"पुनर्विकास आणि पर्यायी जागेच्या भाड्याचे प्रश्न : ॲड. रोहित एरंडे ©
"पुनर्विकास आणि पर्यायी जागेच्या भाड्याचे प्रश्न
ॲड. रोहित एरंडे ©
आमच्या सोसायटीची रिडेव्हलपमेंट प्रक्रिया सुरु झाली आहे. यामध्ये २-३ बीएचके सदनिक धारक आणि काही दुकानदार आहेत. आम्हा सर्वांना पर्यायी जागेचे भाडे वेगवेगळे मिळणार आहे, दुकानदारांना सगळ्यात जास्त पैसे मिळणार आहेत. आम्ही काही सभासद ताबा द्यायला तयार आहोत, पण काही सभासदांना पर्यायी जागा अजून मिळाली नाही आणि म्हणून ते ताबा सोडू शकत नाहीत आणि पूर्ण जागेचा ताबा मिळाल्यावरच बिल्डर आमचे भाडे द्यायला सुरु करणार आहे. याबाबत कृपया मार्गदर्शन करावे.
एक वाचक, कोथरूड, पुणे
पुनर्विकास पाहावा करून अशी नवीन म्हण तयार झाली आहे. पुनर्विकासाचा प्रत्येक टप्पा महत्वाचा असतो आणि प्रत्येक केस ही वेगळी असते. सभासदाला किती वाढीव जागा मिळणार, , आर्थिक मोबदला उदा. पर्यायी जागेसाठीचे भाडे, एजंट कमिशन , घर सामान हलविण्यासाठीचा ट्रान्सपोर्ट खर्च, कॉर्पस फंड इ. सोयी- सुविधा, अटींचा भंग झाल्यास काय पेनल्टी राहणार इ. गोष्टी सोसायटी -बिल्डर यांच्यात वाटाघाटी होऊन निश्चित केल्या जातात आणि त्यांचा उल्लेख डेव्हलपमेंट ऍग्रिमेंट -विकसन करारनामा, कुलमुखत्यारपत्र आणि नवीन फ्लॅटसाठीचा PAAA करारनामा यात होणे गरजेचे असते आणि यासाठी सोसायटीने स्वतःचे वकील, सी. ए, आर्किटेक्ट अश्या तज्ञ व्यक्तींची नेमणूक करणे खूप महत्वाचे आहे.
पर्यायी जागेचे भाडे हा सगळ्या सभासदांचा जिव्हाळ्याचा विषय असतो, कारण नविन बिल्डिंग पूर्ण होऊन नवीन फ्लॅटचा ताबा मिळेपर्यंत जो काही २-३ वर्षांचा काळ असतो त्या काळात पर्यायी जागेत राहण्याशिवाय पर्याय नसतो. अपवाद ज्यांचे स्वतःचे दुसरे फ्लॅट आहेत असे सभासद. पण बहुतांशी सभासदांना पर्यायी फ्लॅट शोधणे गरजेचे असते आणि सध्या सगळीकडे पुनर्विकासाचे काम जोरात असल्यामुळे आपल्या बजेटमध्ये मिळणारा आणि राहण्यास चांगला, मुलांच्या शाळा, कॉलेज जवळचा असा फ्लॅट मिळणे म्हणजे गावाकडे म्हणतात तसे आखूड शिंगी, कमी चारा खाणारी पण जास्त दूध देणारी गाय मिळण्यासारखेच आहे असे म्हणावे लागेल. त्याचप्रमाणे बिल्डर जेव्हा जागा सोडायची नोटीस देतो, त्यावेळेला जागा शोधायला लागल्यास नोटीसच्या त्या ३-०४० दिवसात फ्लॅट मिळून सामान हलविणे हे शक्य होतेच असे नाही. लेखी नोटीस देण्याआधी देखील जागा कधी खाली करावी लागेल याची तोंडी कल्पना बिल्डर देत असतात, त्यामुळे प्रॅक्टिकली कमीत कमी १-२ महिन्याचे भाडे आपल्या खिशातून घालावे लागते, तेव्हा आपल्याला पसंत असलेल्या फ्लॅटमध्ये आपण जाऊ शकतो, असा अनुभव आहे.
काही ठिकाणी नोटीस कालावधी मध्ये जर सभासदाने जागा सोडली नाही तर अशा सभासदकडून दंड आकारता येईल अशीही तरतूद करारात करून ठेवतात, ज्यामुळे उगाचच होणारी अडवणूक थांबते. तसेच सभासदाची प्रामाणिक (genuine) अडचण असेल, तर बिल्डर देखील प्रत्येकवेळा नियमावर बोट ठेवत नाहीत.
भाड्याची रक्कम ही तुमच्या सध्याच्या फ्लॅटच्या क्षेत्रफळाशी निगडित असते आणि त्याचा दर किती असावा हे करारात नमूद केले असते आणि त्यामुळे जेवढा फ्लॅट मोठा तेवढी ही रक्कम आपोआप वाढते, त्यामध्ये मेंटेंनन्स सारखी समानता येणार नाही. हा दर किती असावा हे प्रत्येक केस प्रमाणे ठरते आणि यासाठी वाटाघाटी करण्याचे कौशल्यही तितकेच महत्वाचे असते. तसेच दुकानदारांना केवळ महिन्याचे भाडे देऊन भागत नाही, कारण त्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय बंद होणार असतो, म्हणून दुकानदारांना मिळणारी ही रक्कम फ्लॅटधारकांपेक्षा नेहमीच जास्त असते असे दिसून येईल .
तसेच एक लक्षात घ्यावे की ५१% टक्के सभासदाची संमती असो किंवा १००%, जो पर्यंत संपूर्ण जागेचा ताबा बिल्डरला मिळत नाही तो पर्यंत बिल्डर त्याचे काम सुरु करू शकत नाही आणि म्हणूनच बिल्डर पूर्ण ताबा मिळाल्याशिवाय भाडे देत नाही. काही वेळा आडमुठ्या सभासदांमुळे ताबा देणे लांबते आणि याने इतरांचे नुकसान होते, पण त्याला कोर्ट किंवा कमी खर्चाचा परस्पर सामंजस्य, हेच उपाय आहेत.
ॲड. रोहित एरंडे ©
Comments
Post a Comment