व्यवहार आणि नातेसंबंध यामध्ये गल्लत नको. ॲड. रोहित एरंडे. ©
व्यवहार आणि नातेसंबंध यामध्ये गल्लत नको..
ॲड. रोहित एरंडे. © (लोकमत)
साधारण साठीच्या घरातले एक जोडपे ऑफिसमध्ये आले होते. कोणी बोलायचे असे त्यांनी एकमेकांकडे बघितले आणि शेवटी बायको म्हणाली, जाऊ देत मीच बोलते, हे नवरे काही बोलायचे नाहीत (अनेक बायकांच्या मनातील बोलल्यासारखे !). मी विचारले काय प्रश्न आहे नक्की ? :" सर, मी आणि माझे पती दोघेजण मिळून आमच्या सासू- सासऱ्यांना सांभाळले आहे. माझ्या नणंदा , भावजया , दीर यापैकी कोणी कोणी वेळेला मदतीला आले नाहीत. या सर्वांची आर्थिक स्थिती आमच्या पेक्षा खूपच चांगली आहे. मात्र मागचं २ वर्षांत सासू-सासरे दोघेही पाठोपाठ गेले आणि आता सर्व जण सासऱ्यांच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क मागायला लागले आहेत" - त्या काकू म्हणाल्या आणि परत विचारले, " त्यांचा काय हक्क उरतो आता ? आम्ही त्यांना हक्कसोड पत्र द्या असे म्हणू शकतो का ? किंवा आम्ही जे सेवा केली त्यामुळे आम्हाला जास्त हिस्सा मिळायाला हवा ना ?".. ज्योतिषी, डॉक्टर आणि वकील यांचेकडून लोकांना आवडेल असा सल्ला ऐकायला हवे असते, परंतु त्यांच्यासाठी योग्य तो सल्ला देणे हे त्यांचे कर्तव्य असते आणि या भावनेने मी त्यांना सर्व वस्तुस्थिती समजावून सांगितली.
त्यांना एक गोष्ट स्पष्ट केली की कायदेशीर हक्क आणि इमोशन्स - भावना यांच्यामध्ये कायदा हक्कांच्या बाजुने उभा राहतो एखादी गोष्ट नैतिक दृष्टया चुकीची असली तरी कायदेशीर दृष्टया सुध्दा ती चुकीची असेलच असे नाही, हे लक्षात ठेवावे.
"खायला आधी, कामाला कधी-मधी" अशी एक मराठीत म्हण आहे. हक्क आणि कर्तव्ये या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, पण लक्षात कोण घेतो ? आपल्या आई-वडिलांची सेवा करणे हे प्रत्येक मुला-मुलीचे, मग तो विवाहित असो व नसो, त्याचे कर्तव्यच असते आणि यामध्ये जावई आणि सुना देखील भाग घेतातच आणि तुम्ही सुध्दा तेच केले आहे, असे मी सांगितले.
एकतर श्वशुरगृही आपोआप मालकी हक्क सुनेला -जावयाला मिळत नाही, तो प्रत्येकाच्या वैवाहिक जोडीदारपश्चात मिळू शकतो. मात्र तुम्ही अशी सेवा केली म्हणून तुम्हाला म्हणजेच तुमच्या नवऱ्याला मिळकतीमध्ये जास्त हक्क मिळाला पाहिजे, अशी तरतूद कायद्यामध्ये नाही कारण वर म्हटल्याप्रमाणे कायदा भावना बघत नाही. त्यांना पुढे सांगितले की, तुमच्या नणंद - दिरांची आर्थिक परिस्थिती उत्तम असली आणि त्यांनी कधीही त्यांच्या आई- वडिलांकडे बघितले नाही, हे नैतिकदृष्ट्या कदाचित चूक असेल, तुम्ही म्हणताय तसा कर्माचा सिद्धांत त्याची काळजी घेईलही, परंतु यासाठी त्यांचा मिळकतीमधील हक्क आपोआप कमी होणार नाही.
पुढे मी सांगितले की तुमची केस "इनहेरिटेड " ही मिळकतीची असल्यामुळे तुमच्या नवऱ्याच्या लाभात जर तुमच्या नणंद -दीर यांनी विनामोबदला नोंदणीकृत हक्कसोड पत्र लिहून दिले तर त्याला अगदी नाममात्र अशी २००-५०० एवढीच स्टँम्प ड्युटी पडेल. परंतु जर तुम्ही मोबदला दिला तर तो दस्त खरेदीखतासारखे होऊन त्याला पूर्ण स्टँम्प ड्युटी पडेल.
शेवटी, तुम्ही जे सांगत आहात ती तुमची बाजू झाली, कदाचित त्यांची पण काहीतरी बाजू असेलच, भले ती चुकीची असेल ती तुम्ही कधी ऐकून घेतली आहे का ? या बद्दल तुम्ही कधी स्पष्टपणे बोलला आहात का ? आमच्या अनुभवावरून असे सांगू शकतो की जवळच्या नात्यांमधील भांडणांमध्ये संवादाचा अभाव असल्याने "सदा असा संकोच नडे " अशी परिस्थिती निर्माण होते. बऱ्याचदा मिळकतीमधील हक्क -अधिकार आणि कर्तव्ये याबाबत स्पष्टपणे बोलणे गरजेचे असते. योग्य तिथे "नाही" न म्हणता आल्यास आणि भिडस्तपणा ठेवल्यास आपले नुकसान होऊ शकते आणि बऱ्याचदा त्यामुळे आपली मानसिक शांतता जाते आणि अशी शांतता बाजारात विकत मिळत नाही. म्हणूनच व्यवहार आणि नातेसंबंध यामध्ये गल्लत करून चालत नाही.
काय शिकावे ?
कायद्यामध्ये भावना चालत नाहीत. आर्थिक स्थितीप्रमाणे मिळकतीमधील वारसांचे हक्क कमी-जास्त होत नाहीत.
या केसमुळे मृत्यूपत्राचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. जर सासू-सासऱ्यांनी मृत्युपत्र करून ठेवले असते तर त्याप्रमाणे मिळकतीची वाटणी करून ठेवणे सुकर झाले असते आणि वारसांमधील वाद कदाचित झाले नसते.
ऍड. रोहित एरंडे
पुणे. ©
Comments
Post a Comment