बक्षीसपत्र करायचे का मृत्युपत्र ? #लोकमत : ऍड. रोहित एरंडे ©
बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना स्वतःच्या मिळकतीचे मृत्युपत्र करून ठेवावे का बक्षीसपत्र करून ठेवावे याबाबत गल्लत होताना दिसून येते. खरेतर या दोनही दस्तांची जातकुळी वेगळी आहे.मृत्यूपत्रासाठी कोणताही स्टँम्प द्यावा लागत नाही, त्याचे रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक नाही (तरीही ते जरूर करावे) , लाभार्थ्यांना ते मान्य आहे असे लिहून द्यावे लागत नाही; तर या तीनही गोष्टी बक्षीसपत्रासाठी करणे अनिवार्य आहेत. तसेच मृत्यूपत्राचा अंमल हा ते करणाऱ्याचा मृत्यूनंतर होतो, तर बक्षीसपत्राद्वारे मिळकतीमधील हक्क आणि अधिकार हे त्या व्यक्तीच्या हयातीमध्येच तबदील होतात. या लेखाद्वारे आपण बक्षीसपत्राबाबत थोडक्यात माहिती घेऊ.
१. स्वतःच्या मालकिची आणि 'अस्तित्वात' (existing) असलेली स्थावर किंवा जंगम मिळकत बक्षिस पत्राने तबदील ( ट्रान्सफर) करता येते. जो मिळकत लिहून देतो त्यास डोनर असे म्हणतात आणि ज्याला मिळते त्याला डोनी म्हणतात. थोडक्यात जी गोष्ट अस्तित्वात नाही तिचे बक्षीसपत्र करता येत नाही. संपूर्ण मिळकतच बक्षीस द्यावी लागते असे नाही, मिळकतीमधील ठराविक हिस्सा देखील देता येतो. हल्ली पुनवर्विकासामध्ये नवीन फ्लॅटवर मुलांचे नाव येण्यासाठी जुन्या फ्लॅटचे संपूर्ण किंवा ५०% हिश्श्याचे बक्षीसपत्र करून ठेवतात. कारण ज्यांच्या नावावर जुना फ्लॅट असतो त्यांचेच नवीन फ्लॅटवर नाव लागू शकते.
२. विना मोबदला केलेले 'खरेदीखत' हे बेकायदेशीर ठरते, तर बक्षीस पत्र हे "विना-मोबदलाच" असावे लागते. तसेच काही अटींना अधीन राहून म्हणजेच "कंडिशनल" बक्षीस पत्र देखील करता येते आणि अश्या तिची पूर्तता न झाल्यास बक्षीसपत्र रद्द करण्याचा अधिकार डोनरला असतो.
३. मात्र बक्षीसपत्र हे प्रेमापोटी, आपुलकीपोटीच असले पाहिजे अशी व्यवहारात पध्दत असली तरी अशी अट कायद्यात नाही.
४. स्थावर मिळकतीचे बक्षीसपत्र वैध होण्यासाठी ते नोंदणीकृत करणे म्हणजेच "रजिस्टर" करणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यावर डोनर, तसेच २ साक्षीदारांनी सही करणे गरजेचे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे डोनीने देखील "बक्षीस पात्र मान्य आहे" असे लिहून सही करणे गरजेचे आहे. जंगम (मुव्हेबल) मिळकतीचे बक्षिसपत्र हे नोंदणीकृत दस्ताने किंवा प्रत्यक्ष त्या वस्तूचा ताबा देऊन करता येते.
५. बक्षिस पत्र आणि स्टॅम्प ड्युटी :
महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्ट अन्वये बक्षीसपत्र नोंदविण्यासाठी अनुच्छेद ३४ अन्वये स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. ठराविक नात्यांमध्ये आणि निवासी किंवा शेतीच्या जागेसंदर्भात केल्या जाणाऱ्या बक्षीसपत्राला स्टँम्पड्युटी मध्ये सवलत आहे. मात्र पुण्यासारख्या ठिकाणी एलबीटी /मेट्रो सरचार्ज द्यावाच लागतो.
६. बक्षीस पत्र 'अपवादात्मक' परिस्थितीमध्येच रद्द करता येते.
बक्षीस पत्र 'अपवादात्मक' परिस्थितीमध्येच रद्द करता येते. जर एखादी विशिष्ट गोष्ट समजा घडली तर बक्षीसपत्र रद्द होईल, असे जर डोनर आणि डोनी ह्यांनी ठरविले असेल आणि तशी गोष्ट घडली तरच बक्षीसपत्र रद्द होऊ शकते. मात्र अशी विशिष्ट गोष्ट घडणे किंवा न घडणे ह्यावर डोनरचे नियंत्रण असेल, तर असे बक्षीसपत्र रद्द करता येत नाही. तसेच ज्याप्रमाणे एखादा करार रद्द करता येतो ती कारणे सिध्द झाल्यास (फ्रॉड, फसवणूक, धमकी इ. ) बक्षीपत्र रद्द करता येते .
७. ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाचे : ,
२००७ सालच्या ज्येष्ठ नागरिक संरक्षण कायद्याच्या कलम २३ प्रमाणे एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने त्याचा 'नीट सांभाळ करणार' या अटीवर लाभार्थ्याला बक्षीसपत्र करून दिले, परंतु त्या लाभार्थ्याने असा सांभाळ केला नाही हे सिद्ध झाल्यास, असे बक्षीस पत्र हे लबाडीने करून घेतले असे गृहीत धरून संबंधित ट्रिब्युनल कडून रद्द होऊ शकते, मात्र अशी स्पष्ट अट बक्षीसपत्रामध्ये लिहिणे क्रमप्राप्त आहे असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे. त्याचप्रमाणे "जेवायला ताट देऊ द्यावे, पण बसायला पाट देऊ नये" या म्हणीप्रमाणे बक्षीसपत्र नोंदविल्यावर लगेचच मालकी हक्क जात असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी बक्षीसपत्र करताना हा विचार डोक्यात असावा किंवा कमीतकमी स्वतःला आणि वैवाहिक जोडीदाराला त्या फ्लॅट्मधेय तहहयात राहण्याचा आणि फ्लॅट उपभोगण्याचा हक्क (life Interest ) नक्की ठेवावा
ऍड. रोहित एरंडे ©
Comments
Post a Comment