इच्छापत्र स्वतःच्याच इच्छेप्रमाणे करणे अपेक्षित, मुलांच्या नाही ! #लोकमत : ॲड. रोहित एरंडे ©

  इच्छापत्र स्वतःच्याच  इच्छेप्रमाणे  करणे अपेक्षित, मुलांच्या नाही  ! #लोकमत 


 नुकतेच बँकेतून निवृत्त झालेले नवरा बायको ऑफिस मध्ये  इच्छापत्र (विल /मृत्युपत्र ) करण्याबात माहिती घेणयासाठी आले होते.   काका म्हणाले, " आमची सर्व स्थावर जंगम मिळकत ही मी आणि माझ्या पत्नीने बँकेत नोकरी करून कष्टातून कमावली  आहे. आम्हाला एक मुलगा एक मुलगी असून दोघांचीही लग्ने  झाली आहेत". काकू म्हणाल्या, "काही दिवसांपूर्वी आम्ही घरात चर्चा करत होतो की सध्याच्या धकाधकीच्या  काळात  'विल' लवकरात लवकर करावे, आपल्या काही मित्र मंडळीनीं केले आहे", "मात्र    याची कुणकुण लागल्यावर  अचानक मुलगा आणि सून आणि मुलगी आणि जावई स्वत्रंतपणे आमहाला भेटले आणि  त्यांच्या इच्छा काय काय आहेत  हे सांगायला लागले" त्यांचे म्हणणे होते की आमचे जे काही आहे ते त्यांनाच मिळणार त्यामुळे विल कसे करावे, आमच्याच वकीलांकडून करून घेऊ असे बोलायला लागल्यावर आम्हाला जरा वावगे वाटले.. ते काका म्हणाले "आमची टाप नव्हती बुवा आमच्या आई वडिलांशी अश्या बाबत बोलण्याची".. त्यांनी विचारलेले प्रश्न  मात्र महत्वाचे होते, जे इतरत्र देखील दिसून येतात. ।लाभार्थी असल्याने त्यांना  मृत्युपत्राचा मसुदा वाचायला मिळायला हवा का ?"  लाभार्थ्याला अशी  माहिती कायद्याने सांगणे कायद्याने गरजेचे आहे का ? "आमच्या  दोस्तांच्या मृत्युपत्राची मसुदा वापरू का ?" आणि सर्वात शेवटी त्यांचा प्रश्न होता ।"  या सर्वाचा  आम्हाला प्रचंड  ताण येत आहे, कृपया मदत करा"  

या विषयावर आज आपण माहिती घेऊ. 

हल्ली कसे झाले आहे की बऱ्याच घरांमध्ये आई वडिलांनी काष्ठाने प्रॉपर्टी केलेली असते, मुले कुठेतरी परदेशात असतात आणि या प्रॉपर्टीचे काय करायचे असे प्रश्न जुन्या पिढीला पडलेले असतात. प्रॉपर्टीबाबत असे गंमतीने म्हणतात की प्रॉपर्टी  नसली तरी त्रास आणि असली तर जास्त त्रास, असे म्हणतात. 

पालकांनी भावनीक न होता प्रॅक्टिकल व्हावे : 

आमच्याकडे येणाऱ्या अनेक केसेस मधून असे आवर्जून सांगावेसे वाटते की सध्याच्या काळात    पालकांनी जास्त भावनीक (emotional )  न होता प्रॅक्टिकल होणे गरजेचे आहे कारण  भिडस्त स्वभाव  म्हणजेच वेळेवर  'नाही म्हणता न येणे' याने अनेक प्रश्न निर्माण होतात आणि आपण आपलेच मानसिक शांतता   गमावून बसतो, आणि कितीही पैसे असले बाजारात मानसिक शांतता  विकत मिळत नाही.     

इच्छापत्राची व्याख्या :

मृत्युपत्र किंवा इच्छापत्र याची व्याख्याच "एखाद्या व्यक्तीच्या मालमत्तेबद्दल तिच्या इच्छेचा कायदेशीर दस्तऐवज, जो तिच्या मृत्यूनंतर अंमलात आणला जावा" अशी कायद्याने केलेली दिसून येते. त्यामुळे मुलांच्या नाही तर आपल्या इच्छेप्रमाणेच मृत्युपत्र करणे अपेक्षित आहे. 

"A  Will is made to give go by to the normal line of succession and Will  prevails over succession "   हे  कायद्याचे वचन लक्षात घ्या.    तुमच्या मुलांनी आणि सुनांनी असे गृहीत धरले आहे की त्यांनाच मृत्युपत्राने मिळणार किंवा मिळायला हवे आणि याच गृहीतकाला छेद देण्यासाठी वरील इंग्रजी वचनाप्रमाणे स्वतःच्या इच्छेने मृत्युपत्र करणे अपेक्षित आहे आणि काही केसेस  मध्ये तर पालकांनी  त्रासदायक मुलांना बाजूला ठेऊन त्रयस्थ व्यक्तीला मृत्यूपत्राने मिळकत दिल्याची उदाहरणे आहेत. 


मृत्युपत्र आधीच लाभार्थ्यांना वाचायला द्यावे अशी कुठलीही तरतूद नाही :

तसेच  कायद्यामध्ये मृत्युपत्र करण्याची पूर्वकल्पना लाभार्थ्यांना द्यावी, त्यांना ते वाचायला द्यावे  अशी कुठलीही तरतूद नाही आणि प्रत्येक मुलाला/मुलीला  समानच द्यावे असेही कायदा सांगत नाही. मृत्युपत्र हे ते करणाऱ्याचे "होमपिच " असते असे आम्ही म्हणतो म्हणजेच तुम्हाला जे काही कोणाला मृत्यूपत्रात द्यायचे आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाचे    कोणाला /विशिष्ट व्यक्तीला  का   द्यायचे नाही अशी परिस्थिती असेल तर तेही तुम्ही तुमच्या मृत्युपत्रामध्ये नमूद करून ठेवू शकता अन नेते जरूर लिहून ठेवावे. तसेच समजा लाभार्थीच आधी मयत झाला तर मिळकत कोणाला जाणार हा 'प्लॅन बी' देखील नमूद करून ठेवावा. 

लाभार्थ्यांनी मृत्यूपत्राला आव्हान दिल्यास :

तसेच मुलांचा आणि त्यांच्या साथीदारांचा फारच "इंटरेस्ट" वाढला असेल तर भविष्यात वाद निर्माण व्हायची शक्यता गृहीत धरून  "जर का लाभार्थ्यांपैकी कोणीही मृत्युपत्राला आव्हान दिले तर आव्हान दिलेल्या लाभार्थ्यास मृत्युपत्रात दिलेली मिळकत मिळणार नाही किंवा अगदी शुल्लक काहीतरी मिळेल" या आशयाचा ज्याला  In terrorem Clause  - Forfeiture Clause -   म्हणतात तो मृत्युपत्रात घालून ठेवणे गरजेचे आहे       

बरेचदा असे दिसून येते की मुलांचे लग्न झाल्यावर त्यांच्या वैवाहिक जोडीदाराची म्हणजेच तुमच्या   सुनेची  -जावयाची  भूमिका प्रॉपर्टी  व्यवहारांबाबत फार महत्वाची ठरते.  काही जण  योग्य ते अंतर राखतात तर काही जणांना "लक्ष्मण रेषेचे" भान राहत नाही.


प्रत्येक संततीला  तंतोतंत सामान देणे जमलेच असे नाही. 

पालकांनी हेही लक्षात ठेवावे प्रत्येक मुलाला/ मुलीला  गणिती  प्रमाणात  सारखे -सारखे   देता येणे शक्य असेलच असे नाही  आणि याचा ताण घेऊ नका.      समजा एखादे मूल बाहेर गावी  असेल आणि   आपल्या जवळचे मूल  आपली  सेवाशुश्रूषा करत असेल  तर अश्या मुलांना  द्यायच्या मिळकतींमध्ये कमी-जास्त होणे नैसर्गिक आहे. तसेच  मला कुठली मिळकत पाहिजे, हे सांगणे मुलांचा एकवेळ  हट्ट असू शकतो, पण हक्क नाही आणि हा हट्ट पालकांवर कायद्याने  बंधनकारक नाही.   

 पु.ल. देशपांडे यांनी 'गुण गाई आवडीमध्ये 'म्हटल्याप्रमाणे "नुसते जरीचे कपडे असून चालत नाहीत, ते अंगाला यावे लागतात" त्या प्रमाणे प्रत्येक मृत्युपत्र हे वेगळे असते, दुसऱ्याचे बघून  कॉपी केल्यास फटका बसू शकतो. लाखो -कोटी रुपयांच्या मिळकतीसाठी तज्ञ वकीलांची मदत घेऊन  मृत्युपत्र करणे गरजेचे आहे. 

अर्थात सब घोडे बारा टक्के   इथेही लागू नाहीच.   काही वेळा  मुले स्वतःहूनच   पालकांना  सांगून ठेवतात की  प्रॉपर्टी बाबत तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घ्या.   असो.   बरेचदा आम्ही पक्षकारांना जरूर सांगतो की  मानसिक ताण तणाव कमी करण्यासाठी  समुपदेशन - वैद्यकीय मदत जरूर  घ्या, त्यात कमीपणा काहीही नाही. 



ॲड. रोहित एरंडे ©

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©