"कष्टाचे काम करताना हृदयविकाराने मृत्यू आल्यास इन्शुरन्स कंपनी विमा विमा रक्कम देण्यास बांधील ... ॲड. रोहित एरंडे ©

"कष्टाचे काम करताना हृदयविकाराने मृत्यू आल्यास इन्शुरन्स कंपनी विमा विमा रक्कम देण्यास बांधील ...

ॲड. रोहित एरंडे ©

भारतातून परदेशामध्ये जसे  आय.टी. क्षेत्रामधून नोकरीसाठी लोकं जातात त्याचप्रमाणे पूर्वीपासून आखाती देशांमध्ये मजूर किंवा शारीरिक कष्टाची कामे असलेल्या नोकऱ्यांसाठी देखील बरीच लोकं भरती होतात. या लोकांचे कामाचे स्वरूप जास्त कष्टदायक आणि तणावपूर्ण असते. अशा लोकांसाठी अर्थातच विमा घेणे गरजेचे असते आणि त्यामध्ये "अपघाती मृत्यु" झाल्यास नुकसानभरपाई मिळण्यासाठी विशेष करून विमा घेतला जातो. मात्र  जर असे तणावपूर्ण कामाचे स्वरूप असताना काम करतानाच एखाद्या कामगाराचा  हृदयविकाराने मृत्यू   झाल्यास असा मृत्यू नैसर्गिक म्ह्णून विमा क्लेम नाकारायचा का अशा विशेष पॉलिसीप्रमाणे अपघाती मृत्यु म्हणून क्लेम द्यायचा या वेगळ्या  प्रश्नावर  ओडिशामधील बेहरामपूर ग्राहक आयोगाने नुकताच एक    महत्वपूर्ण निकाल दिला आहे. 

या केसची थोडक्यात पार्श्वभूमी बघू यात.   श्री. बिजॉय गोचावत या  व्यक्तीस ओमान मध्ये गवंडी कामाची नोकरी मिळते आणि तिकडे जाताना सगळ्यांप्रमाणेच त्याने इफको-टोकियो या कंपनीची १० लाख रुपयांची विमा पॉलिसी घेतलेली असते ज्यामध्ये अपघात,  अपघाती मृत्यु किंवा कायमचे अपंगत्व आल्यास विमा रक्कम मिळण्याची असते. दुर्दैवाने श्री. बिजॉय गोचावत यांचा ४ जानेवारी २०१७ रोजी काम करत असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू होतो आणि "अज्ञात कारणांनी हृदयक्रिया बंद पडून (कार्डियाक अरेस्ट ) मृत्यु" अशी नोंद तिकडच्या मृत्यू दाखल्यात केली जाते. इकडे भारतात अंत्यसंस्कार झाल्यावर पॉलिसी धारकाची लाभार्थी पत्नी विमा रक्कम मिळण्यासाठी कंपनीकडे अर्ज दाखल करते, मात्र कंपनीकडून अनास्थेशिवाय काहीही न मिळाल्याने पिडीत असहाय पत्नी ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करून १० लाख रुपये अधिक व्याज मिळण्यासाठी अर्ज करते.

कंपनीचे म्हणणे असते की पॉलिसीचे पैसे हे  फक्त पॉलिसी धारकाचा अपघाती  मृत्यू झाल्यासच मिळण्याचे आहेत आणि  हृदयविकाराने मृत्यू हा काही अपघाती मृत्यू नसून नैसर्गिक मृत्यू आहे आणि म्हणून कंपनी पॉलिसीचे पैसे देण्यास बांधील नाही. 

अखेर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आणि या विषयावरील सर्वोच्च न्यायालयाने पूर्वी दिलेल्या निकालांचा आधार घेऊन ग्राहक मंचाने एका दुर्दैवी पत्नीस न्याय मिळवून दिला. 

  नैसर्गिक मृत्यू का अपघाती मृत्यू ? 

 ग्राहक मंचाने नमूद केले की सामान्य परिस्थितीमध्ये हृदयक्रिया बंद पडून (कार्डियाक अरेस्ट ) मृत्यू येणे हे नैसर्गिक मृत्यूचं समजला जाईल. परंतु मयत व्यक्तीचे  कामाचे स्वरूपच अतिशय कष्टदायक   आणि तणावपूर्ण होते आणि त्याची परिणीती ही हृदयक्रिया बंद पाडण्यात झाली असल्याने हा अपघाती मृत्यूच धरला जाईन. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या शकुंतला श्रेष्ठी वि. प्रभाकर गरवाली -  AIR 2007 SUPREME COURT 248 या कामगार नुकसान भरपाई कायद्यावरील  निकालाचा आधार घेतला. या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने एखादी घटना अपघाती मृत्यू आहे किंवा कसे हे ठरविण्यासाठी खालीलप्रमाणे  तीन  घटक असणे गरजेचे आहे हे नमूद केले आहे 

१. Stress & Strain  - ताण  आणि अतिश्रम = पॉलिसी धारकाचे काम हे शारीरिक अतिश्रमाचे आणि ताणाचे असल्याचे सिध्द होंते गरजेचे आहे. या केसमध्ये मयत कामगार ज्याप्रकारचे गवंडी काम करत होता त्यामध्ये मोठाल्या विटा उचलणे, सतत वाकून काम करणे आणि उष्ण वातावरणात काम करणे या गोष्टी  ताण  आणि अतिश्रमाच्या धरल्या जातात असेही न्यायालायने नमूद केले.  

२. Death During Employment  - प्रत्यक्ष काम करत असताना मृत्यू - हा दुसरा महत्वाचा घटक आहे थोडक्यात रोजगारातून उद्भवणारी आणि रोजगाराच्या दरम्यान मृत्यू ओढवल्यास तो देखील अपघाती मृत्यु समजला जाईल. 

३. Acceleration of Death: मृत्यू लवकर ओढवण्यास निमित्त : सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे की जरी एखाद्या कामगारास पूर्वी पासून हृदयविकार असला तरीही कामाच्या  स्वरूपाने  हृदयविकार बळावून कामाच्या  दरम्यान कामगाराचा मृत्यु ओढवल्यास एम्प्लॉयर  नुकसानभरपाई देणाया बांधील राहील. 

 ग्राहक मंचाने "Harness Principle" चा आधार घेतला. Harness म्हणजे शब्दशः कमला जुंपणे. त्याप्रमाणे एखादा कामगार कमला जुंपलेला असताना त्याचा मृत्यू ओढवल्यास कामाच्या अती ताणामुळे त्याचा मृत्यू ओढवला असे मानण्याचा कोर्टांचा कल राहतो. अर्थात या साठी र्पत्येक एक्सच्या फॅक्टस बघणे गरजेचे असतेच. पुढे "कामाचे प्रदीर्घ  तास आणि थकवून टाकणारी परिस्थिती यांचा सकृत दर्शनी  संबंध हृदयक्रिया बंद पडण्यास आहे आणि सामान्यपणे इन्शुरन्स कंपनी आणि  एम्प्लॉयर नुकसानभरपाई देण्यास बांधील आहेत" या सर्वोच्च न्यायालायच्या परमपाल सिंग विरुद्ध नॅशनल इन्शुरन्स कंपनी (AIR 2013 SUPREME COURT 974) याही निकालाचा आधार घेतला. 

अखेर तक्रारदार पत्नीस १० लाख रुपये ९% वार्षिक व्याजाने आणि ५००० रुपये खर्चापोटी देण्याचा आदेश इन्शुरन्स कंपनीस देण्यात आला.

 एक वेगळी केस या निमित्ताने बघायला मिळाली. ग्राहक मंचाने  माणुसकी दाखवून आणि कामगार कायद्यांमधील निकालांच्या तत्वांचा आधार घेऊन अशा कामगारांसाठी, जे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कुटुंबासाठी कष्ट करत असतात, एक वस्तुपाठ घालून दिला आहे. 


(संदर्भ : श्रीमती कुमारी गोचायत विरुध्द इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी, तक्रार क्र. DC/354/CC/39/2018, निकाल तारीख ०५/०१/२०२६)


ॲड. रोहित एरंडे ©

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

पॉवर ऑफ ऍटर्नी - एक महत्वाचा दस्तऐवज.- ऍड. रोहित एरंडे. ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©