वाहनाचा दरवाजा निष्काळजीपणे उघडणे अयोग्यच: दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय ॲड. रोहित एरंडे ©
वाहनाचा दरवाजा निष्काळजीपणे उघडणे अयोग्यच: दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
ॲड. रोहित एरंडे ©
रस्त्यावर वाहन चालवताना चालकाने केवळ स्वतःच्या वाहनाच्या हालचालींकडे लक्ष देणे पुरेसे नसते, तर आजूबाजूच्या वाहतुकीचीही योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असते. विशेषतः रस्त्याच्या कडेला किंवा वाहतुकीच्या मार्गात वाहनाचा दरवाजा उघडताना मागून अथवा बाजूने येणाऱ्या वाहनांची पाहणी करणे ही चालकाची मूलभूत जबाबदारी आहे आणि त्यात कसूर झाल्यास अनवस्था प्रसंग ओढवू शकतो.
दिल्ली उच्च न्यायालयाने नुकतेच एका याचिकेवर निर्णय देताना नमूद केले की, आजूबाजूला न बघता एकदम वाहनाचा दरवाजा उघडल्यामुळे मागून येणाऱ्या व्यक्तीला अपघात अपघात होणे हे स्पष्ट व गंभीर निष्काळजीपणाचे कृत्य आहे आणि त्याबद्दल नुकसान भरपाई देण्यास संबंधित वाहनचालक किंवा विमा कंपनी बांधील आहेत.
या केसची पार्श्वभूमी थोडक्यात बघू यात.
20 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी सुमारे 3.30 वाजता दिल्लीस्थित २१ वर्षीय रोशन कुमार साहू हे मोटरसायकलवरून असता त्यांच्या पुढे चाललेल्या एक कार जात होती. मात्र अचानक कारचालकाने मागचे पुढचे काहीही न बघता तसेच कोणताही सिग्नल न देता एकदम कारचा दरवाजा उघडला आणि दुर्दैवाने साहू यांच्या मोटरसायकलची त्या उघडलेल्या दरवाजाला धडक झाली आणि या अपघातात श्री साहू यांना गंभीर दुखापत झाली आणि कंबरेखालील भागात ९०% कायम स्वरूपी अपंगत्व आले ( traumatic paraplegia).
त्यासाठी नुकसान भरपाई मिळावी म्हणून श्री साहू यांनी तीस हजारी अपघात प्राधिकरण, दिल्ली येथे केस दाखल केली आणि प्राधिकरणाने साहू यांच्या साक्षीला महत्त्व देताना नमूद केले की कारचालकाने कोणतीही सूचना न देता व समोरून किंवा मागून येणाऱ्या वाहतुकीची तपासणी न करता दरवाजा उघडणे या निष्काळजीपणाला दुसऱ्या पुराव्याची गरज नाही आणि श्री. साहू आयुष्यभराच्या Attendant Charges साठी ₹3.50 लाखांची नुकसान भरपाई मंजूर केली. मात्र त्याविरुद्ध विमा कंपनी विमा कंपनी कार चालकाचा निष्काळजीपणा मान्य करण्यास तयार नव्हती आणि म्हणून कंपनीने या निकालास दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागितली.
उच्च न्यायालयात कंपनीने असा पवित्रा घेतला की उलट contributory negligence च्या तत्वाप्रमाणे श्री. साहू हेच कारच्या खूप जवळून जात असल्याने त्यांनी नीट बघायला हवे होते आणि म्हणून ते सुद्धा या अपघाताला जबाबदार आहेत असा पवित्र कंपनीने घेतला.
या युक्तिवादाच्या समर्थनार्थ Rules of the Road Regulations, 1989 मधील Regulation 23 चा आधार घेण्यात आला.ज्यायोगे मागून येणाऱ्या वाहनाने पुढील वाहनापासून इतके सुरक्षित अंतर ठेवणे अपेक्षित आहे की पुढील वाहन अचानक मंदावले किंवा थांबले तरी धडक होऊ नये.
मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळताना नमूद केले की ‘सुरक्षित अंतराचा हा नियम एकदम दरवाजा उघडण्याच्या निष्काळजीपणाला झाकू शकत नाही. न्यायमूर्ती अनिश दयाल यांनी पुढे स्पष्ट केले की, मागून येणाऱ्या वाहनाने सुरक्षित अंतर राखण्याची जबाबदारी असली तरी त्याचा अर्थ असा होत नाही की पुढील वाहनाचा चालक आजूबाजूची वाहतूक न पाहता अचानक दरवाजा उघडू शकतो. त्यांच्याच शब्दांत बोलयचे तर “Opening the car door without checking the oncoming traffic is certainly an act of sheer negligence.”
विमा कंपनीने नुकसानभरपाईच्या रकमेलाही आणि तक्रारदाराच्या ९०% अपंगत्वालाही आव्हान देताना युक्तीवाद केला की कायमस्वरूपी शारीरिक अपंगत्वाची टक्केवारी आणि कमाईच्या क्षमतेवरील परिणाम हे नेहमी समान असतीलच असे नाही. मात्र उच्च न्यायालयाने हाही आरोप फेटाळताना नमूद केले की तक्रारदार एक खासगी शिक्षक म्हणून काम करतात आणि त्यांना दोन्ही पायांमध्ये गंभीर कायमस्वरूपी अपंगत्व आले होते. तो स्वतंत्रपणे चालू शकत नव्हता आणि दैनंदिन कामांसाठी इतरांवर अवलंबून झाला होता. त्यामुळे केवळ हातांची हालचाल काही प्रमाणात सक्षम असणे हे नुकसान भरपाई नाकारण्याचे कारणच होऊ शकत नाही आणि आयुष्यभराच्या Attendant Charges साठी ₹3.50 लाख ही रक्कम एकदम उचित आहे.
या निर्णयाचा परिणाम विशेषतः शहरांमधील वाहतुकीच्या संदर्भात महत्त्वाचा आहे. रस्त्याच्या कडेला वाहन थांबवून दरवाजा उघडणे ही रोजच्या वापरातील सामान्य कृती असली तरी ती निष्काळजीपणे केली तर गंभीर अपघात होऊ शकतो आणि एका क्षणाची निष्काळजीपणा दुसऱ्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. सबब कार, टॅक्सी, बस किंवा इतर वाहनातून बाहेर पडताना चालक अथवा प्रवाशाने दरवाजा उघडण्यापूर्वी आरशात मागील वाहतूक तपासणे; blind spot कडे लक्ष देणे गरजेचे आहे
(संदर्भ : इंडसइंड जनरल इन्शुरन्स कं . विरुध्द रोशन कुमार साहू आणि इतर, प्रकरण क्रमांक: MAC.APP. 218/2026 : Citation: 2026 DHC 2690.)
Comments
Post a Comment