स्वकष्टार्जित मिळकतीमध्ये हट्ट करून हक्क मिळत नाही ऍड. रोहित एरंडे.©
स्वकष्टार्जित मिळकतीमध्ये हट्ट करून हक्क मिळत नाही
ऍड. रोहित एरंडे.©
माझे वय आता ७५ झाले आहे. मी कष्टाने काही मिळकती करून ठेवल्या आहेत. मला २ मुले आणि एक मुलगी आहे. मोठा मुलगा मागील वर्षी अचानक गेला. आता त्याची बायको आणि मुले माझ्या मिळकतीमध्ये हक्क द्याच असा हट्ट करू लागली आहेत. कुठून कुठून निरोप पाठवत आहेत. मला आणि माझ्या पत्नीला याचे टेन्शन येते आहे. कायद्याने माझ्या सुनेला आणि नातवंडांना असा हक्क मला द्यावा लागेल का ?
एक वाचक, पुणे.
हक्क असणे आणि हक्काचा हट्ट करणे या दोन वेगवेळ्या गोष्टी आहेत आणि हट्ट करून नसलेला हक्क निर्माण होत नाही.
एखाद्या मिळकतीमध्ये मालकी हक्क हा व्यक्तींच्या हयातीमध्ये खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाटप-पत्र यांसारख्या नोंदणीकृत दस्तानेच आणि एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या मिळकतीमधील मालकी हक्क हा मृत्यूपत्राने (टेस्टमेंटरी सक्सेशन) किंवा मृत्यूपत्र केले नसेल तर वारसा हक्काने (इंटेस्टेट सक्सेशन ) तबदील होऊ शकतो. कोणत्याही हिंदू स्त्री- पुरुषांच्या स्वकष्टार्जित मिळकतीमध्ये त्यांच्या हयातीमध्ये त्यांच्या वैवाहिक जोडीदाराला, मुलांना देखील कुठलाही मालक हक्क मिळत नाही, त्यामुळे सुनबाई / जावई आणि नातवंडे तर खूपच दूर राहिले.
अर्थात एखादा हिंदू पुरुष आणि स्त्री मृत्यूपत्र न करता मरण पावले तर त्यांच्या स्वकष्टार्जित संपत्तीची विभागणी वेगवेगळ्या तरतुदींप्रमाणे होते. ह्यासाठी ढोबळ मानाने वारसांची क्लास-१ -हेअर्स (वारस) आणि क्लास-२-हेअर्स (वारस) अशी विभागणी केलेली आढळते. .
*हिंदू पुरुष आणि मिळकतीचे विभाजन* :
एखादा हिंदू पुरुष मृत्यूपत्र न करता मरण पावल्यास त्याची स्वकष्टार्जित मिळकत हि हिंदू वारसा कायद्याच्या कलम ८ अन्वये सर्व प्रथम क्लास-१ हेअर्स ज्यांच्यामध्ये प्रामुख्याने त्याची विधवा पत्नी, मुलगा -मुलगी (मुले) ,आई , मुलगा -मुलगी आधीच मयत झाली असल्यास त्यांची मुले (नातवंडे), मुलाची विधवा पत्नी (सून) इ. चा समावेश होतो, या वारसांना समान पद्धतीने मिळेल आणि जर का क्लास-१ वारसांपैकी कोणीही नसेल, तर मग क्लास-२ वारसांकडे अशी संपत्ती जाते, ज्या मध्ये प्रामुख्याने वडील, मुलाच्या किंवा मुलीच्या मुलीचा मुलगा किंवा मुलगी (पतवंडे), भाऊ -बहीण, चुलते इ. यांचा समावेश होतो.
त्यामुळे तुम्ही तुमची मिळकत तुमच्या हयातीमध्ये तुम्हाला पाहिजे तशी उपभोगू शकता किंवा ती तबदील करू शकता, त्यामध्ये तुमच्या सुनेला, नातवंडाना आत्ता काहीही मालकी हक्क नाही . मात्र जर दुर्दैवाने तुम्ही मृत्युपत्र न करता मरण पावलात तर मात्र तुमच्या सुनेला आणि नातवंडांना तुमच्या मयत मुलाचा अविभक्त हक्क समान पद्धतीने विभागून मिळेल.
बरेचदा "ना-ते- वाईक" असा अनुभव अनेकांना येत असतो. त्यातच पैसे आला की नातेसंबंध दुरावतात असेही दिसून येते आणि या सगळ्या प्रश्नांना भावनेच्या आहारी न जाता वास्तवाचे भान ठेऊन सामोरे जाणे गरजेचे असते. बऱ्याचदा लोकांना "नाही" म्हणता येत नाही आणि त्याने प्रश्न अजून वाढतात. तुमच्या प्रश्नामुळे मृत्यूपत्राचे महत्व परत एकदा अधोरेखित झाले आहे. मृत्यूपत्र केले असेल तर वारसा कायद्याला बगल देता येते. Will is made to give go-bye to the normal line of succession असे कायदेशीर वचन आहे. त्यामुळे तुम्ही वेळीच तज्ञ वकीलांच्या सल्ल्याने मृत्युपत्र करून ठेवा आणि त्यामध्ये कोणाला काय द्यायचे याबरोबरच कोणाला का नाही द्यायचे हेही नमूद करून ठेवा.
ऍड. रोहित एरंडे.©
Comments
Post a Comment