श्वशुरगृहात विधवा सुनेचे हक्क. ॲड. रोहित एरंडे ©

 श्वशुरगृहात विधवा सुनेचे हक्क. 

ॲड. रोहित एरंडे ©

माझ्या मित्राचे नुकतेच अचानक निधन झाले. त्याच्या वडिलांची स्वकष्टार्जित भरपूर संपत्ती आहे, परंतु सासू-सासरे आणि त्यांची सून म्हणजेच माझ्या मित्राची बायको यांचे अजिबात पटत नाही, त्यामुळे ती दोन मुलांना घेऊन माहेरी गेली आहे. सासऱ्यांची स्वतःची भरपूर संपत्ती आहे, परंतु ते या सुनेला काहीही देणार नाही असे म्हणतात. सासऱ्यांना   अजून १ मुलगा आणि १ मुलगी पण आहेत. तर माझी मित्राची  बायको सासऱ्यांच्या मिळकतीवर हक्क सांगू शकते का, त्यासाठी केस करता येईल असा सल्ला काहींनी दिला आहे  ?



मालकी हक्काबाबत आपल्याकडे अनेक गैरसमज आहेत त्यातील प्रमुख ३ गैरसमज नमूद करणे गरजेचे आहे   (१)  अनेक लोकांना असे वाटत असते कि वैवाहिक साथीदाराच्या मृत्यूनंतर केवळ उर्वरित जोडीदाराच आपोआप एकटा १००% मालक बनतो;  (२)   करारात पहिले नाव ज्याचे असते त्याचा हिस्सा किंवा अधिकार हा दुसरे नाव असलेल्यापेक्षा जास्त असतो आणि पहिले नाव असलेली व्यक्ती मयत झाली की  आपोआप सर्व हक्क दुसरे नाव असलेल्या व्यक्तीलाच मिळतो आणि (३) ७/१२ किंवा प्रोजेप्रती कार्ड हे मालकी हक्काचे पुरावे आहेत !!

   आता आपल्या प्रश्नाकडे वळू. सर्वप्रथम तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या सासऱ्यांची स्वकष्टार्जित मिळकत असल्याने त्यांच्या हयातीमध्ये केवळ पत्नी म्हणून  आणि मुले -मुली आहेत म्हणून जन्मतःच कोणताही हक्क प्राप्त होत नाही आणि त्यामुळे जर त्यांच्या मुलालाच हक्क नसेल, तर सुनेला कुठून येणार ? आपल्या स्वकष्टार्जित मिळकतीचे काय करायचे म्हणजे कायद्याच्या भाषेत त्याचा उपभोग घ्यायचा का मिळकत विकायची का दान करायची   हा सर्वस्वी त्या मिळकतीच्या मालकाचा म्हणजेच या केस मध्ये  सासऱ्यांचा हक्क आहे. या परिस्थितीमध्ये  नवऱ्यालाच कोणताही हक्क नसल्याने बायकोला किंवा तिच्या   मुलांना कोणताही मालकी हक्क या मिळकतींमध्ये आत्ता मिळणार नाही 

पुढे सासऱ्यांचे निधन झाले आणि त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये कोणतेही मृत्युपत्र करून ठेवले नाही, तरच  अश्या स्थितीमध्ये हिंदू  वारसा कायद्याचे  कलम  ८ लागू होऊ शकेल ज्या अन्वये  सर्व प्रथम त्यांचे क्लास-१ हेअर्स  ज्यांच्यामध्ये प्रामुख्याने    विधवा पत्नी, मुलगा -मुलगी (मुले) ,आई (हयात असल्यास)  ,   मुलगा -मुलगी आधीच मयत झाली असतील तर त्यांची मुले (नातवंडे), मुलाची विधवा पत्नी (सून)   या  वारसांना  समान पद्धतीने मिळकतीमध्ये हक्क मिळेल. हाच न्याय तुमच्या मयत मित्राच्या संपत्तीला पण लागू होईल. 

राहिला प्रश्न कोर्टात जाण्याचा. असा सल्ला देणार "निम हकीम" सगळीकडे असतात आणि जे पिना मारून नामे निराळे राहतात आणि मनस्ताप मात्र सल्ला मानणाऱ्यांना होतो. कोर्टात जाण्याचा हक्क प्रत्येकाला आहे, परंतु कोर्टात गेले म्हणजे निकाल आपल्याच बाजूने लागेल असे नसते आणि आपल्या केसमध्ये तर आत्ता   कोर्टात जाऊन काहीही साध्य होणार नाही., उलट वेळ, पैसे आणि बाजारात नि विकत मिळणारी मानसिक शांतता मात्र नक्की खर्च होईल. सासू सासरे आणि सून  या नात्याची  केमिस्ट्री घराप्रमाणे बदलते आणि तुमच्या केसमध्ये ही केमिस्ट्री दुरुस्त होतीय का याचे प्रयत्न करून बघा, कदाचित नातवंडे हा सामान धागा असू शकेल. 


 ॲड. रोहित एरंडे ©


Comments

  1. अशी मॅटर सोसायटी समोर आली की काय करावे. कारण सोसायटी चेअरमन , सेक्रेटरी, कार्यकारिणी समिती सदस्य ह्यांना सुद्धा कायद्याचे ज्ञान नसते

    ReplyDelete
    Replies
    1. Society should get a legal opinion and also can ask the members /heirs to give necessary undertaking /bond in favor of the society

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©