गटारी अमावस्या नव्हे तर दिव्याची अवस : ॲड. रोहित एरंडे ©
गटारी अमावस्या नव्हे तर दिव्याची अवस : ॲड. रोहित एरंडे ©
महाराष्ट्राच्या लोकजीवनात अनेक सण, व्रतवैकल्ये आणि परंपरा अशा आहेत की त्यांचा अर्थ केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित राहत नाही. त्यामागे सामाजिक, सांस्कृतिक आणि भावनिक अशी अनेक पदरे दडलेली असतात. ‘दिव्याची अवस’ ही अशीच एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. नावाप्रमाणेच या परंपरेच्या केंद्रस्थानी आहे—दिवा -दीप .
महाराष्ट्रात ‘अवस’ हा शब्द सामान्यतः अमावास्येसाठी वापरला जातो. ‘दिव्याची अवस’ म्हणजे अमावस्येच्या दिवशी दिव्याची पूजा करून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा. काही ठिकाणी तिला ‘दिव्यांची अमावस्या’ असेही म्हटले जाते. या दिवशी घरातील दिवे, समई, पणत्या किंवा प्रकाश देणाऱ्या वस्तू स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते.
मात्र गेले काही वर्षांत या अमावास्येला "गटारी अमावस्या" असे म्हणणे प्रचलित झाले आहे आणि कारण काय तर दुसऱ्यादिवशी पासून श्रावण सुरु होणार आणि मग नवरात्र होई पर्यंत सणांची -धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असल्यामुळे आजचा दिवस जणू सामिष आहार आणि मद्यपान करण्याचा शेवटचा दिवस असल्याने भान हरवेपर्यंत मद्यपान करायचे इतके की पार गटारात लोळायचे !!!
मात्र या परंपरेचा गाभा अत्यंत सुंदर आहे—ज्या प्रकाशामुळे अंधार दूर होतो, त्याच प्रकाशाला नमस्कार करणे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याला विशेष स्थान आहे. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ‘दीपप्रज्वलनाने’ करण्याची प्रथा आजही सर्वत्र आढळते. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’—अर्थात अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जा, ही बृहदारण्यक उपनिषदातील प्रार्थना भारतीय विचारविश्वाचा मूलाधार मानली जाते. असतो मा सद्गमय (मला असत्याकडून सत्याकडे घेऊन चल), तमसो मा ज्योतिर्गमय (मला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन चल), मृत्योर्मा अमृतं गमय (मला मृत्यूपासून अमरत्वाकडे/मोक्षाकडे ने)- ही ती पूण प्रार्थना आहे त्यामुळे दिवा हा अज्ञानावर ज्ञानाचा, निराशेवर आशेचा आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय दर्शवतो.
दिव्याची अवस या संकल्पनेत हीच प्रतीकात्मकता अधिक ठळकपणे दिसते. अमावस्येचा काळोख आणि त्यामध्ये प्रज्वलित केलेला दिवा हा एक सुंदर सांस्कृतिक संदेश देतो—अंधार कितीही गडद असला तरी छोटासा प्रकाश त्याला आव्हान देऊ शकतो.
घरातील दिव्यांची पूजा : महिला वर्गाचे योगदान
परंपरेनुसार या दिवशी घरातील दिवे स्वच्छ करून, त्यांना तेल-वात लावून, त्यांची पूजा केली जाते. काही घरांमध्ये विविध प्रकारच्या पणत्या लावल्या जातात. घरातील महिला या पूजेत विशेष सहभाग घेतात. काही ठिकाणी कणकेचे "दिवे" केले जातात.
महाराष्ट्राच्या पारंपरिक कुटुंबव्यवस्थेत घरातील दैनंदिन धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याची जबाबदारी मोठ्या प्रमाणावर महिलांकडे होती. त्यामुळे दिव्याची अवस ही परंपरा स्त्रियांच्या सांस्कृतिक जीवनाशीही जोडली गेली.
घर स्वच्छ करणे, दिवे घासूनपुसून स्वच्छ करणे, तेल-वातीची व्यवस्था करणे, पूजा करणे आणि घरातील वातावरण मंगलमय ठेवणे—या सगळ्या गोष्टींमधून स्त्रीची घराच्या सांस्कृतिक जीवनातील भूमिका दिसून येते.
मात्र या परंपरेकडे केवळ ‘स्त्रियांनी करायचा धार्मिक विधी’ म्हणून पाहण्याऐवजी, तिच्यामागील व्यापक मूल्य समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. घरात प्रकाश, स्वच्छता, शिस्त आणि सकारात्मकता टिकवणे ही संपूर्ण कुटुंबाची सामूहिक जबाबदारी आहे.
दिवा आणि लक्ष्मी
भारतीय परंपरेत प्रकाशाचा संबंध समृद्धीशीही जोडला जातो. दिवा जिथे प्रज्वलित होतो तिथे मंगलता आणि सकारात्मक ऊर्जा नांदते, असा लोकविश्वास आहे.
लक्ष्मीपूजेतही दिव्याला महत्त्व आहे. दिवाळीमध्ये असंख्य दिवे लावण्याची परंपरा याच प्रतीकात्मकतेशी जोडलेली आहे. दिव्याची अवस आणि दिवाळी यांच्यातील साम्य येथे जाणवते—दोन्ही ठिकाणी प्रकाश हा मंगलतेचा केंद्रबिंदू आहे.
परंतु दिव्याची अवस ही दिवाळीपेक्षा वेगळी आहे. दिवाळी हा मोठ्या उत्सवाचा काळ आहे; तर दिव्याची अवस अधिक शांत, घरगुती आणि लोकपरंपरेशी निगडित स्वरूपाची आहे.
आधुनिक काळातील दिव्याची अवस : 'प्रकाशाची किंमत अंधारात कळते' हे आपल्याला दिव्याची अवस’ शिकवते.
आज आपण तेला-तुपाचा दिवा लावला नाही तरी या परंपरेचा अर्थ समजून घेऊ शकतो. घरातील प्रकाशव्यवस्था स्वच्छ ठेवणे, ऊर्जेचा योग्य वापर करणे, खोलीतून / घरातून बाहेर पडताना लाईट-फॅन बंद आहेत ना हे तपासणे पर्यावरणाचा विचार करणे आणि आपल्या जीवनात ‘प्रकाश" आणणाऱ्यांबाबत कृतज्ञ राहणे—या आधुनिक अर्थांनीही ही परंपरा पुढे नेता येऊ शकते.
दिवा सतत तेवत राहावा आणि त्या प्रकाशाबरोबर ज्ञान, विवेक, माणुसकी आणि आशाही तेवत राहावी—हीच ‘दिव्याची अवस’ या परंपरेची खरी शिकवण आहे, "गटारी अमावस्या" नव्हे !!.
ॲड. रोहित एरंडे ©
Comments
Post a Comment