नावात काय आहे ? विवाहानंतर महिलांना नाव बदलणे कायद्याने अनिवार्य असते का ? - ॲड. रोहित एरंडे ©

नावात काय आहे ?

विवाहानंतर महिलांना नाव बदलणे कायद्याने अनिवार्य असते का ? डिव्होर्सनंतर नाव बदलता येते का ?

ॲड. रोहित एरंडे ©

विख्यात इंग्रजी  लेखक, नाटककार  विल्यम शेक्सपियर यांच्या 'रोमियो आणि ज्युलियेट' (Romeo and Juliet) या अजरामर शोकांतिकेमधील "नावात काय आहे?, गुलाबाला आपण दुसऱ्या कोणत्याही नावाने बोलावले तरी त्याचा सुगंध असाच गोड राहील" हे वाक्य सर्वांना माहिती असेलच.  


तर काही दिवसांपूर्वी , लग्नानंतर महिलांनी माहेरचेच संपूर्ण  नाव    ठेवण्याची  वाढती प्रवृत्ती आणि भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या कायदेशीर अडचणी  या बाबत एक लेख वाचण्यात आला आणि हा मेसेज व्हॅट्सऍपवर खूप व्हायरल झाला आणि त्यावरील  चर्चेत लोकांचा बराच डेटा खर्ची पडला. यामध्ये मैल विरुद्ध पुरुषी संस्कृती असेही स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून आले आणि एकंदरीतच बऱ्याच ठिकाणी या विषयावर तिखट चर्चा झाल्याचे दिसून आले. या विषयावर कायदेशीर दृष्टीने लेख लिहिण्याची आमचे ग्रुप कॅप्टन मुकुंदराव लेले यांचेकडून विचारणा झाली आणि म्हणून  हा लेखन प्रपंच. 

  हा विषय महत्त्वाचा असल्यामुळे त्याकडे भावनिक नव्हे तर कायदेशीर दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. जन्माला आलेल्या बाळाचे नाव काय आणि कसे ठेवायचे या बद्दल आपल्याकडे   कायदा नाही.  आपल्याकडे पूर्वीपासून अशी पद्धत होती की जन्म दाखल्यावर  आई वडिलांचे नाव आणि  मुलगा / मुलगी अशीच नोंद असायची आणि बाळाचे नाव "बारशाला"  ठेवले जायचे आणि   शाळेत प्रवेश घेताना पहिल्यांदा नावाची अधिकृत नोंद व्हायचची. नंतर शाळेत प्रवेश घेताना पूर्ण नाव द्यायचे. गेल्या काही वर्षांत   बाळाचा जन्म झाल्यावर जेव्हा जन्म मृत्यू कायद्याखाली फॉर्म भरून घेतात, त्या वेळेलाच बाळाचे नाव सांगितले जाते, म्हणजे आपोआप जन्म दाखल्यावर सुद्धा नाव येते. 

लग्नानंतर बायकांनी   नाव बदलणे ही पद्धत बहुतेक सगळीकडे, पाश्चात्य देशांत सुद्धा दिसून येते आणि अनेक वर्षे बायकांनी देखील या पद्धतीवर आक्षेप घेतलेला दिसून येत नाही. लग्न झाल्यावर लग्न नोंदणी प्रमाणपत्र मिळाले की त्याआधारे, बँक खते, पण कार्ड इ. वर जुने नाव बदलून नवीन नाव सहजपणे घातले जायचे. पूर्वी नुसते आडनाव नाही, तर महिलांचे  नाव देखील बदलले जायचे.  मात्र अलीकडच्या  काळात जेव्हा महिला स्वत्रंत्र होऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहायला लागल्या तेव्हा हळू हळू नाव न बदलाचा ट्रेंड सुरु झाला असे म्हणायला हरकत नाही.  जुन्या पिढीतील लोकांना, ज्यामध्ये महिला देखील आहेत, त्यांना  लग्नानंतर  सुनेने  "नाव न बदलणे" हे धक्कादायक वाटत असते आणि  लग्नानंतर नाव बदलायचे की नाही हे निमित्त ठरून  वाद सुरु होऊन प्रकरण डिव्होर्स पर्यंत पोचल्याची देखील उदाहरणे आहेत.  

भारतात अनेक व्यक्ती  टोपणनाव वापरतात, विवाहानंतर नाव बदलतात, घटस्फोटानंतर पूर्वीचे नाव वापरतात, दोन आडनावे वापरतात, विविध भाषांतील स्पेलिंग वापरतात, किंवा अंकशास्त्राप्रमाणे स्पेलिंग बदलतात. कायदा या सर्व परिस्थितींसाठी पुराव्याच्या आधारे ओळख निश्चित करण्याची व्यवस्था ठेवतो. भारतीय कायद्यात पत्नीने पतीचे आडनाव धारण करणे बंधनकारक नाही

भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला स्वतःची ओळख ठेवण्याचा अधिकार देते. भारतातील कोणत्याही केंद्रीय कायद्यात विवाहानंतर महिलेने पतीचे आडनाव धारण करणे अनिवार्य असल्याची तरतूद नाही.

हिंदू विवाह अधिनियम, हिंदू वारसा अधिनियम, विशेष विवाह अधिनियम किंवा इतर कोणत्याही वैवाहिक कायद्यात पत्नीने नाव बदलले नाही तर तिचे वैवाहिक किंवा वारसाहक्काचे अधिकार कमी होतात, असे कुठेही नमूद नाही. पत्नी ही पतीची कायदेशीर वारसदार तिच्या वैध विवाहामुळे असते; तिच्या आडनावामुळे नव्हे.

आता  अनेक महिला लग्नानंतरही त्यांचे पूर्वीचेच नाव ठेवतात आणि अश्या नावांनी प्रॉपर्टी, बँका इ. व्यवहार देखील सुरळतीतपणे होतात, कुठेही आडकाठी येत नाही.  जर एखादी महिला विवाहानंतरही सर्वच ठिकाणी सातत्याने तिचे माहेरचे नाव वापरत असेल, तर कोणतीही अडचण येत नाही.  बरेचदा नावाचे दुसरे प्रश्न निर्माण होतात, जे पुरुषांबाबत देखील होऊ शकतात.  उदा. स्पेलिंग वेगळे असेल किंवा एका व्यक्तीला  दोन नावे असतील आणि वेगवेगळ्या ठिकाणी एकाच व्यक्तीची २ नावे लिहिली असतील, तर व्यवहारामध्ये अडचणी येऊ  शकतात आणि अशावेळी हि विसंगती दार करण्यासाठी "ही दोन नावे एकाच व्यक्तीची आहेत आणि दोन वेगळ्या व्यक्तींची नाहीत" अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र करून घ्यावे लागते. 


 आता या निमित्ताने जागेवर नाव लावायचे म्हणजे काय हे देखील थोड्यात पाहू या . 

बहुसंख्य लोकांना असे वाटत असते की, तहसीलदार ऑफिस मध्ये  ७/१२ च्या उताऱ्याला किंवा   प्रॉपर्टी कार्डला नाव लावायचा अर्ज दिला किंवा लाईट बिल, प्रॉपर्टी  टॅक्स बिलावर नाव लावले किंवा शेअर सर्टिफिकिटवर नाव बदलले, नॉमिनी म्हणून नाव लागले   की झाले.  मात्र यातील कुठल्याही कागदांना मालकीहक्काचा पुरावा म्हणून कायद्याने मान्यता नाही.  स्थावर  मिळकतीमधील मालकी हक्क हा कुठल्याही २ किंवा अधिक  व्यक्तींच्या हयातीमध्ये  खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाटप-पत्र यांसारख्या नोंदणीकृत दस्तानेच तबदील केला जाऊ शकतो आणि असे दस्त  नोंदणीकृत झाले की इंडेक्स-२ चा जन्म होतो, जो मालकीहक्काचा पुरावा समजला जातो. 

त्याचप्रकारे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मिळकतीमधील मालकी हक्क हा मृत्यूपत्राने किंवा मृत्यूपत्र केले नसेल तर वारसा हक्काने  तबदील होऊ शकतो.  वारसाहक्काने मालकी मिळाली असे सांगणारा इंडेक्स-२ मिळत नाही. एखाद्या व्यक्तीचे वारस आहेत यासाठी वारसाहक्क प्रमाणपत्र घ्यावे लागते.   मृत्यूपत्राप्रमाणे मालकी हक्क हा मात्र मृत्यूपत्र करणारी व्यक्ती (टेस्टेटर) मयत झाल्यावरच   प्राप्त होतो आणि मृत्यूपत्र नोंदविणे अनिवार्य नसले तरी ते नोंदविणे श्रेयस्कर आणि असे मृत्युपत्र नोंदविल्यानंतर मृत्युपत्र करणारा मयत झाल्यावर मृत्यू दाखल दिल्यावर  त्याचा 'इंडेक्स-३' मिळतो. 

वरील कोणत्याही प्रकारात नाव बदलले किंवा नाही म्हणून मालकी हक्क तबदील होण्यास कायदेशीर  अडचण येत नाही आणि बहुतांशी वेळा लग्नाआधीचे नाव (maiden name ) आणि लग्नानंतरचे नाव अशी दोन्ही नावे दस्तामध्ये आम्ही लिहिण्यास सांगतो. 

एक लक्षात घ्यावे की जरी लग्न झाले तरी नवरा आणि बायको हे दोघेही स्वतंत्र कायदेशीर  व्यक्ती असतात. विवाह प्रमाणपत्र हे पती-पत्नीच्या नात्याचा अधिकृत पुरावा असतो, त्यासाठी नाव बदलणे गरजेचे नाही.  त्यामुळे   फ्लॅट जरी   नवरा बायकोच्या  एकत्र मालकीचा असला आणि पहिले नाव नवऱ्याचे असो वा बायकोचे,   त्यातील एक मयत झाल्यावर  लगेच दुसरा जोडीदार  त्या फ्लॅटचा संपूर्ण मालक होत नाही. त्यासाठी गेलेल्या जोडीदाराने  मृत्युपत्र केले असल्यास ते  अन्यथा वारसा हक्क कायद्याने तो अविभक्त  हिस्सा वारसांवर  विभागला जातो, भले नॉमिनी कोणीही असो. 

 नाव  बदलता येते का ?

 एखाद्या व्यक्तीला मग ती स्त्री असो वा  पुरुष वा  अन्य कोणी, स्वेच्छेने  नाव बदलता येते. त्यासाठी  सरकारी राजपत्रामध्ये (Govt . Gazzette ) तशी घोषणा करता येते आणि २  वृत्तपत्रांमध्ये तशी जाहिरात द्यावी लागते. (अर्थात  त्यातील मजकुराची सत्यता सरकार स्वीकारत नाही असे स्पष्टपणे राजपत्रामध्ये लिहिलेले असते). या राजपत्राचा वापर करून सर्व ठिकाणचे नाव बदलून घेता येते. ही एक सामान्य  प्रशासकीय प्रक्रिया आहे. अनेक लोकं याचा वापर करत असतात. 

घटस्फोटानंतर महिलेला नाव बदलावे लागते का ?

घटस्फोट - डिव्होर्स हे आता भारतीय जीवांचे व्यवच्छेदक लक्षण झाले आहे असे म्हंटावं येईल एवढे याचे प्रमाण आता वाढले आहे. पूर्वी दूरवर कुठेतरी दिसणारा हा शब्द आता   घरात उंभर्थ्यांवर येऊन ठेपला आहे. डिव्होर्स केसेस मध्ये, किंबहुना परस्पर संमतीने घेतलेल्या डिव्होर्समध्ये तर हल्ली "डिव्होर्सनंतर कुठले नाव वापरणार " हे स्पष्टपणे  लिहिलेले असते पण जर का असे उभयता ठरले नसेल तर डिव्होर्सनंतर देखील वाद संपत नाहीत. या विषयावर मुंबईत उच्च न्यायालयाच्या  दोन सदस्यीय खंडपीठाने दिलेला एका महत्वाच्या निकालाचा संदर्भ देणे यथे क्रमप्राप्त आहे. 

याचिकाकर्त्या हेमा गाडगीळ यांनी   पासपोर्ट नूतनीकरणासाठी रितसर अर्ज केला होता . मात्र त्या घटस्फोटीत असल्याने त्यांना जर नवऱ्याचेच आडनाव लावायचे असेल, तर त्यांच्या घटस्फोटीत नवऱ्याची परवानगी आणल्याशिवाय पासपोर्ट नूतनीकरण करता येणार नाही, असे  पासपोर्ट ऑफिसरने त्यांना कळविले. त्याविरुध्द हेमा गाडगीळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. त्यावर निकाल देताना न्या. अभय ओक आणि न्या. ए.एस. मेनन यांच्या खंडपीठाने स्पष्टपणे नमूद केले की " असा कोणताही कायदा नाही जो बायकोला घटस्फोटानंतर नवऱ्याचे नाव वापरण्यापासून बंदी घालू शकतो. उलटपक्षी नवऱ्याचेच काय पण कोणतेही नाव लावण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि या कारणास्तव अँस्पोर्टचे नूतनीकरण रोखणे हे सरळसरळ घटनेच्या अनुच्छेद  २१ चे उल्लंघन होते"   

 (संदर्भ : हेमा गाडगीळ विरुध्द पासपोर्ट ऑफिसर (2015(2) ALL MR 879) Writ Petition No.6292 of 2012, ६ जानेवारी २०१५)


कायद्याचा उद्देश व्यक्तीची ओळख निश्चित करणे हा आहे; विशिष्ट आडनाव लादणे हा नाही.    "नावात काय आहे" या प्रसिध्द वाक्याप्रमाणे समस्या माहेरचे नाव ठेवण्यात नाही; समस्या सातत्य न राखण्यात आहे. म्हणून प्रत्येक विवाहित स्त्रीने, ती माहेरचे नाव वापरत असो किंवा सासरचे, सर्व  कागदपत्रांमध्ये एकच नाव वापरावे. असो. नाव काहीही ठेवा,    "नावे ठेवायची " सवय  थांबवणे गरजेचे, कसे ?

 

ॲड. रोहित एरंडे ©

 

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

पॉवर ऑफ ऍटर्नी - एक महत्वाचा दस्तऐवज.- ऍड. रोहित एरंडे. ©