विधवा सुनेचे सासरकडील मिळकतीमधील हक्क : ॲड. रोहित एरंडे ©

 विधवा सुनेचे सासरकडील मिळकतीमधील  हक्क 

ॲड. रोहित एरंडे ©

आमच्या मुलाचे मागील वर्षी अकस्मात निधन झाले. या धक्क्यातून अजूनही आम्ही सावरलेलो नाही  तोच आमची सून आता सतत काहीतरी भांडणे काढून माझ्या   संपत्तीमधला हिस्सा मागत आहे, नाहीतर कोर्टात जैन अशी धमकी देत आहे. जी काही संपत्ती आहे ती मी  स्वतः कमावलेली आहे. आम्हाला    अजून   १ मुलगी  देखील आहे. सुनेला दुसरे लग्न देखील करायचे आहे. तर सुनेला आमच्या मिळकतीमधील हिस्सा द्यायला लागतो  का ?    काही लोकं आम्हालाच  सुनेविरुद्ध कोर्टात जाण्यास सांगत आहेत ? काय करावे  सुचत नाही.. 

एक त्रस्त  वडील आणि सासरे , पुणे. 

सर्व प्रथम तुम्हाला या दुःखद प्रसंगामधून तुम्हा उभयतांना  लवकर सावरण्याची ताकद परमेश्वर देवो.  मात्र जेव्हा कायद्याचा प्रश्न  येतो तेव्हा सजग असणे गरजेचे असते आणि कायद्यामध्ये भावनांना थारा  नाही हे  लक्षात घेऊन लवकर पुढची पाऊले उचला. 

 आता तुमच्या प्रश्नाकडे वळू या. सर्वप्रथम ही  सर्व मिळकत तुम्ही म्हंटल्याप्रमाणे  स्वकष्टार्जित   असल्याने त्यामध्ये   तुमच्या हयातीमध्ये तुम्ही  सोडून अन्य कोणालाही त्यात मालकी हक्क नाही त्यामुळे तुम्ही तुमची मिळकत तुमच्या हयातीमध्ये कोणाला दान देऊ शकता किंवा तबदील करू  शकता.    केवळ लग्न झाले म्हणून तुमच्या   पत्नीला   आणि तुमची मुले -मुली आहेत म्हणून त्यांना जन्मतःच कोणताही  हक्क तुमच्या स्वकष्टार्जित मिळकतीमध्ये प्राप्त होत नाही.    त्यामुळे तुमच्या मयत मुलालाच मुदलात हक्क नसल्याने तुमच्या  सुनेला सध्या तर अजिबातच आत्ता मालकी  हक्क नाही.   

मात्र सुनेला हक्क कधी मिळू शकतो, हेही बघणे गरजेचे आहे.  समजा तुम्ही  मृत्युपत्र  न करता मरण पावलात , तर  अश्या स्थितीमध्ये पुरुषांना लागू होणारे  हिंदू  वारसा कायद्याचे  कलम  ८ लागू होईल ज्या अन्वये  सर्व प्रथम तुमचे  क्लास-१ हेअर्स  ज्यांच्यामध्ये प्रामुख्याने   तुमची  विधवा पत्नी, मुलगा -मुलगी (मुले) ,आई (हयात असल्यास) ,   मुलगा -मुलगी आधीच मयत झाली असतील तर त्यांची मुले (तुमची नातवंडे), मुलाची विधवा पत्नी (तुमची सून)   या  वारसांना  समान पद्धतीने मिळकतीमध्ये हक्क मिळेल आणि एकदा हक्क प्राप्त झाल्यानंतर जर  सुनेने दुसरे लग्न केले तर तो हक्क नंतर काढून घेता येत  नाही किंवा आपोआप रद्द होत नाही.  पण असा हक्क प्राप्त व्हायच्या आधीच म्हणजेच तुमच्या हयातीमध्ये  समजा सुनेने दुसरे लग्न केले तर मात्र  तिचा तुमच्या मिळकतीवर तुमचे मृत्युपश्चात सुध्दा काहीही हक्क राहणार नाही, मात्र नातवाचा  राहील.  


या प्रश्नामुळे परत एकदा मृत्युपत्राचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. मृत्यू निश्चित असला तरी त्याची वेळ सर्वात अनिश्चित असते   म्हणून सर्वानी  वेळीच तज्ञ् वकिलांच्या मदतीने मृत्युपत्र करून ठेवा. वेळ काही सांगून येत नाही आणि मृत्यूला  वयाची अटही   नाही. 


राहिला प्रश्न कोर्टात जाण्याचा. असा सल्ला देणार "हितचिंतक " सगळीकडे असतात आणि जे पिना मारून नामे निराळे राहतात. आपल्या केसमध्ये तर तुम्ही आत्ता   कोर्टात जाऊन काहीही साध्य होणार नाही., उलट वेळ, पैसे आणि बाजारात   न विकत मिळणारी मानसिक शांतता मात्र नक्की खर्च होईल. सून जरी कोरत गेली तरी तिला कोणताच मालकी हक्क मिळणार नाही, मात्र हे तिचे वैवाहिक घर (marital home ) असल्याने ती राहण्याचा हक्क सांगू शकते. असो. 


सासू सासरे आणि सून  या नात्याची  केमिस्ट्री घराप्रमाणे बदलते आणि तुमच्या केसमध्ये ही केमिस्ट्री दुरुस्त होतीय का याचे प्रयत्न करून बघा. 'तुटे वाद, संवाद तो हितकारी' या समर्थ वचनाप्रमाणे बोलून बघा, काही गैरसमज झालेत का किंवा मुद्दामहून कोणी कान  भरलेत का, हे सुध्दा तपासून बघा. बऱ्याचदा अश्या जवळच्या नात्यांमध्ये आजू-बाजूचे लोकच आगीत तेल ओतत असतात. तुमच्या केसमध्ये   तुमचा नातू हा तुमच्या आणि सुनेमधील    समान धागा आहे, त्या धाग्याने जोडण्याचा प्रयत्न करा. सर्व प्रयत्न व्यर्थ झाल्यास शेवटी कायदेशीर कारवाईचा पर्याय  आहे. 


 ॲड. रोहित एरंडे ©


Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

पॉवर ऑफ ऍटर्नी - एक महत्वाचा दस्तऐवज.- ऍड. रोहित एरंडे. ©