विनापरवानगी एकत्र केलेल्या फ्लॅटसाठी किती मेंटेनन्स घ्यावा ? : ॲड. रोहित एरंडे.©

 विनापरवानगी एकत्र केलेल्या फ्लॅटसाठी किती मेंटेनन्स घ्यावा ?

  आमच्या सोसायटीतील एका  सभासदाने सोसायटीची किंवा महानगरपालिकेची परवानगी न घेता त्याचे दोन गाळे  एकत्र केले  आहेत  आहेत. हे दोन्ही गाळे प्लॅन वरती  वेगवेगळे आहेत गाळ्यांची  लाईट बिले, प्रॉपर्टी टॅक्स,   स्वतंत्र  आहेत, परंतु    करारनामा आहे  एकच आहे आणि   'माझी आर्थिक तंगी  आहे, घरात खूप अडचणी आहेत त्यामुळे याचा मानवतावादी दृष्टीने विचार करावा आणि एकच मेंटेनन्स घ्यावा असे त्याने पत्र लिहिले आहे.    असा एकाच करार पण स्वतंत्र करार असलेले अजूनही काही सभासद आहेत, ते देखील आता एकच मेंटेनन्स  घ्या म्हणून  मागे लागले आहेत.  या बाबत कायदा काय सांग्तनो, सोसायटी जनरल बॉडी काही निर्णय घेऊ शकते का ?  


एक वाचक. पुणे 

  आपला प्रश्न एकच असला तरी त्यात काही उपप्रश्न दडले आहेत अनेक ठिकाणी दिसून येतात.  या प्रश्नांचे  थोडक्यात उत्तर द्यायचे प्रयत्न करतो.  बऱ्याचदा लोकांना हे लक्षात येत नाही की  कायदा हा हवामानासारखा असतो, आपल्याला आवडो न आवडो त्यापासून सुटका होत नाही.    एक मूलभूत आणि  महत्वाची गोष्ट लक्षात घ्यावी की जो मंजूर नकाशा असतो तोच प्रमाण मानला जातो आणि त्याच्या विपरीत,  महागरपालिकेची आणि सोसायटीची  कोणतीही परवानगी न घेता केलेले बदल हे कायदेशरी समजले जात नाहीत. जरी बिल्डर ने एकच करार केला - इंडेक्स-२ एकच असला  तरी   मंजूर नकाशावर ती २ स्वतंत्र युनिट्स आहेत   आणि  त्यांचे  लाईट मीटर , प्रॉपर्टी टॅक्स हे देखील स्वतंत्र आहेत. तसेच    सोसायटीची  नोंदणी  करताना  युनिट्स प्रमाणे सभासदत्वाची संख्या ठरते . त्यामुळे असे विनापरवानगी दोन गाळे  एकत्र केले तरी मेंटेनन्स २ गाळ्यांचाच  द्यावा लागेल..


 सोसायटीमध्ये दुकान असो वा कोणत्याही आकाराचे फ्लॅट्स, मासिक देखभाल खर्च (मेंटेनन्स)  सर्वांना   समान पद्धतीने आकारला जायला पाहिजे असा कायदा आहे.    यामध्ये  कशाचा समावेश होतो आणि  कुठले खर्च फ्लॅटच्या  क्षेत्रफळाप्रमाणे  आकारले जातात,  याच्या स्पष्ट तरतुदी    आदर्श उपविधी क्र.  ६५ ते ६८ मध्ये दिलेल्या आहेत.  अपार्टमेंटमध्ये क्षेत्रफळाप्रमाणे आकारणी होत असल्याने हा प्रश्न निर्माण होत नाही. 


  लोक  सोयीकरिता शेजार-शेजारचे   फ्लॅट घेतात की फक्त मधली भिंत पडायची की झाले,  पण हे रितसर करणे अपेक्षित आहे  आणि असे   दोन  स्वतंत्र फ्लॅट एकत्र केले जातात, आणि  वैयत्तिक वापरायला जरी तो एकच फ्लॅट होत  असला तरी कायदेशीररित्या आणि कागदोपत्री ते अजूनही २ स्वतंत्र फ्लॅट्स  असतात. 


मात्र सोसायटी जनरल बॉडी जरी   'सर्वोच्च' असली तरी, कायद्यापेक्षा सर्वोच्च नसते आणि समजा तुमच्या  जनरल बॉडीने या केसमध्ये एकच मेंटेनन्स घ्यावा असा ठराव केला तरी तो कायद्याच्या विरुध्द असेल आणि तो इतर सभासदांवर अन्याय केल्यासारखे होईल  हे लक्षात घ्यावे. 


पर्यायी मार्ग : 


२ फ्लॅट एकत्र केलेल्या सभासदांना मेंटेनन्सचा खर्च जास्त असणार यात शंका नाही. तसेच  घरातला तंटा आणि जोड्यातला खडा ज्याचा त्याला  बोचतो, पण  दुसऱ्याला दिसत नाही असे म्हणतात. परंतु आर्थिक अडचण, घरगुती प्रॉब्लेम्स ही कारणे  कायद्याने अजिबातच टिकणारी   नाहीत.     मानवतावादी दृष्टीकोन ठेवणे  गैर नाही, पण  त्यासाठी कायदेशीर कर्तव्यांना बाजूला सारता येत नाहीत आणि कोर्टात  देखील भावना चालत नाहीत.  सबब एकत्रीकरणासाठी बिल्डर कडून बिल्डिंग प्लॅनमध्ये फेरबदल (रिव्हाईज)  करून महानगरपालिकेकडून ते मान्य करून घ्यावे लागतील,    त्यासाठी   सोसायटीची     पूर्व लेखी परवानगी   लागेल.  यासाठी सर्व सभासदांना विश्वासात घेऊन जनरल बॉडीचा ठराव  आणावा लागेल ज्यामध्ये यासाठीचा    खर्च  कसा आणि  कोणी  करायचा हे   ठरविल्यास पुढे वाद होत नाहीत. सोसायटीमध्ये एक सभासद - एक युनिट -एक मत अशी रचना केलेली आढळते. त्यामुळे  असे एकत्रीकरण झाल्यावर तांत्रिकदृष्ट्या सोसायटीच्या सभासदत्वामध्ये, भागभांडवलामध्ये  देखील  घट होईल आणि त्यासाठी सोसायटी रजिस्ट्रारकडे मान्यतेसाठी प्रकरण दाखल करावे लागेल.  


ॲड. रोहित एरंडे.©




 

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©