऍटर्नी - समज कमी गैरसमज जास्त. ॲड. रोहित एरंडे.©
पॉवर ऑफ ऍटर्नी - समज कमी गैरसमज जास्त.
ॲड. रोहित एरंडे.©
सर, मी एका व्यक्तीला माझी जागा विकायचे ठरवत आहे , कारण तो मला इतरांपेक्षा जास्त किंमत देऊ करत पहात आहे मात्र काही कारणांनी मला स्वतःला व्यवहार करणे शक्य होत नाही, म्हणून त्याला मालकी मिळेल यासाठी ती व्यक्ती माझ्याकडे नोटरी केलेली पॉवर ऑफ ऍटर्नी मागत आहे म्हणजे आणि आता घाई करत आहे. पण असे व्यवहार करण्यात काही धोके आहेत का ?
एक वाचक, पुणे.
"अती लोभ त्यास क्षोभ होईल जाणा " - हे समर्थ वचन इथे लागू होते. कारण जास्त किंमतीच्या लोभाने आणि तेही अनोंदणीकृत पॉवर ऑफ ऍटर्नीच्या आधारे तुम्ही जर हा व्यवहार केलात तर नंतर कोर्टाच्या पायरांवर पायऱ्या चढायची तयारी ठेवा. तरीही तुम्हाला धन्यवाद कारण तुमच्या प्रश्नामुळे पॉवर ऑफ ऍटर्नी (पीओए) म्हणजेच कुलमुखत्यारपत्र या अत्यंत महत्वाच्या विषयाबद्दल कायदेशीर तरतुदींची थोडक्यात माहिती बघू.
पॉवर ऑफ ऍटर्नी ऍक्ट १८८२ आणि कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट १८७२ मध्ये या बद्दलच्या तरतुदी आढळून येतात. *आपल्या वतीने ठराविक गोष्टी करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीस दिलेले अधिकार पत्र म्हणजे पॉवर ऑफ ऍटर्नी अशी व्याख्या १८८२ च्या कायद्यामध्ये केलेली आढळते. जी व्यक्ती पीओए देते त्या व्यक्तीस "प्रिन्सिपल" तर जी व्यक्ती पीओए लिहून घेते त्या व्यक्तीस "एजंट" म्हटले जाते.*
ढोबळ मानाने पीओए चे दोन प्रकार होतात, जनरल आणि स्पेसिफिक. एखादे विशिष्ट काम करण्यासाठी स्पेसिफिक पीओए दिली जाते, तर अनेक गोष्टी आपल्या वतीने करणायसाठी दिलेली उदा. मुले-मुली परदेशी जाताना त्यांच्या आई-वडिलांना लिहून देतात अश्या पीओएला जनरल पीओए म्हणता येईल.
१. कायद्याने सज्ञान असलेली आणि मानसिक संतुलन न ढळलेली कोणतीही व्यक्ती पीओए देऊ आणि घेवू शकते. लिहून देणारे आणि घेणारे एका पेक्षा जास्त व्यक्ती असू शकतात, त्याला जॉईन्ट पीओए म्हणतात. पीओए वरती दोन साक्षीदारांच्या सह्या असणे व्यवहारात उपयोगी पडू शकते.
२. पीओए मध्ये जेवढे आणि जसे सांगितले तेवढेच काम एजंटला करता येते. जे अधिकार दिलेले नाहीत त्याबद्दल काहीही काम एजंटला करता येत नाही. . सबब पीओए मधील अति काळजीपूर्वकच लिहाव्यात.
३. एजंट जी काही 'कायदेशीर' कामे करतो, ती कामे आणि त्यांचे परिणाम 'प्रिन्सिपल' वर बंधनकारक असतात, थोडक्यात 'प्रिन्सिपल' ने स्वतःच ती कामे केली आहेत असे समजले जाते. मात्र एजंटने स्वतःहून कोणाची फसवणूक केल्यास किंवा बेकायदेशीर कामे केल्यास त्याची जबाबदारी 'प्रिन्सिपलवर येत नाही. .
४. रजिस्ट्रेशन (नोंदणी) आणि स्टँम्प ड्युटी : जागेचे खरेदी विक्री करण्यासाठी किंवा जागेतील मालकी हक्क तबदील करण्यासाठी रजिस्टर्ड पॉवर ऑफ ऍटर्नी गरजेची असते, जी तुमच्या बाबतीत दिसून येत नाही. इतर बाबतीत उदा. बँकांचे व्यवहार, कोर्टाचे कामकाज इ. साठी नोटराइज्ड सुद्धा चालते. वैवाहिक जोडीदार, रक्ताचे नातेवाईक यांनी एकमेकांना दिल्या घेतल्या जाणाऱ्या विनामोबदला पीओए साठी महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्ट मध्ये विशेष तरतुदी आहेत. परदेशामध्ये वकिलातीसमोर केलेली पॉवर ऑफ ऍटर्नी येथे विहित प्रोसिजर केल्यानंतरच वापरता येते.
५. प्रिन्सिपल किंवा एजंट यांच्या परस्पर संमतीने किंवा दोघांपैकी कोणाचा मृत्यू झाला किंवा दोघांपैकी कोणी एक दिवाळखोर झाले किंवा कोणाचे मानसिक संतुलन ढळले तर पीओए रद्द होते. तसेच एखाद्या विशिष्ट कालावधीसाठी किंवा कामासाठी पीओए दिली असेल, तर असा कालावधी किंवा काम संपल्यानंतर पीओए रद्द होते. मात्र कॉन्ट्रॅक्ट कायदा कलाम २०२ अन्वये जर का काही हितसंबंध एजंटच्या लबाहात निर्माण झाले असतील तर पीओए रद्द होणे अवघड असते.
*जागेचे खरेदी खत करण्यासाठी दिलेली पॉवर ऑफ ऍटर्नी आणि जागा खरेदी घेणाऱ्याला खरेदीखता ऐवजी पॉवर ऑफ ऍटर्नीच लिहून देणे ह्या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत.*पूर्वी दिल्ली, उत्तर प्रदेश , हरियाणा ह्या भागामध्ये 'सेल -पॉवर ऑफ ऍटर्नी' या प्रकारामध्ये खूप गैरप्रकार झाले होते. सबब अखेर मा. सर्वोच्च न्यायालयाने 'सूरज लॅम्प इंडस्ट्री विरुद्ध हरियाणा राज्य' ह्या याचिकेवर २००९ आणि २०११ मध्ये निकाल देऊन हे स्पष्ट केले की केवळ अश्या पॉवर ऑफ ऍटर्नीच्या आधारावर जागा विकत घेणाऱ्याला जागेमध्ये मालकी हक्क मिळत नाही, केवळ नोंदणीकृत खरेदीखतानेच जागेमध्ये मालकी हक्क प्राप्त होतो.
असा हा पॉवर ऑफ ऍटर्नीचा दस्त खूप महत्वाचा आहे, उपयोगी आहे. इतर कुठल्याही व्यवहाराप्रमाणेच परस्पर विश्वास हा याही दस्ताचा पाया आहे म्हणून हा दस्त दुधारी तलवारीसारखाही आहे. त्यामुळे पॉवर ऑफ ऍटर्नी सारखा दस्त तयार करताना आणि त्यावरील व्यवहार करताना तज्ञ् वकीलांचा सल्ला घेणे उपयोगी ठरेल.
ॲड. रोहित एरंडे.©
Comments
Post a Comment