आईवडील का करिअर ? : ॲड. रोहित एरंडे. ©️
आईवडील का करिअर ?
ॲड. रोहित एरंडे. ©️
मुले परदेशात आणि आई वडील इथे असे चित्र आता घरटी बघायला मिळते. स्वतःचे करिअर, आयुष्य असतेच पण त्यापुढे आई वडिलांप्रतीची कर्तव्ये दुय्यम का ठरतात असे वाटण्यासारखे प्रसंग वकीली व्यवसायात बघायला मिळतात. त्यातील हा एक.
तीन उच्चशिक्षित मुले अमेरिकेत आणि आईवडील इकडे भारतात एका फाीव्ह स्टार वृद्धाश्रमात. आमच्या एका पक्षकारांनी त्या आईवडिलांचा ३ बीएचके फ्लॅट विकत घ्यायचा ठरवला. हा खरं तर त्या आईवडिलांनी आपल्या तीन मुलांसाठी ठेवला होता. सगळा व्यवहार ठरला.
त्याच सुमारास योगायोगाने मोठा मुलगा त्याच्या एका कॉन्फरन्ससाठी दोन दिवस पुण्यात येणार होता. रजिस्टर्ड करारनामा बँकेत दिल्यानंतर बँक या दांपत्याला डीडी देणार होती आणि आमच्या पक्षकारांना फ्लॅटचा ताबा मिळणार होता. परदेशातून आलेला मुलगा फ्लॅटचा ताबा आमच्या पक्षकारांना देण्याच्या वेळीच उभ्याउभ्या आई वडिलांना भेटून मुंबईला आणि तिथून अमेरिकेला परतणार होता. सर्व सोपस्कार होऊन दुपारी चारच्या सुमारास आमच्या पक्षकाराला फ्लॅटचा ताबा मिळाला. त्यानंतर आम्ही निघालो. या आईवडिलांचा मुलगा नेमका बिझी असल्यामुळे येऊ शकला नाही. तो फोनवरच त्यांच्याशी बोलला आणि मुंबईला जाण्यास निघाला. आईवडिलांना ते जड झालेलं दिसतच होतं.
इकडे आईवडिल वृद्धाश्रमात जायला निघणार तेवढ्यात आपली पर्स फ्लॅट मध्ये राहिल्याचं त्या आईच्या लक्षात आलं. त्या ती आणायला निघाल्या आणि पाय कशात तरी अडकून त्या जोरात खाली पडल्या. आम्ही सगळे लगेच धावलो. त्यांच्या डोक्याला चांगलाच मार लागला होता, बेशुद्ध पडल्या होत्या. हाताला फ्रॅक्चरही होते. या प्रकाराने ते बाबा बावचळून गेले होते. आम्ही त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी अनेक टेस्ट्स सांगितल्या. सर्जरी लागेल ही शक्यताही बोलून दाखवली. पत्नी रुग्णालयात आणि बरोबर वयस्कर पती एकटेच, कोणी नातेवाईकही नाही, फक्त मी आणि माझा पक्षकार, मग निर्णय कोण घेणार अशी परिस्थिती होती. आम्ही मुंबईच्या दिशेने निघालेल्या त्यांच्या मुलाला फोन केला आणि परत येण्याची विनंती केली. “ओह, anything serious? पण thank God तुम्ही आहात ना? पैश्याची काही काळजी करू नका, सर्व ट्रीटमेंट नीट होईल असे बघूया पण सॉरी I cannot come back. You know I have a flight to catch and got an important meeting in USA which I cannot miss Very sorry, I'll call later, tell Baba" असे म्हणून त्या मुलाने फोन ठेवला.
क्षणभर ग्राम्य भाषेत वाकताडन करावे असे वाटले पण काय उपयोग होणार होता? इकडे ते आईवडील फ्लॅट विकून आलेले पैसे मुलांच्या नावे बँकेत ठेवण्याचा निर्णय घेत होते आणि त्या मुलाला मात्र आई हॉस्पिटलमध्ये असतानाही इतर गोष्टी महत्त्वाच्या वाटत होत्या. त्या मुलाची आई उपचार पूर्ण करुन वृद्धाश्रमात परत गेली पण हा प्रसंग मात्र लक्षात राहिला.
आईवडील इकडे आणि मुले तिकडे हे चित्र आता सर्रास आहे. उतारवयात इथल्या प्रॉपर्टीचे काय करायचे असा यक्ष प्रश्न आईवडिलांसमोर असतो. आईवडिलांना सगळे सोडूनही देता येत नाही आणि मुले परतण्याची शक्यता तर वर्षागणिक मावळत जाते. कधीकधी मुलांचीही करिअर की आईवडील अशी द्विधा मनस्थिती होते.
अशा वेळी काय करावे?
भावनांच्या आहारी न जाता वेळच्या वेळी मार्ग काढावा.
आपल्या हयातीत, हातपाय मेंदू ठणठणीत असताना मिळकतीची योग्य व्यवस्था लावावी.
मृत्यूपत्र करावे. त्याला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे.
वृद्धाश्रमात राहायचे असेल तर त्याचीही मानसिक आणि आर्थिक तयारी आधीपासूनच करायला घ्यावी.
ॲड. रोहित एरंडे.
पुणे.
Comments
Post a Comment