विमा रक्कम अपघात भरपाईमधून वजा करता येणार नाही : ॲड. रोहित एरंडे. ©

विमा रक्कम अपघात भरपाईमधून वजा करता  येणार नाही 

ॲड. रोहित एरंडे. ©

एखाद्या व्यक्तीला अपघात झाल्यानंतर त्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार, उपचारासाठी झालेला खर्च  विमा पॉलिसीतून  मिळविण्यासाठी  करणारी धडपड आणि कधी कधी   अपघात भरपाई मिळण्यासाठी कोर्टात माराव्या लागणाऱ्या चकरा अश्या दिव्यातून जावे लागते आणि ज्यांच्यावर दुर्दैवाने अशी वेळ असेल अशांनाच यातील वेदना समजतील..


तर मोटार अपघात भरपाई न्यायाधिकरण (MACT) कडून मिळणाऱ्या भरपाईतून आरोग्यविमा (Mediclaim )पॉलिसीमधून मिळालेली रक्कम वजा करता येईल का? असा महत्त्वपूर्ण प्रश्न नुकताच मा. सर्वोच्च न्यायालायने निकालात काढला. 


या केसची थोडक्यात पार्श्वभूमी बघू यात. अपघात झाल्यानंतर "अ " व्यक्तीने   MACT समोर नुकसानभरपाईसाठी दावा दाखल केला. त्या दाव्यात उत्पन्नात झालेले  नुकसान, भविष्यातील उत्पन्नाच्या संधींचे नुकसान, विशेष आहार, प्रवास खर्च तसेच वैद्यकीय खर्च यांसारख्या बाबींचा समावेश करण्यात आला होता. मात्र त्याच वेळी, याच वैद्यकीय खर्चांसाठी वैद्यकीय विमा (Mediclaim Insurance) अंतर्गत विमा कंपनीकडे क्लेम  सादर करण्यात आला आणि त्या क्लेमची  रक्कमही त्या व्यक्तीस  प्राप्त झाली. मात्र मुंबई  उच्च न्यायालयात   हे प्रकरण आले. परंतु  त्यावेळी  मुंबई उच्च न्यायालयाचेच  परस्परविरोधी निकाल असल्याचे निदर्शनास आल्यामुळे प्रकरण ३ सदस्यीय पूर्ण पीठाकडे गेले आणि अखेर पूर्ण पीठाने अशी रक्कम वळती करता येणार नाही असा निकाल दिला आणि प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचले 

 

या प्रश्नावर विविध उच्च न्यायालयांच्या वेगवेगळ्या खंडपीठांनी  दिलेल्या  परस्पर विरोधी निकालांची यादीच  सर्वोच्च न्यायालायने निकालात उद्धृत करताना या महत्वाच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उत्तर देण्याची आता वेळ आली आहे असे न्या. संजय करोल आणि न्या. विपुल पांचोली  यांच्या खंडपीठाने नमूद केले आहे. 

विमा कंपनीने असा युक्तिवाद केला की या दोन्ही रकमा   मिळणे म्हणजे तक्रारदाराचा “दुहेरी फायदा” (double benefit) आहे, तर विमा रक्कम मिळणे आणि कायदेशीर हक्क म्हणून MACT मधून नुकसानभरपाई मिळणे  या  स्वतंत्र गोष्टी असून त्याचा "सेट-ऑफ" घेता येणार नाही, असा युक्तिवाद तक्रारदारातर्फे करण्यात आला. 

अखेर दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून आणि पूर्वीच्या निकालांचा उहापोह करून सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे निकाल दिला की मेडिक्लेम  मधून मिळालेली रक्कम MACT  भरपाईतून वजा करता येणार नाही.  सर्वोच्च न्यायालयाने पुढे या दोन्ही मधील फरक स्पष्ट  करताना नमूद केले की मोटार वाहन कायद्यासारख्या सामाजिक कायद्याखाली (MACT ) मिळणारी वैधानिक  भरपाई, आणि मेडिक्लेम  पॉलिसीसारख्या एका करारामधून  मिळणारा कराराधिष्ठित लाभ हे दोन्ही स्वतंत्र आहेत आणि एकमेकांवर अवलंबून नाहीत.   अपघातामुळेनिर्माण होणारी   कायदेशीर भरपाई   MACT मधून मिळते तर वर्षानुवर्षे प्रिमिअम भरून घेतलेला मेडिक्लेम हा एक कायदेशीर  करार असतो,    सबब  म्हणून या दोन्ही लाभांचे स्वरूप वेगळे आहे. 

एखादी  व्यक्ती स्वतःच्या पैशातून आर्थिक संरक्षणाचा उपाय म्हणून मेडिक्लेम पोलीस विकत घेते, वर्षांनुवर्षे त्याचे प्रिमिअम भरते आणि त्यामुळे अशा व्यक्तीस वेळ आल्यावर अश्या पॉलिसीचे पैसे मिळणे गरजेचे आहे आणि अशी रक्कम हा काही "दुहेरी फायदा" होत नाही आणि  जर MACT भरपाईतून मेडिक्लेमची रक्कम वजा केली, तर दोषी  वाहनचालकाला ज्याच्यामुळे अपघात झालं आहे किंवा विमा कंपनीला ज्यांनी प्रिमिअम स्वीकरला आहे त्यांना अनुचित फायदा होईल.

न्यायालयाने पुढे नमूद केले की एकाच कारणासाठी दोनवेळा नुकसान   भरपाई  मिळणे  चुकीचे आहे परंतु जेव्हा दोन्ही कारणांचा पायाच वेगळा असेल तेव्हा हा नियम लावता येणार नाही. दुसरे उदाहरण द्यायचे झाल्यास वेगवेगळ्या कायद्यांखाली पत्नीला पोटगी मागण्याचा हक्क असला तरी एका कायद्याखाली पोटगी दिल्यास त्याचा विचार (set off )दुसऱ्या कायद्याखाली पोटगी देताना  करतात (संदर्भ : रजनीश वि. नेहा, २०२० सुप्रीम कोर्ट) . 

न्यायालयाने पुढे उदाहरण दिले समजा एवढ्या व्यक्तीचे अपघाती निधन झाले तर त्याला मिळणाऱ्या  पेन्शन, ग्रॅच्युटी, प्रोव्हिडंड फंड या  रकमा त्या व्यक्तीचे  निधन झाल्यास मिळत असल्याने आणि अशा रकमा या नुकसानभरपाई  नसून Entitlement earned over time' म्हणजेच "ठराविक  अनुभवानुसार मिळणारा अधिकार" असल्याने  या रकमा देखील MACT  कडून मिळणाऱ्या भरपाईतून वजा करता येणार नाही.  

 

अशा रितीने विमा कंपनीचे अपील फेटाळण्यात आले आणि   पुढील निर्णयासाठी उच्च न्यायालयाकडे परत पाठविण्यात आले.  या निर्णयाचा फायदा अनेक पिडीत लोकांना होणार आहे यात शंका नाही. 

(संदर्भ : न्यू इंडिया अशुरन्स कंपनी लि. वि. डॉली सतीश गांधी - एस.एल.पी. १८२६७/२०२५, निकाल : १५ मे २०२६)

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©