ज्यांनी सांभाळ केला त्यांनाच इस्टेटीमध्ये हक्क मिळतो ? - ॲड. रोहित एरंडे © #लोकमत
ज्यांनी सांभाळ केला त्यांनाच इस्टेटीमध्ये हक्क मिळतो?
व्यवहार आणि नातेसंबंध यामध्ये गल्लत करून चालत नाही.
काही लोकांना आपला स्वार्थ कसा साधायचा हे चांगलेच माहिती असते, नाही का ?
ॲड. रोहित एरंडे. ©
"माझ्या मैत्रिणीने आणि तिच्या नवऱ्याने मैत्रिणीच्या आई-वडिलांना सांभाळले आहे. तिचे बहीण आणि भाऊ पैशाने खूप श्रीमंत आहेत मात्र ते कधीही वेळेला मदतीला आले नाहीत. वडिलांचे आजारपण, खर्च मैत्रिणीनेच केले, प्रसंगी आम्ही देखील मदत केली आहे. काही महिन्यांपूर्वी मैत्रिणीचे वडील अचानक गेले. आता आजारी आईला देखील मैत्रीणच सांभाळत आहे, मात्र काही दिवसांपूर्वी बहीण भावांनी वकीलांकडून नोटीस पाठवून मैत्रिणीच्या वडिलांचं मिळकतीमध्ये हक्क मागितला आहे. खरे तर मैत्रिणीने आणि तिच्या आई नवऱ्यानेच तिच्या आई वडिलांचा सर्वतोपरी सांभाळ केल्याने तिच्या बहीण-भावाला हक्क राहतो का ? मैत्रिणीने जी काही सेवा शुश्रूषा केली त्यामुळे तिलाच सगळा किंवा जास्त हिस्सा मिळायला हवा ना ?
एक वाचक, नाशिक
सामान्य लोकांची डॉक्टर, ज्योतिषी आणि वकील यांचेकडून एक नैसर्गिक अपेक्षा असते की त्यांनी लोकांना आवडेल असा सल्ला द्यावा, पण आवडेल असा सल्ला न देता योग्य तो सल्ला देण्याची या सल्लागारांवर जबाबदारी असते. ..
कायदेशीर हक्क आणि इमोशन्स - भावना यांच्यामध्ये कायदा हक्कांच्या बाजुने उभा राहतो. एखादी गोष्ट अनैतिक असली म्हणजे ती बेकायदेशीर असेलच असे नाही , हे लक्षात ठेवावे.
कायद्यामध्ये भावना चालत नाहीत आणि आर्थिक स्थितीप्रमाणे मिळकतीमधील वारसांचे हक्क कमी-जास्त होत नाहीत.
"खायला आधी, कामाला कधी-मधी" अशी एक मराठीत म्हण आहे. हक्क आणि कर्तव्ये या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, पण लक्षात कोण घेतो ? "पाठची बहीण झाली वैरीण "असे वाटावे असे प्रसंग अनेकांच्या आयुष्यात येतात. आपल्या आई-वडिलांची सेवा करणे हे प्रत्येक मुला-मुलीचे, मग तो विवाहित असो व नसो, आणि यामध्ये जावई आणि सुना देखील भाग घेतातच त्यामुळे तुमच्या मैत्रिणीने आणि तिच्या नवऱ्याने योग्य तेच केले आहे. परंतु वडिलांची सेवा केली म्हणून (तुमच्या मैत्रिणीला) त्यांच्या मिळकतीमध्ये जास्त हक्क मिळावा अशी तरतूद कायद्यात नाही कारण वर म्हटल्याप्रमाणे कायदा भावना बघत नाही.
मागील काही लेखांमध्ये आपण पहिले आहे की केवळ लग्न झाले म्हणून श्वशुरगृही सुनेला -जावयाला आपोआप मालकी हक्क मिळत नाही, तो प्रत्येकाच्या वैवाहिक जोडीदारपश्चात कदाचित मिळू शकतो. तसेच तुमच्या मैत्रिणीच्या भावा -बहिणींची आर्थिक परिस्थिती जरी उत्तम असली आणि त्यांनी कधीही त्यांच्या आई- वडिलांकडे बघितले नसले जे नैतिकदृष्ट्या चूक असेल आणि ही त्यांची वृत्ती देखील असू शकेल, परंतु म्हणून त्यांचा मिळकतीमधील हक्क कमी होणार नाही. कदाचित, ज्यांचा विश्वास असेल त्यांच्यासाठी, कर्माचा सिद्धांत त्याची काळजी घेईलही, .
तुमच्या मैत्रिणीची केस ही "इनहेरिटेड " मिळकतीची असल्यामुळे तिच्या वडिलांच्या पश्चात (त्यांनी मृत्युपत्र केले नाही असे गृहीत धरून) त्यांच्या मिळकतीमध्ये त्यांची पत्नी , आणि तुमची मैत्रीण धरून त्यांची तीन मुले असे एकूण ४ अविभक्त हिस्से झाले आहेत. यातून विनामोबदला हक्कसोड पत्र तुमच्या मैत्रिणीच्या लाभात तिच्या बहीण भावांनी लिहून दिले तर त्याला अगदी नाममात्र अशी २००-५०० एवढीच स्टँम्प ड्युटी पडेल. पण आता वकीलांची नोटीस आल्यामुळे कदाचित तुमच्या मैत्रिणीला वाटपाचा दावा करावा लागेल असे वाटते.
असो. तुमच्या मैत्रिणीला विचारा की भले चुकीची असेल परंतु त्यांची बाजू कधी ऐकून घेतली आहे का ? अनुभवावरून असे सांगू शकतो की बरेचदा आपल्याला खरी वस्तुस्थिती माहिती असेलच असे नाही, जो तो आपली बाजूच बरोबर असे सांगत असतो. जवळच्या नात्यांमधील भांडणांमध्ये संवादाचा अभाव असल्याने आणि इगो जास्त असल्याने "हमसे आया न गया, तुमसे बुलाया न गया" अशी परिस्थिती असते. त्यामुळे तुम्ही मैत्रीण म्हणून एक तटस्थ मध्यस्थ म्हणून बोलू शकता का बघा. "तुटे वाद, संवाद तो हितकारी" त्यामुळे तुम्ही संवादाचे माध्यम बघून बघा.. नीट सुटले तर ठीकच नाहीतर, "येवा कोर्ट आपलोच असा..
परत एकदा मृत्यूपत्राचे महत्व सर्वांनी लक्षात घ्या आणि ते करण्यासाठी चाल-ढकल करू नका कारण मृत्यू निश्चित असला तरी त्याची वेळ सगळ्यात अनिश्चित असते, हे मैत्रिणीच्या वडिलांचं अचानक जाण्याने दिसून आले. त्यांनी जर वेळीच मृत्युपत्र करून ठेवले असते तर त्याप्रमाणे मिळकतीची वाटणी करून ठेवणे सुकर झाले असते आणि वारसांमधील वाद कदाचित झाले नसते.
ऍड. रोहित एरंडे ,
पुणे. ©
Comments
Post a Comment