सून झाली विधवा, सासरी हक्क संपला ? #लोकमत ॲड. रोहित एरंडे ©

 सून झाली विधवा, सासरी हक्क संपला ? #लोकमत 

ॲड. रोहित एरंडे ©


पाश्चिमात्य देशांमध्ये सासुरवास -सूनवास असे काही असते का हा एक संशोधनाचा विषय आहे. पण आपल्याकडे सून-जावई आणि सासू-सासरे  हे नातेच काहीतरी वेगळे असते आणि खूप कंगोरे या नात्यांमध्ये असतात. एक   पक्षकार  त्यांच्या  मित्राच्या आईवडिलांना घेऊन आले होते. दुर्दैवाने त्या मित्राचे अकाली निधन झाले होते.  वडील म्हणाले सर   माझी  स्वकष्टार्जित   संपत्ती मोप  आहे, परंतु आमच्या सून बाईंची रितच न्यारी.. तिचे वागणे खूप विचीत्र आहे.. आई  लगेच म्हणाल्या, अहो काय सांगू, माझा मुलगा तर नुसता तिच्या ताटाखालचा मांजर झाला होता ! आणि आमचे तिच्याशी अजिबात पटत नाही. ती आता  आमच्या एकुलत्या एक नातवाला   घेऊन माहेरी गेली आहे आणि जाताना 'माझा प्रॉपर्टीमधला हक्क .मी घेईनच " अशी धमकीही देऊन गेली आहे.   मी विचारले तुमचा नेमका प्रश्न काय आहे ? आई-वडील एका सुरात म्हणाले की काहीही  होऊ देत पण आमच्या संपत्तीमधील एक कवडी देखील सुनेला मिळता कामा  नये, आम्हला अजून २ मुली आहेत, भले आम्ही सगळी संपत्ती दान देऊ  परंतु   या सुनेला काहीही देणार नाही.. पण आता आमचा मुलगा गेला आहे त्यामुळे सुनेला माझ्या स्वकष्टार्जित मिळकतीमध्ये खरंच हिस्सा मिळेल का ? ती कोर्टात जायच्या आधी आम्हीच जाऊ का ? आमचे मित्र नातेवाईक असाच सल्ला देत आहेत. 

मानवी स्वभावाची अनेक रूपे आम्हाला बघायला मिळतात. मी विचारले, पण तुम्ही एकदा सुनबाईंशी बोलला आहात का की नक्की काय प्रॉब्लेम आहे, किंवा कोणा मध्यस्थांमार्फत  तरी ? कारण बरेचदा कौटुंबिक नात्यांमध्ये "हमसे आया न गया, तुमसे बुलाया ना गया.." या मुळे दरी वाढत जाते.. 

मालकी हक्काबाबत आपल्याकडे अनेक गैरसमज आहेत त्यातील प्रमुख ३ गैरसमज नमूद करणे गरजेचे आहे :  पहिला गैरसमज -   अनेक लोकांना असे वाटत असते की वैवाहिक साथीदाराच्या मृत्यूनंतर केवळ उर्वरित जोडीदाराच आपोआप एकटा १००% मालक बनतो;    दुसरा   गैरसमज -   करारात पहिले नाव ज्याचे असते त्याचा हिस्सा किंवा अधिकार हा दुसरे नाव असलेल्यापेक्षा जास्त असतो आणि पहिले नाव असलेली व्यक्ती मयत झाली की  आपोआप सर्व हक्क दुसरे नाव असलेल्या व्यक्तीलाच मिळतो ;आणि   तिसरा  गैरसमज  -  ७/१२ किंवा प्रॉपर्टी  कार्ड हे मालकी हक्काचे पुरावे आहेत !! 

  त्यांना सांगितले की  सासऱ्यांची स्वकष्टार्जित मिळकत असल्याने त्यांच्या हयातीमध्ये केवळ त्यांच्या स्वतःच्या पत्नीला आणि मुलांना देखील कोणताही हक्क प्राप्त होत नाही  आणि त्यामुळे जर तुमच्या  मुलाला आणि मुलीलाच मिळकतीमध्ये हक्क नसेल, तर सुनेला / जावयाला  कुठून येणार ? आपल्या स्वकष्टार्जित मिळकतीचे काय करायचे म्हणजे कायद्याच्या भाषेत त्याचा उपभोग घ्यायचा का मिळकत विकायची का दान करायची   हा सर्वस्वी त्या मिळकतीच्या मालकाचा म्हणजेच या केस मध्ये  सासऱ्यांचा हक्क आहे. या परिस्थितीमध्ये नवऱ्यालाच  (मुलाला) कोणताही हक्क नसल्याने बायकोला किंवा तिच्या   मुलांना कोणताही मालकी हक्क या मिळकतींमध्ये आत्ता मिळणार नाही असे सांगितल्यावर त्यांना हायसे वाटले. 


मात्र पुढे हेही सांगितले की कोणतेही वैध मृत्युपत्र न करता जर तुमचे निधन झाले तर  अश्या स्थितीमध्ये हिंदू  वारसा कायद्याचे  कलम  ८ लागू होईल  ज्या अन्वये  सर्व प्रथम त्यांचे क्लास-१ हेअर्स  ज्यांच्यामध्ये प्रामुख्याने    विधवा पत्नी, मुलगा -मुलगी (मुले) ,आई (हयात असल्यास)  ,   मुलगा -मुलगी आधीच मयत झाली असतील तर त्यांची मुले (नातवंडे), मुलाची विधवा पत्नी (सून)   या  वारसांना  समान पद्धतीने मिळकतीमध्ये हक्क मिळेल. हाच न्याय तुम्हाला बाळगू होईल असे सांगितल्यावर, मृत्युपत्र करणारच आहोत असे मला आश्वासन दिले.. 


आता राहिला प्रश्न कोर्टात जाण्याचा. मी त्यांना सांगितले की असा सल्ला देणार "निम हकीम" सगळीकडे असतात आणि जे पिना मारून नामे निराळे राहतात आणि मनस्ताप मात्र सल्ला मानणाऱ्यांना होतो. कोर्टात जाण्याचा हक्क प्रत्येकाला आहे, परंतु कोर्टात गेले म्हणजे निकाल आपल्याच बाजूने लागेल असे नसते आणि आपल्या केसमध्ये तर आत्ता   सूनबाई कोर्टात जाऊन काहीही साध्य होणार नाही., उलट वेळ, पैसे आणि बाजारात नि विकत मिळणारी मानसिक शांतता मात्र नक्की खर्च होईल. जाताना  त्यांना सांगितले की सासू सासरे आणि सून  या नात्याची  केमिस्ट्री घराप्रमाणे बदलते आणि तुमच्या केसमध्ये ही केमिस्ट्री दुरुस्त होतीय का याचे प्रयत्न करून बघा, कदाचित नातवंडे, ज्यांना दूधावरची साय म्हणतात, तो  समान धागा असू शकेल. 




 ॲड. रोहित एरंडे ©


Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©