"मोल" गृहिणीच्या कामाचे...: ॲड. रोहित एरंडे ©
"मोल" गृहिणीच्या कामाचे...
कधी दिवसांपूर्वी कॉलेजमधील मित्रमंडळी बऱ्याच दिवसांनी एकत्र जमलो होतो. हास्य विनोद चालू होते. सगळ्यांची मुले, सध्या ज्यांना "चुणचुणीत" म्हणतात, ती देखील सामील झाली होती . काम-धंदयाबरोबरच घरातले काम पण सर्वांनी वाटून घेतले पाहिजे असा विषय चालू असताना एक मुलगा म्हणाला, घरकाम हे काही आमचे काम नाही, ते आई करते, मी बाबासारखा मोठा बिझनेसमन होणार, तो खूप काम करतो आणि पैसे कमावतो ... क्षणभर एकदम शांतता पसरली आणि आमचं मैत्रिणीच्या डोळ्यात टचकन पाणी आले. कॉलेज दिवसात टॉपर असणारी आणि नंतर स्वतःचे बुटीक सुरु करणारी हुशार मुलगी डोळ्यासमोर आली.
हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे दरवर्षी ३ नोव्हेंबर हा दिवस जागतिक गृहिणी दिवस म्हणून साजरा केला जातो. गृहिणी म्हणजे Housewife असे म्हणतात. मात्र २०२३ मध्ये तत्कालीन सरन्यायाधीश श्री. धनंजय चंद्रचूड यांच्या पुढाकाराने सर्वोच्च न्यायालयाने A Handbook on Combating Gender Stereotypes अशी पुस्तिका प्रसिध्द केली आणि त्यामध्ये सर्वप्रथम Housewife ऐवजी Homemaker हा शब्द वापरावा असे नमूद केले आहे. या निमित्ताने "होय, गृहिणीच्याही कामाचे मोल असतेच" असे नमूद करणाऱ्या मा. सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्वपूर्ण निकालाची आठवण होते आणि योगायोगाने तोही निकाल न्या. धनंजय चंद्रचूड यांचाच आहे.
डेंग्यू आजाराने घरटी एक तरी व्यक्ती कधीना कधीतरी आढळून येते. मात्र हा आजार कधी कधी जीवावर देखील बेतू शकतो. 'अरुण कुमार मांगलिक विरुद्ध चिरायू हेल्थ आणि मेडिकेअर प्रा. लि या केस मध्ये राष्ट्रीय ग्राहक आयोगाचा निर्णय फिरवताना मा. सर्वोच्च न्यायालायच्या न्या. धनंजय चंद्रचूड आणि न्या. हेमंत गुप्ता ह्यांच्या खंडपीठाने डेंग्यू पेशंटच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यामुळे तब्बल १५ लाख रुपयांचा दंड भोपाळ मधील एका हॉस्पिटलला ठोठावला, मात्र संचालक डॉक्टरांची निष्काळजीपणच्या आरोपातून मुक्तता केली. ' .
प्रचलित जागतिक मानकांप्रमाणे उपचार करणे अनिवार्य :
मा. सर्वोच्च न्यायालायने सर्व कागदपत्रांचा, वैद्यकीय पुस्तकांचा विचार करून आणि बाजूंचा युक्तिवाद ऐकून याचिकाकर्त्याच्या बाजूने निकाल दिला. दरम्यान भारतीय वैद्कयीय परिषदेने देखील डॉक्टरांनी निष्काळजीपणा केला का हे तपासण्यासाठी स्वतंत्र 'नैतिकता समिती' नेमली होती. ह्या समितीने देखील, डॉक्टरांनी जरी प्रचलित मानकांप्रमाणे उपचार केले असले तरी त्यांनी ते योग्य वेळेत केले नाही हे कागदपत्रांवरून दिसून येते, असा अहवाल दिला आणि पुन्हा असे घडू नये अशी तंबी देखील डॉक्टरांना दिली
मा. सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले की जागतिक आरोग्य परिषदेने, डेंग्यू आणि त्याचे प्रकार, त्याच्या वेग वेगळ्या पायऱ्या आणि त्या प्रमाणे द्यायला पाहिजेत ते उपचार ह्याची जंत्रीच दिलेली आहे. भारतामध्ये देखील ही उपचार सूत्री मान्य झाली आहे. त्यामध्ये डेंग्यू झालेल्या पेशंटची वेळोवेळी प्लेटलेट्स काऊंट तपासणे, वेळोवेळी रक्त तपासणी करणे, त्यांच्या शरीरातील फ्लुईडचे संतुलन राखणे ह्या गोष्टींचा प्रामुख्याने अंतर्भाव होतो. मात्र ह्या केसमध्ये वरील कुठल्याच गोष्टींचे पालन डॉक्टरांनी केलेले दिसून येत नाही आणि ह्यामुळे पेशंटला आपला जीव गमवावा लागला असे कोर्टाने पुढे नमूद केले. पेशंटच्या नातेवाईकांनी रक्त तपासणीस विरोध केला असता, हा हॉस्पटिलचा युक्तिवाद म्हणजे मनाचे खेळ आहेत असे कोर्टाने सखेद नमूद केले. (अर्थात निकालाच्या या भागावरडॉक्टरांकडून ना पसंती दर्शिविण्यात आली होती.) मात्र पुढे डॉक्टरांना दिलासा देताना सर्वोच्च न्यायालयाच्याच पूर्वीच्या अनेक निर्णयांचा उहापोह करून पुढे न्यायालायने नमूद केले की रुग्णाच्या मृत्यूला डॉक्टरांचाच निष्काळजीपणा कारणीभूत असतो असे कुठलेही गृहितक नाही
गृहिणी (Housewife) असली तिच्याही कामाचे मोल असतेच : गृहिणीचे महत्व
प्रश्न राहिला नुकसान भरपाई देण्याचा. राज्य आयोगाने नुकसान भरपाई देतांना नमूद केले की मयत महिला ही एक गृहिणी होती आणि त्यामुळे रु. ६ लाख एवढी रक्कम पुरेशी होईल. मात्र सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आपल्या अर्धांगिनीला असे अचानक गमावणे ह्या सारखे दुःख कोणत्याही नवऱ्याला नसेल. जर कमावती महिला असेल तर तिचे उत्पन्न किती हे सहज काढता येते. मात्र सर्व घर सांभाळणाऱ्या गृहिणीचे काम हे कुटुंबाच्या कल्याणाकरिता खूप महत्वाचे असते आणि तिच्या कामाचे आणि भावनांचे मोल मोजणे शक्य असले तरी अश्या केसेसमध्ये ते पैशात मोजणे काही गैर नाही आणि त्यास कमी लेखता येणार नाही. तसेच सबब कोर्टाने सर्व परिस्थितीचा विचार करून याचिकार्त्यास १५ लाख रुपयांची भरपाई ९% व्याजासह देण्याचा हुकूम केला.
अशाच स्वरूपाचा निकाल अलिकडेच न्या. सूर्य कांत (जे पुढे सरन्यायाधीश होणार आहेत) आणि न्या. के. व्ही. विश्वनाथन यांच्याही खंडपीठाने देताना गृहिणीचे काम हे कमावत्या कौटुंबिक सभासदाच्या योगदानाइतकेच मह्त्वाचे असते असे नमूद केले आहे.
खरेतर गृहिणी असणे हे खूप महत्वाचे आणि जबाबदारीचे काम आहे. 'ऑन ड्युटी २४ तास' असे हे कामाचे स्वरूप !! आज पर्यंत बहुतांशी मध्यमवर्गयी घरांमध्ये आईने घरची आघाडी सांभाळायची आणि वडिलांनी बाहेरची असे चालू असे. त्याचप्रमाणे अनेक घरांमध्ये स्वतःची नोकरी सांभाळून गृहिणीची भूमिका व्यवस्थितपणे पार पाडलेल्या अनेक महिला आपल्या आजूबाजूला दिसून येतील. प्रश्न असा आहे की घरकाम करणे म्हणजे दुय्यम आणि पैसे मिळविणे म्हणजेच महान असा समज मुलांचा होत असेल किंवा आपल्याकडून कळत-न कळत करून दिला जात असेल तर ते चुकीचेच आहे. आपला समाज अश्या वर्गीकरण करण्यामध्ये एकदम पुढे असतो. उदा. मुलगी झाली की गुलाबी रंगाचे कपडे आणि भेट म्हणून बार्बी आणि मुलगा झाला की निळ्या रंगाचे कपडे आणि गाड्या भेट द्यायचे असा शिरस्ता कदाचित अश्याच पद्धतीतून पुढे आला आहे.
घरकाम म्हणजे महिलांचा इलाका असे वर्गीकरण असणाऱ्या समाजात काही घरांमध्ये, ज्याचे प्रमाण तुलनेने कमी असेल, बाबा देखील "homemaker च्या भूमिकेत असल्याचे आणि बाबाने ही भूमिका नीट पार पाडल्याचेही ही दिसून येते. स्वतः उच्च विद्याविभूषित असूनही बायकोच्या करिअर साठी दोघांनी मार्ग काढून बाबाने घरकामाची जबाबदारी घेतल्याची कमी, पण ठळक उदाहरणे आहेत. मात्र अश्या बाबांच्या वाटेला "बायकांसारखा घरी बसून असतो किंवा बायकोच्या जीवावर जगतो" असे टोमणे बऱ्याचदा नशिबी येतात. अर्थात आई-बाबांमध्ये विचारांची स्पष्टता असली की "कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना" या गाण्याप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य असते. कारण "ती चार " लोकं काही आपल्या मदतीला येणार नसतात. तसेच कोरोना नंतर सुरु झालेल्या 'वर्क फ्रॉम होम' मुळे नवरा -बायको दोघेही होममेकर आणि ब्रेड-विनर झालेले आहेत. असो. त्या चुणचुणीत मुलाला त्याच्या बाबाने शाब्दीक माराने "आईने घर नीट सांभाळले म्हणून तुझे आणि माझे नीट चालले आहे" असे नीट समजावले.
ॲड. रोहित एरंडे.
Comments
Post a Comment