इच्छापत्र स्वतःच्या इच्छेप्रमाणेच करणे अपेक्षित ! - ॲड. रोहित एरंडे ©

 इच्छापत्र स्वतःच्या इच्छेप्रमाणेच  करणे अपेक्षित !

 आमची सर्व स्थावर जंगम मिळकत ही मी आणि माझ्या पत्नीने कष्टातून कमविली आहे. आम्हाला २ विवाहित मुले आहेत.  आता वयाप्रमाणे आमचे इच्छापत्र (विल) करणार याची कुणकुण लागल्यावर  दोन्ही मुले आणि दोन्ही सुना वेगवेगळे भेटून त्यांची इच्छा काय आहे हे सांगायला लागले आहेत. ते लाभार्थी असल्याने त्यांना  मृत्युपत्राचा मसुदा वाचायला मिळायला हवा किंवा ते त्यांच्या  वकीलांमार्फत करून आणतील  अशी त्यांची मागणी आहे. लाभार्थ्याला अशी  माहिती कायद्याने सांगणे कायद्याने गरजेचे आहे का ? आमच्या  दोस्तांच्या मृत्युपत्राची मसुदा वापरू का ?  या सर्वाचा  आम्हाला खूप ताण येत आहे. कृपया मार्गदर्शन करावे.   

एक पालक, मुंबई. 

प्रॉपर्टी नसली तरी त्रास आणि असली तर जास्त त्रास, असे म्हणतात. आमच्याकडे येणाऱ्या अनेक केसेस मधून असे आवर्जून सांगावेसे वाटते की सध्याच्या काळात    पालकांनी जास्त भावनीक (emotional )  न होता प्रॅक्टिकल होणे गरजेचे आहे कारण  भिडस्त स्वभाव  / 'नाही म्हणता न येणे' याने अनेक प्रश्न निर्माण होतात आणि आपण आपलेच मानसिक समाधान  गमावून बसतो, जे बाजारात विकत मिळत नाही.     मृत्युपत्र किंवा इच्छापत्र याची व्याख्याच "एखाद्या व्यक्तीच्या मालमत्तेबद्दल तिच्या इच्छेचा कायदेशीर दस्तऐवज, जो तिच्या मृत्यूनंतर अंमलात आणला जावा" अशी कायद्याने केलेली दिसून येते. त्यामुळे मुलांच्या नाही तर आपल्या इच्छेप्रमाणेच मृत्युपत्र करणे अपेक्षित आहे. 

"A  Will is made to give go by to the normal line of succession and Will  prevails over succession "   हे  कायद्याचे वचन लक्षात घ्या.    तुमच्या मुलांनी आणि सुनांनी असे गृहीत धरले आहे की त्यांनाच मृत्युपत्राने मिळणार किंवा मिळायला हवे आणि याच गृहीतकाला छेद देण्यासाठी वरील इंग्रजी वचनाप्रमाणे स्वतःच्या इच्छेने मृत्युपत्र करणे अपेक्षित आहे आणि काही केसेस  मध्ये तर पालकांनी  त्रासदायक मुलांना बाजूला ठेऊन त्रयस्थ व्यक्तीला मृत्यूपत्राने मिळकत दिल्याची उदाहरणे आहेत. 

तसेच  कायद्यामध्ये मृत्युपत्र करण्याची पूर्वकल्पना लाभार्थ्यांना द्यावी, त्यांना ते वाचायला द्यावे  अशी कुठलीही तरतूद नाही आणि प्रत्येक मुलाला/मुलीला  समानच द्यावे असेही कायदा सांगत नाही. मृत्युपत्र हे ते करणाऱ्याचे "होमपिच " असते असे आम्ही म्हणतो म्हणजेच तुम्हाला जे काही कोणाला मृत्यूपत्रात द्यायचे आहे किंवा   कोणाला /विशिष्ट व्यक्तीला  काही  द्यायचे नाही अशी परिस्थिती असेल तर तेही तुम्ही तुमच्या मृत्युपत्रामध्ये नमूद करून ठेवू शकता.

बरेचदा असे दिसून येते की मुलांचे लग्न झाल्यावर त्यांच्या वैवाहिक जोडीदाराची भूमिका प्रॉपर्टी  व्यवहारांबाबत फार महत्वाची ठरते, काही जण  योग्य ते अंतर राखतात तर काही जणांना "लक्ष्मण रेषेचे भान राहत नाही.

पालकांनी हेही लक्षात ठेवावे प्रत्येक मुलाला/ मुलीला  गणिती  प्रमाणात  सारखे -सारखे   देता येणे शक्य असेलच असे नाही  आणि याचा ताण घेऊ नका.      समजा एखादे मूल बाहेर गावी  असेल आणि   आपल्या जवळचे मूल  आपली  सेवाशुश्रूषा करत असेल  तर अश्या मुलांना  द्यायच्या मिळकतींमध्ये कमी-जास्त होणे नैसर्गिक आहे. तसेच  मला कुठली मिळकत पाहिजे, हे सांगणे मुलांचा एकवेळ  हट्ट असू शकतो, पण हक्क नाही आणि हा हट्ट पालकांवर कायद्याने  बंधनकारक नाही.   

 पु.ल. देशपांडे यांनी 'गुण गाई आवडीमध्ये 'म्हटल्याप्रमाणे "नुसते जरीचे कपडे असून चालत नाहीत, ते अंगाला यावे लागतात" त्या प्रमाणे प्रत्येक मृत्युपत्र हे वेगळे असते, दुसऱ्याचे बघून  कॉपी केल्यास फटका बसू शकतो. लाखो -कोटी रुपयांच्या मिळकतीसाठी तज्ञ वकीलांची मदत घेऊन  मृत्युपत्र करणे गरजेचे आहे. 

अर्थात काही वेळा  मुले स्वतःहूनच   पालकांना  सांगून ठेवतात की  प्रॉपर्टी बाबत तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घ्या.   असो.   तुम्ही मानसिक ताण तणाव कमी करण्यासाठी  समुपदेशन - वैद्यकीय मदत जरूर  घ्या, त्यात कमीपणा काहीही नाही. तुमची केस बघता "जर का लाभार्थ्यांपैकी कोणीही मृत्युपत्राला आव्हान दिले तर आव्हान दिलेल्या लाभार्थ्यास मृत्युपत्रात दिलेली मिळकत मिळणार नाही किंवा अगदी शुल्लक काहीतरी मिळेल" या आशयाचा ज्याला  In terrorem Clause  - Forfeiture Clause -   म्हणतात तो मृत्युपत्रात घालून ठेवणे गरजेचे आहे       


ॲड. रोहित एरंडे ©

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©