अविवाहित स्त्री- पुरुषांच्या मिळकतीचे विभाजन कसे होते ? #लोकमत *ॲड.रोहित एरंडे.©*

 अविवाहित स्त्री- पुरुषांच्या मिळकतीचे विभाजन कसे होते ? #लोकमत *ॲड.रोहित एरंडे.©*


 ज्येष्ठ नागरिक असलेले एक पुरुष आणि महिला ऑफिस  मध्ये आल्या होत्या. काय काम आहे, असे विचारल्यावर ते गृहस्थ म्हणाले, "सर, आम्ही दोघे सख्खे बहीण भाऊ आहोत आणि दोघेही अविवाहित आहोत, आई वडील जाऊन बरीच वर्षे झाली, त्यांची मिळकत आमच्या दोघांच्या नावावर झाली आहेच आणि आम्ही दोघेही ४-५ वर्षांपूर्वी बँकेमधून निवृत्त झालो आहोत. पण आता आम्हाला आमच्या प्रॉपर्टी, बँक खाती यांची व्यवस्था कशी लावावी हे समजत नाही".. 


सामान्यपणे लग्न झालेले जोडपे आले की त्यांना त्यांच्या  मिळकतीचे काय करायचे आहे हे ठरलेले असते. उदा.नवरा बायको एकमेकांनाच मिळकत देतात किंवा मुलांना /नातवंडाना देतात , असा पॅटर्न प्रत्येक घरातील पार्श्वभूमीवर ठरतो. अर्थात असेच करायला पाहिजे असे काही नसते, स्वकष्टार्जित मिळकतीचे काय करायचे हे ठरविण्याचा जो तो मुखत्यार असतो. 

तर एखादी मिळकत नावावरहोणे  म्हणजेच त्यामधील मालकी हक्क मिळणे हे त्या व्यक्तींच्या हयातीमध्ये  खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाटप-पत्र यांसारख्या नोंदणीकृत दस्तानेच शक्य होते.  तर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या मिळकतीमधील मालकी हक्क हा मृत्यूपत्राने (टेस्टमेंटरी सक्सेशन) किंवा मृत्यूपत्र केले नसेल तर वारसा हक्काने (इंटेस्टेट सक्सेशन )  तबदील होऊ शकतो. खरेदीखत, बक्षीसपत्र , मृत्युपत्र  यायोगे मिळालेली मिळकत ही स्वकष्टार्जित / स्वतंत्र मिळकत धरली जाते.   


मात्र  एखादा हिंदू पुरुष आणि महिला जर  मृत्यूपत्र न करता मरण पावले तर त्यांच्या स्वकष्टार्जित  संपत्तीची विभागणी वेगवेगळ्या तरतुदींप्रमाणे  होते. ह्यासाठी ढोबळ मानाने  कायद्याने क्लास-१ -हेअर्स (वारस) आणि क्लास-२-हेअर्स (वारस) अशी विभागणी केलेली आढळते. .


*हिंदू पुरुष आणि  मिळकतीचे विभाजन*  :


एखादा हिंदू पुरुष मृत्यूपत्र न करता मरण पावल्यास त्याची स्वकष्टार्जित मिळकत हि  हिंदू  वारसा कायद्याच्या कलम  ८ अन्वये सर्व प्रथम त्याचे क्लास-१ हेअर्स यांना समान हक्काने मिळते, ज्यांच्यामध्ये प्रामुख्याने  त्याची विधवा पत्नी, मुलगा -मुलगी (मुले)  , आई , जर मुलगा -मुलगी आधीच मयत झाली असल्यास त्यांची मुले (नातवंडे), मुलाची विधवा पत्नी (सून)  इ. चा  समावेश होतो.  जर का क्लास-१ वारसांपैकी  कोणीही नसेल, तर मग क्लास-२ वारसांकडे  अशी संपत्ती जाते. क्लास-२ हेअर्स मध्ये प्रामुख्याने वडील, मुलाच्या किंवा मुलीच्या  मुलीचा मुलगा किंवा मुलगी (पतवंडे), भाऊ -बहीण, चुलते इ.  ह्यांचा समावेश होतो.  

*हिंदू महिला आणि मिळकतीचे विभाजन* :

हिंदू वारसा कायदा कलम १४ अन्वये   महिलांना एखादी मिळकत वारसाने, वाटपाने , पोटगीसाठी किंवा पोटगीच्या फरकापोटी,  मृत्यूपत्र किंवा बक्षीसपत्राने किंवा खरेदीने, स्त्रीधनापोटी इ. प्रकारे  आणि  कोणाकडूनही    मिळाल्यास ती महिला अश्या मिळकतींची संपुर्ण मालक होते.  अर्थात,  ज्या  मिळकतींमध्ये फक्त तहहयात राहण्याचा हक्क दिला असेल त्या मिळकतीचा अपवाद सोडून.   

*निपुत्रिक महिला आणि मिळकतीचे विभाजन*  : 

पुरुष अविवाहित / निपुत्रिक असेल तर मिळकतीच्या  विभाजनात काही विशेष फरक पडत नाही, हे वरील तरतुदींनी दिसून येईलच. पण  महिलांच्या बाबतीत हा फरक जरूर पडतो.   कलम १५(१) प्रमाणे जर का एखादी हिंदू महिला  मृत्यूपत्र न करता मरण पावल्यास तिची मिळकत  सर्वात प्रथम तिचा नवरा, मुलगा-मुलगी, जर मुलगा -मुलगी आधीच मयत झाली असल्यास त्यांची मुले (नातवंडे) ह्यांच्यामध्ये समानरीत्या विभागली जाईल. ह्यांच्यापैकी कोणीच नसेल तर मग नवऱ्याचे वारसांकडे, आणि ते नसतील तर आई-वडील, तेही नसतील तर वडिलांच्या वारसांकडे आणि शेवटी आईच्या वारसांकडे मिळकत जाईल.   'महिलेच्या मृत्यूनंतर अशी मिळकत हि मिळकतीच्या उगमाकडेच जाईल'  ही कलम १५(२) मधील  पूर्व अट  लक्षात घ्यावीच  लागते. 

त्यामुळे जर महिलेला एखादी  मिळकत तिच्या वडील किंवा आईकडून मिळाली असेल आणि ती महिला निपुत्रिक (issueless ) असेल म्हणजेच तिचे मुलगा-मुलगी किंवा जर मुलगा -मुलगी आधीच मयत झाली असल्यास त्यांची मुले (नातवंडे) ह्यांपैकी कोणी  वारस हयात नसतील तर अशी मिळकत हि कलम १५ (१) प्रमाणे न जाता  केवळ त्या महिलेच्या वडिलांच्या वारसांकडेच  जाईल,  तसेच जर का मिळकत नवऱ्याकडून किंवा सासऱ्यांकडून आली असेल आणि वरीलप्रमाणेच ति निपुत्रिक असेल , तर अशी मिळकत हि तिच्या मृत्यूनंतर फक्त तिच्या नवऱ्याच्या वारसांकडे जाते असे त्यांना मी सांगितले.  

त्यामुळे त्या दोघांनाही तुम्ही   मृत्यूपत्र केले नाही आणि. दोघांपैकी जो राहील त्याला दुसऱ्याची मिळकत मिळेल, परंतु समजा तुम्ही दोघेही एकदम गेलात तर ? किंवा तुम्हाला अजून कुणालातरी किंवा कुठल्या संस्थेला काही द्यावेसे वाटत असेल तर ?  हि सर्व संधी मृत्यूपत्र न केल्यास जाईल आणि मग मिळकत ज्या लांबच्या वारसाच्या नशिबात, ज्याला कधी तुम्ही फारसे भेटही नसाल किंवा द्यायची इच्छाही नसेल,  त्याला मिळेल, हे सांगितल्यावर  ते दोघेही चपापले. इतर वेळीही जर का मृत्युपत्राची लाभार्थीच आपल्या आधी गेला तर मिळकत कुणाला जाणार हा प्लॅन बी प्रत्येकाने मृत्युपत्रात लिहून ठेवावा. असो अखेर   दोघांनी रितसर  नोंदणीकृत (जरी नोंदणी करणे  अनिवार्य नसले तरी) मृत्यूपत्र करून ठेवण्याचा सल्ला मनोमन पटला  

 

*ॲड.रोहित एरंडे.©*




















Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©