सामायिक जागेचा वापर खासगी वापरासाठी नको. ॲड. रोहित एरंडे ©

 मी पुण्यातील एका सोसायटीमध्ये शेवटच्या - ७व्या मजल्यावर राहतो. मी माझ्या दरवाजाबाहेरील भिंतीला लागून एक लाकडी कपाट चप्पल ठेवण्यासाठी ठेवले आहे. मात्र माझ्या शेजाऱ्याने यावर हरकत घेऊन सोसायटीकडे तक्रार केली  आहे की नियमाप्रमाणे कॉरीडोअर , जिना, इ. कॉमन जागेत अश्या कुठल्याही वस्तू ठेवता येणार नाहीत. बाकी प्रत्येक मजल्यावर काही जणांनी लोखंडी रॅक, कपाटे ठेवली आहेत तर काहींनी चक्क सुरक्षिततेसाठी पॅसेजला दार करून तो आत घेतला आहे. कॉरीडोअरचा असा वापर करणे गुन्हा आहे का ? कायदा काय सांगतो ?


एक वाचक, पुणे. 

 तुमच्यासारखे प्रश्न बहुतेक ठिकाणी दिसून येतात, फक्त तक्रारी होण्याचे प्रमाण अत्यल्प असते !  सोसायटी असो वा अपार्टमेंट, सभासदाला   जसे  काही हक्क प्राप्त होतात त्याचबरोबर त्याला काही कर्तव्ये देखील पार पाडायची असतात आणि दोन्ही ठिकाणी सभासदाला सामायिक (common ) जागेचा वापर खासगी कारणाकरिता करता येत नाही. या आपल्या प्रश्नाचा विचार करिता कायदेशीर तरतुदी आदर्श उपविधी आदर्श उपविधी क्र. १६९ (अ) मध्ये स्पष्ट केल्या आहेत. 

आपल्याला जेवढी जागा करारनाम्याने मिळाली आहे तेवढीच जागा वापरण्याचा अधिकार सभासदाला असतो. मोकळ्या  पॅसेजला ग्रील लावणे आणि  जादाची  जागा वापरणे असे प्रकार सर्रास बघायला मिळतात आणि कायद्याच्या भाषेत ह्याला अतिक्रमण (एन्क्रोचमेंट) असे म्हणता येईल. 

वरील  तरतुदींप्रमाणे  जिना, पायऱ्या, लँडिंग एरिया, सामायिक पार्किंग स्पेस, कॉरिडॉर आणि अश्या प्रकारच्या इतर सर्व मोकळ्या /सामायिक जागा या  सर्व सभासदांच्या वापराकरिता असल्याने  कोणत्याही एका सभासदाला त्यावर हक्क सांगता येणार नाही आणि कोणताही सभासद हा अश्या जागा  बळकावू शकत नाही व  ह्या सर्व जागांचा उपयोग हा त्या जागा ज्या कारणाकरिता दिल्या आहेत त्याच करता झाला पाहिजे, असेही पुढे नमूद केले आहे. 

ज्या सभासदाने अश्या प्रकारचे अतिक्रमण केले असेल ते त्यांनी त्वरित काढून घेणे गरजेचे आहे आणि अश्या सभासदाने जितका काळ अश्या जागांवर अतिक्रमण केले असेल तेवढ्या कालावधी करता मासिक देखभाल खर्चाच्या पाचपट इतकी रक्कम देणे बंधनकारक राहील. अर्थात याची अंमलबजावणी हाच कळीचा मुद्दा आहे. 


त्याचप्रमाणे कुठल्याही सभासदाला सोसायटीच्या आणि महानगर पालिकेच्या परवानगीशिवाय मंजूर नकाशाच्या बाहेर जाऊन कुठल्याही प्रकारचे बांधकाम, रचनात्मक (स्ट्रक्चरल ) बदल करता येत नाहीत, ही  महत्वाची तरतूद पुढे दिली आहे. तसेच  उपविधी ४८(अ) प्रमाणे  कुठल्याही सभासदाला आपले वर्तन किंवा कृत्य हे इतर सभासदांना उपद्रवकारक आणि त्रासदायक ठरेल असे होणार नाही याची काळजी घेणे बंधनकारक आहे आणि अश्या वर्तनाविरुद्ध कमिटीला स्वतःहून किंवा तक्रार अर्ज आल्यास कारवाई करण्याचे अधिकार आहेत आणि इथे तुमच्या मॅनेजिंग कमिटीवरची जबाबदारी वाढली आहे अन्यथा  संबंधित उद्विग्न सभासदाला रजिस्ट्रारकडे तक्रार करता येईल.   आपल्या केसमध्ये मुव्हेबल चप्पल स्टॅन्ड किंवा कायमस्वरूपी केलेले ग्रील याची तुलना होणार नाही असे वाटले तरी नियमावर बोट ठेवल्यास दोन्ही घटना  कायद्याच्या एकाच तराजूने तोलले जाईल आणि सर्वांविरुध्द कारवाई केली तरच माझ्याविरुद्ध करता येईल असा बचाव टिकणार नाही.  अर्थात  वरील कृत्ये ही "गुन्हा" नसून दिवाणी स्वरूपाची आहेत.   


 ॲड. रोहित एरंडे ©

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©