उतारवयातील घटस्फोट, मग घराच्या हक्काचे काय ? - ॲड. रोहित एरंडे ©
डिव्होर्स नंतर संयुक्त मालकीच्या फ्लॅटची मालकी कोणाकडे ?
ॲड. रोहित एरंडे © #लोकमत
माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या नावावर एक फ्लॅट आहे , जो आम्ही दोघांनी संसाराची स्वप्ने रंगवून आपापली आयटी कंपनीमधील नोकरीतल्या पैशाने विकत घेतला होता. फ्लॅटवर नवऱ्याचे नाव पहिले आणि दुसरे माझे नाव आहे. मात्र आता वयाच्या पन्नाशीला आम्ही अखेरचा पर्याय म्हणून काही कारणांनी परस्पर संमतीने डिव्होर्स घ्यायचा ठरविला आहे. तर आता डिव्होर्स नंतर या फ्लॅटच्या मालकीचे काय होईल ? नवऱ्याला दुसरे लग्न लगेच करायचे आहे, तर याच्या दुसऱ्या बायकोला हक्क मिळेल का ?
एक वाचक ., पुणे.
कायदेशीर हक्कांबाबत बोलण्यापूर्वी काही गोष्टींबाबत बोलणे गरजेचे आहे. सध्या समाजाचे आणि त्यातही सुशिक्षित कटुंबांचे डिव्होर्स - घटस्फोट हे व्यवच्छेदक लक्षण म्हणावे लागेल एवढे हे प्रमाण वाढते आहे आणि ते चिंताजनक आहे. हळूहळू कुटुंब संस्था आपल्याकडे धोक्यात यायला लागली आहे. काल परवा पर्यंत दूरवर कोणाच्या तरी बाबतीत घडणारा डिव्होर्स हा त्याचे "टॅबू -पण" सोडून आपल्या दारापर्यंत कधी येऊन ठेपला हे बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे कोणाला कळलेच नाही. डिव्होर्सची करणे ही व्यक्ती प्रमाणे बदलत असतात आणि परस्पर संमतीने घेतल्या जाणाऱ्या डिव्होर्समध्ये तर खरी कारणे समोर येतातच असे नाही. तुम्ही म्हणालात तशी परिस्थिती "अचानकच" उद्भवते आणि आपल्याला सगळे चांगले आहे असे वाटत असले तरी प्रत्यक्षात तसे नसू शकते आणि मग कधीतरी, 'आयुष्यभर खुरडत रहायचे का मोकळे व्हायचे - Bad Marriage or a Divorce" हे ठरविण्याची वेळ येते. 'संसार म्हणजे तडजोड' हे मानणाऱ्या जुन्या पिढीला हे अतर्क्य वाटत असले तरी आता हे वास्तव मान्य करावे लागेल आणि यातून मानसिक त्रास खूप जास्त होतो त्यासाठी समुपदेशकांची, तज्ज्ञांची मदत घेणे इष्टच . असो.
विकत घेण्याऱ्याचे नाव करारात कितवे हे महत्वाचे नाही :
आपण एक लक्षात घ्यावे कि मोबदला कोणीही दिला असला तरी जेवढी नावे करारात नमूद असतात अश्या सर्वांना फ्लॅट मध्ये समान हक्क मिळतो आणि त्या सर्वांची नावे इंडेक्स-२ वर येतात, अपवाद म्हणजे जर कोणाला किती हक्क असे करारनाम्यामध्ये स्पष्टपणे नमूद केले असतील तर. त्यामुळे नाव पहिले असले म्हणून काही विशेष अधिकार नसतात. तसेच दुसरे नाव असलेली व्यक्ती मयत झाली किंवा दोघांचा डिव्होर्स झाला म्हणून नाव अश्या दुसऱ्या व्यक्तीचा हक्क आपोआप पहिले नाव असलेल्या व्यक्तीला मिळत नाही. तुम्ही नवरा बायको म्हणून एकत्र फ्लॅट घेतला तरी तुम्ही दोघे स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरीक आहेत आणि कायद्याने दोन स्वतंत्र व्यक्ती म्हणून तुम्ही करार करत असतात. आपल्या केसमध्येही दोघांच्या नावावर करारनामा असल्याने तुम्हा दोघांना समान आणि अविभक्त हक्क-अधिकार फ्लॅट मध्ये आहेत आणि केवळ डिव्होर्स झाला म्हणून एका फ्लॅटचे दोन स्वतंत्र फ्लॅट होणार नाहीत. आपल्या केसमध्ये परस्पर संमतीने डिव्होर्स घेणार असल्याने बऱ्याच गोष्टी सुकर होतील. तरीही डिव्होर्सच्या आधी सर्व अटी उदा. पोटगी ठरली असेल तर किती ? सोने -नाणे देणे घेणे, मुले असतील तर त्यांची जबाबदारी आणि खर्च आणि मिळकतींची विभागणी, कर्ज घेतले असेल तर त्याची फेड कशी करणार, या सर्व गोष्टी आधीच ठरवाव्या लागतात आणि त्यांचा उल्लेख डिव्होर्स पिटिशन मध्ये येतो. आता तुम्हाला हे ठरवावे लागेल की तुमच्यापैकी कोण हक्क सोडणार आणि हक्क सोडण्याच्या बदल्यात काही मोबदला घेणार का ? हे ठरवावे लागेल. डिव्होर्स होई पर्यंत तुम्ही दोघे नवरा -बायको असणार आहात त्यामुळे डिव्होर्स डिक्री व्हायच्या आधी तुम्ही एकमेकांच्या लाभात बक्षीस पत्र लिहून दिल्यास ते कमी स्टँम्प मध्ये होईल. बक्षीस पत्रासाठी नैसर्गिक प्रेम, आपुलकी हा मोबदला आहे असे लिहिण्याचा प्रघात असला तरी ती कायदेशीर गरज नाही. जर परस्पर संमतीने नसेल डिव्होर्स आणि विवादित डिव्होर्स झाला तर हिंदू विवाह कायद्याच्या कलम २७ अन्वये कौटुंबिक न्यायालयाला मिळकतींविषयी आदेश देण्याचे अधिकार आहेत.
एकदा डिव्होर्स झाला की दोघांनाही एकमेकांच्या प्रॉपर्टी मध्ये हक्क अधिकार उरणार नाही. जर का तुम्हाला मुले-बाळे असतील तर तुम्ही दोघे नवरा -बायको राहिले नाहीत तरी मुलांचे आई-वडील कायम राहाल आणि त्यामुळे मुलांना त्यांच्या आई-वडिलांच्या मिळकतीमध्ये हक्क अधिकार राहील, मात्र डिव्होर्सनंतर तुम्ही एकमेकांचे वारस राहणार नाहीत.
मात्र तुम्ही डिव्होर्स घ्यायच्या आधी फ्लॅट एका कोणाच्या नावावर केला नाहीत किंवा अजून एक ऑप्शन म्हणजे तिसऱ्या व्यक्तीला विकून पैसे वाटून घेतले नाहीत, तर जरी तुमचा डिव्होर्स झाला तरी तुम्ही आपापल्या अविभक्त हिश्श्याचे मालक म्हणून तसेच राहाल, कारण हा फ्लॅट काही विभागणी (पार्टीशन) होण्यायोग्य नाही. त्यामुळे तुमच्याकडे सध्या पर्याय काय आहेत - तर एकमेकांचा हिस्सा विकत घेणे /बक्षीस देणे आणि हे नाही जमले तर मृत्युपत्र करून ठेवणे. जर भविष्यात तुम्हाला कोणाला तुमचा हिस्सा विकायचा असेल तर दुसऱ्या हिस्सेदाराच्या संमतीशिवाय व्यवहार होणे अवघड आहे. त्यामुळे निर्णय लवकर घ्या. आणि शेवटी, तुमच्या नवऱ्याने जरी दुसरे लग्न केले तरी त्याच्या दुसऱ्या बायकोला केवळ अशा लग्न केले म्हणून फ्लॅटमध्ये कोणताही हक्क लगेच मिळणार नाही.
ॲड. रोहित एरंडे ©
Comments
Post a Comment