पुनर्विवाह आणि सावत्र मुलांचे हक्क. : #लोकमत - ॲड. रोहित एरंडे ©
साधारण पन्नाशीच्या आसपास वाटावेत असे एक जोडपे ऑफिसमध्ये आले होते. त्यांनी सांगितले की ते दोघेही घटस्फोटित आहेत आणि त्या महिलेला पहिल्या लग्नापासून एक मुलगा आहे, आणि सध्या ते लिव्ह-इन मध्ये राहत असून लवकरच ते लग्न करणार आहेत. पण आता जर दुसरे लग्न झाले तर पहिल्या लग्नापासून झालेल्या मुलाला होणाऱ्या नवऱ्याच्या मिळकतीमध्ये हिस्सा मिळेल का ? किंवा पहिले लग्न झाले तेव्हा जी काही मिळकत त्या महिलेने घेतली असेल तिच्यावर तिच्या आधीच्या नवऱ्याचा हक्क राहील का होणाऱ्या नवऱ्याचा ? असे अनेक प्रश्न त्यांच्यापुढे होते.
त्यांच्याशी बोलताना हे जाणवले की आधीच्या आयुष्यातील कटू अनुभवांमुळे पुढील पावले उचलण्याआधी त्यांना काही गोष्टीत भावनांच्या आहारी न जाता स्पष्टता हवी होती.
सध्याच्या काळ बदलला आहे. आयुष्यात कधीतरी अशी वेळ येते की "विस्कटलेला संसार चालू ठेवायचा का घटस्फोट घेऊन मोकळे व्हायचे". पूर्वी दूरवर कोणाच्या तरी बाबतीत घडणारा डिव्होर्स हा त्याचे "टॅबूपण" सोडून आपल्या दारापर्यंत कधी येऊन ठेपला हे बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे कळलेच नाही असो. पण त्यामुळे उद्भवणारे आपल्यासारखे नवीन प्रश्नही आता हळूहळू वर यायला लागले आहेत आणि त्यातच मुले असतील तर अजून वेगळे प्रश्न निर्माण होतात, त्यामुळे "श्रद्धा और सबुरी" हे धोरण संसारामध्येही उपयोगी पडते. असो. या अनुषंगाने त्याची थोडक्यात माहिती घेऊ.
आपण या पूर्वीही पहिले आहे की हिंदू वारसा कायदा कलम १४ अन्वये महिलांना एखादी मिळकत वारसाने, वाटपाने , पोटगीसाठी किंवा पोटगीच्या फरकापोटी, मृत्यूपत्र किंवा बक्षीसपत्राने किंवा खरेदीने, स्त्रीधनापोटी इ. प्रकारे आणि कोणाकडूनही मिळाल्यास ती महिला अश्या मिळकतींची संपुर्ण मालक होते. याला अपवाद म्हणजे ज्या मिळकतींमध्ये फक्त तहहयात राहण्याचा हक्क दिला असेल त्या सोडून आणि त्यामुळे या केसमध्येही या महिलेची जी स्वतःची मिळकत पहिल्या लग्नाच्या वेळी घेतली होती ती तिची स्वतःची मिळकत असल्याने स्वतःच्या मर्जीप्रमाणे या मिळकतीचा उपभोग घेऊ शकता, तुमच्या हयातीत ती तबदील (ट्रान्सफर) करू शकता किंवा सगळ्यात सोपे आणि तुलनेने कमी खर्चाचा दस्त म्हणजे तुमचे मृत्युपत्र करून ठेवू शकता आणि त्यायोगे तुमच्या इच्छेप्रमाणे कोणालाही ती मिळकत तुमचे मृत्युपश्चात देऊ शकता, असा सल्ला मी त्यांना दिला.
एक लक्षात ठेवावे की केवळ लग्न झाले म्हणून जोडीदारांना एकमकेकांच्या मिळकतीमध्ये आपोआप हक्क मिळत नाही.
नवरा बायको असले तरी आधी ते एक स्वतंत्र कायदेशीर व्यक्ती असतात. या केसमध्ये घटस्फोट झाल्यामुळे त्या महिलेच्या एकटीच्या मालकीच्या मिळकतीमध्ये पहिल्या नवऱ्याला काहीच हक्क मिळणार नाही आणि आता घटस्फोट झाला असल्याने तर पहिल्या नवऱ्याचा संबंधच संपला.
सावत्र मुले आणि मिळकतीमधील हक्क :
पुढचा प्रश्न होता सावत्र मुले आणि त्यांचा सावत्र आई वडिलांच्या मिळकतीमधील मिळकतीमधील हक्क आपण ज्याला बोली भाषेमध्ये "सावत्र" (Step ) म्हणतो त्याचा उल्लेख हिंदू वारसा कायद्यामध्ये आढळून येत नाही. आपल्याकडे "सावत्र" या शब्दाला एक नकारात्मक छटा आहे, पण सब घोडे बारा टक्के हा न्याय इथेही लागू नाही आणि सध्याच्या काळात अशी नवीन कौटुंबिक समीकरणे दिसायला लागली आहेत. घटस्फोट हा नवरा बायको या नात्याचा होतो, पण मुलांचे आई-वडील तुम्ही कायमच राहता. जेव्हा दुसऱ्या जोडीदाराला आधीच्या लग्नापासून झालेली संतती असेल, अश्या सावत्र मुलांना सावत्र आई- वडिलांच्या मिळकतीमध्ये कोणताही वारसा हक्क मिळत नाही. केवळ दुसरे लग्न केले म्हणून तुम्ही ते सावत्र मुलांचे आपोआप कायदेशीर आई - वडील होत नाही, त्यासाठी त्यांना दत्तक घेणे गरजेचे असते आणि कायदेशीरपणे दत्तक घेतलेली संतती ही नैसर्गिक संततीच समजली जाते. मात्र दत्तक कोण आणि कोणाला घेऊ शकते याच्या तरतुदी हिंदू अडॉप्शन आणि मेंटेनन्स कायद्यात आहेत ज्यायोगे वयाने १५ वर्षांपेक्षा मोठ्या मुलांना कायद्याप्रमाणे दत्तक घेता येत नाही हे लक्षात घ्यावे (अपवाद म्हणजे एखाद्या समाजात १५ वर्षांपेक्षा मोठ्या वयाची मुले दत्तक घेण्याची मान्यताप्राप्त चालीरिती - Custom असेल तर).
परत एकदा मृत्युपत्राची महत्व:
या केस मध्येही मृत्यूपत्राचे महत्व अधोरेखित झाले. समजा सदरील जोडप्याचे लग्न झाल्यावर ती महिला मृत्युपत्र न करता मयत झाली तर तिची मिळकत ही तिच्या पहिल्या लग्नापासून झालेला मुलगा आणि दुसरा नवरा यांच्यामध्ये समानरित्या विभागली जाईल आणि दुसरे लग्न व्हायच्या आधीच त्या महिलेचे काही बरेवाईट झाले तर मात्र केवळ मुलगा एकटाच वारस ठरेल. मात्र जेव्हा तुमचा दुसरा नवरा जेव्हा मयत होईल तेव्हा त्याचा हा हिस्सा हा त्याच्या क्लास-१ वारसांना म्हणजेच ती महिला आणि त्या नवऱ्याची आई (हयात असल्यास) याना सामान रित्या मिळेल, येथे बायकोच्या पहिल्या लग्नापासून झालेल्या म्हणजेच सावत्र मुलाला काहीही हक्क मिळणार नाही. त्यातच त्यांना मी विचारले की ते लग्न कधी करणार आहेत, तर त्यांनी सांगितले की नक्की ठरले नाही, पण लवकरच करू. मग तर त्यांनी वेळ न दवडता दोघांनीही तज्ञ वकीलांकडून वेळीच मृत्यूपत्र बनवून घेऊन ते रजिस्टर करून ठेवणे कधीही श्रेयस्कर राहील, हा सल्ला त्यांना मनोमन पटला .
ॲड. रोहित एरंडे ©
Comments
Post a Comment