इच्छापत्र आणि वैद्यकीय इच्छापत्र -वेगवेगळे, पण महत्वाचे.. ॲड. रोहित एरंडे © #लोकमत
इच्छापत्र आणि वैद्यकीय इच्छापत्र -वेगवेगळे, पण महत्वाचे..
ॲड. रोहित एरंडे ©
सर, मी आणि माझी पत्नी आता ७५-७० वर्षांचे आहोत आणि आम्हाला आमच्या प्रॉपर्टी साठी मृत्यूपत्र करायचे आहे. त्याचप्रमाणे म्हातारपणी मृत्यू सुकर व्हावा त्याचेही वेगळे मृत्युपत्र करता येते असे वाचले. कृपया याबाबत माहिती द्यावी.
एक वाचक, नागपूर.
इच्छापत्र (will ) करायची इच्छा हळू हळू लोकांमध्ये वाढीस लागल्याची दिसून येत आहे. त्याचबरोबर सध्या वैद्यकीय इच्छापत्राबद्दल पण "बेबी स्टेप्स" म्हणतो तसे लोकं विचारायला लागली आहेत, याचे तुमचा प्रश्न द्योतक आहे. दोन्ही इच्छापत्रे ही एकच असतात का वेगवेगळी असतात, ती कधी करायची ? या बाबत तुमच्यासारखाच लोकांच्या मनात संभ्रम दिसून येतो.
तरी या लेखाच्या माध्यमातून आपण या दोन्ही इच्छापत्रांबद्दल थोडक्यात माहिती घेऊ.
" जिवासवे जन्मे मृत्यु जोड जन्मजात, दिसे भासते ते सारे विश्व नाशवंत ". गदिमांनी अतिशय सोप्या आणि भावपूर्ण शब्दांत वास्तव मांडले आहे. मृत्यु निश्चित असला तरी त्याची वेळ सर्वात अनिश्चित असते हे आपल्याला कळत असले तरी वळतेच असे नाही. आपल्या माघारी आपण कष्टाने मिळविलेल्या मिळकतीचे विभाजन आपल्या वारसांमध्ये सुकर आणि विना तंटा व्हावे म्हणून मृत्यूपत्रासारखा ज्यालाच इच्छापत्र - Will असेही म्हणतात, दुसरा सोपा आणि सोयीस्कर दस्त नाही. तर, दुसरीकडे मृत्यू जरी चुकविता येणार नसला तरी त्यापूर्वीचे शरीराचे "हाल" चुकविता येण्यासाठी लिव्हिंग विल - ऍडव्हान्स डायरेक्टिव्ह हे "आयुष्याचा सुखान्त" होण्याच्या दृष्टीने उचलता येणारे एक पाऊल आहे. दोन्ही इच्छापत्रे महत्वाची असली तरी ती पूर्णपणे वेगवेगळी आहेत, त्यांचे कायदे वेगवेगळे आहेत,
मृत्युपत्र :
वयाने सज्ञान आणि ज्याचे मानसिक संतुलन उत्तम आहे अशी कोणतीही व्यक्ती तिच्या स्वकष्टार्जित मिळकतीसाठी आणि वडिलोपार्जित मिळकतीमधील अविभाज्य हिस्श्यासाठी मृत्युपत्र लिहून ठेवू शकते. मृत्यू काही फक्त म्हातारपणीच येत नाही आणि मृत्युपत्र करण्याचा कोणताही मुहूर्त पंचागात नाही त्यामुळे योग्य दिवस "आजच" असे आम्ही सांगतो. मृत्युपत्र लिखित आणि स्पष्ट शब्दांत असणे गरजेचे असते. आपल्या मृत्युपश्चात मिळकतीचे विभाजन करताना समजा लाभार्थीच आधी मयत झाला तर "प्लॅन बी " कायम लिहून ठेवावा आणि कोणाला काय द्यायचे याच बरोबर कोणाला का नाही द्यायचे हेही लिहून ठेवावे. त्यावर मृत्यूपत्र करणाऱ्याबरोबरच दोन सज्ञान आणि सूज्ञ साक्षीदारांनी (लाभार्थी वगळता) सही करणे अत्यंत गरजेचे असते. मृत्यूपत्रासाठी स्टँम्प ड्युटी लागत नाही, त्याचे रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य नसले तरी प्रॅक्टिकली जरूर करावेच . डॉक्टर प्रमाणपत्र घेणेही उपयुक्त ठरते. मृत्यूपत्र कितीही वेळा बदलता येते आणि सर्वात शेवटचे मृत्युपत्र ग्राह्य धरले जाते. आता नवीन कायद्याप्रमाणे मृत्युपत्राचे प्रोबेट घेण्याची १९२५ सालच्या कायद्यातील सक्ती मोदी सरकारने डिसेंबर २०२५ मध्ये जे काही जुने कायदे रद्द केले त्यात काढून टाकली आहे. मृत्युपत्राची अंमलबजावणी ही ते करणाऱ्याच्या मृत्यूनंतरच होते.
लिव्हिंग विल : Living Will -
बरेचदा लोकं मृत्युपत्रामध्ये मला कुठे उपचार द्यावेत/ देऊ नयेत, अंत्यसंस्कार करावेत /करू नये असे लिहून ठेवतात. असे लिहिणे काही उपयोगाचे नाही, कारण आपल्याकडे माणूस गेल्यावर आधी त्याचे अंत्यसंस्कार होतात आणि मग त्याने मृत्युपत्र केले आहे किंवा असे याचा धांडोळा नातेवाईक घेतात. . त्यामुळे उपचार करावे किंवा नाही हे मृत्यूपत्रात लिहून उपयोगी नाही त्यासाठी वैद्यकीय इच्छापत्र महत्वाचे आहे.
आपल्या प्रत्येकाची इच्छा असते की , हॉस्पिटल मध्ये शुद्ध हरपलेल्या अवस्थेत, शरीरात नळ्या घालून खितपत न पडता कोणालाही त्रास न होता अगदी सहज मरण यावे,. पण आपल्या इच्छेप्रमाणे रेडीओवर गाणी लागणे जिथे सोपे नाही तिथे असे सहज मरण येईलच असे नाही . आपला रुग्ण बरा होण्यासाठी जवळची लोकं वेळ, पैसे आणि मानसिक शांतता खर्च झाली तरी जेवढे शक्य होईल तेवढे उपाय करीत असतात . तसेच प्रत्येकवेळेला नळ्या घातल्या म्हणजे माणूस चालला असे अजिबात नसते डॉक्टर पराकाष्ठा करत असतातच आणि रोगी बरा सुद्धा होतो. मात्र असाध्य /बरे न होणाऱ्या आजारासाठी व्हेंटिलेटर सारख्या जीवन समर्थन प्रणालीवर उपचार कितीवेळ चालू ठेवावेत असा विचार संबंधितांच्या मनात येतोच.
मात्र अश्या असाध्य / -बऱ्या (Terminally ill ) न होणाऱ्या आजारांमध्ये, विशिष्ट परिस्थितीमध्ये उपचार कुठपर्यंत करावेत आणि कधी थांबवावेत हे ठरविणे मात्र आता शक्य आहे जेणेकरून पेशंटही खितपत पडणार नाही आणि घरच्यांचे आर्थिक, शारीरिक आणि मानसिक कष्ट वाचतील आणि यासाठी LIVING WILL -लिव्हिंग विल किंवा ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये Advance Directives - आगाऊ निर्देश हा पर्याय आता उपलब्ध झाला आहे. "सन्मानाने जगण्याच्या हक्कामध्ये सन्मानाने मरण्याचाही हक्क आहे", हे तत्त्व सर्वोच्च न्यायालयाने २०११ मध्ये अरुणा शानबाग केसमध्ये मान्य केले आणि हळू हळू न्यायालयांचाही दृष्टीकोन बदलत जाऊन अखेर २०२३ मध्ये लिव्हिंग विल विषयीच्या विस्तृत आणि सुधारीत नियमावली सर्वोच्च न्यायालायने इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिन यांनी दाखल केलेल्या याचिकेत (त्याबद्दल न्यायालयाचे आणि डॉक्टर संघटनेचे अनेक आभार) घालून दिली.
कोणत्याही सज्ञान आणि ज्याचे मानसिक स्वास्थ्य ढळलेले नाही अशी व्यक्ती लिव्हिंग विल करू शकते ज्याला Executor - एक्झिक्युटर - निष्पादक म्हणून संबोधले जाते. ह्या विलमध्ये एक्झिक्युटरने त्याच्याबाबतीत वैद्कयीय उपचार हे कोणत्या विशिष्ट परिस्थितीमध्ये कुठपर्यंत करावेत आणि कधी थांबवावेत, हे स्पष्टपणे लिहिलेले असते. तसेच अवयवदान करण्यासंदर्भातील सूचनाही लिहून ठेवता येतात. मिळकतीच्या मृत्युपत्राप्रमाणेच एक्झिक्युटर ने लिव्हिंग विलवरती देखील कोणत्याही २ स्वतंत्र सज्ञान साक्षीदारांसमोर सह्या करणे गरजेचे आहे आणि लिव्हिंग विल आता नोटरी समोर साक्षांकित (attest )करावे लागते, या इच्छापत्रालाही स्टँम्प ड्युटी लागत नाही, त्याचे रजिस्ट्रेशन करावे लागत नाही. मात्र असे लिव्हिंग विल हे एक्झिक्युटरने स्वेच्छेने विना दबाव अंमलात आणले आहे अशी नोंद नोटरी आणि साक्षीदार यांनी करण्याची आहे. या विलची एक प्रत आपल्या डॉक्टरांकडे, महानगरपालिकेने नेमलेल्या नोडल ऑफिसरकडे देता येते.
समजा एक्झिक्युटर निर्णय घेण्याच्या परिस्थितीत नसेल त्यावेळी त्याच्यावतीने असे निर्णय घेण्यासाठी एकापेक्षा जास्त व्यक्तींना गार्डियन म्हणून नेमता येते. अर्थात लिव्हिंग विल म्हणजे दयामरण नाही की जिथे डॉक्टर मरण येण्यासाठी एखादे इंजेक्शन देतात किंवा व्हेंटीलेटर बंद करतात. त्यामुळे हा एक गैरसमज काढावा. अद्याप आपल्याकडे कशी पाश्चात्य देशांमध्ये आहे तसे दयामरण मिळण्याचा हक्क उपलब्ध नाही. कदाचित काळाच्या ओघात येईलही.. असो.
लिव्हिंग विल मध्ये सर्वात मोठी आणि जोखमीची जबाबदरी डॉक्टरांवर आहे आणि उगाच छोट्या छोट्या आजारांसाठी लिव्हिंग विल नाही हेही लक्षात घ्यावे.
मात्र लिव्हिंग विल केले म्हणजे डॉक्टर मृत्यू यायचे एखादे इंजेक्शन देतील किंवा आपण लिहून ठेवले म्हणून डॉक्टर व्हेंटीलेटरचे बटण बंद करतील, असे लिव्हिंग विल मध्ये होत नाही हेही लक्षात घ्यावे, लिव्हिंग विल अंमलात येण्यासाठी अजूनतरी पेशंट हॉस्पिटलमध्ये दाखल असणे गरजेचे असते आणि तेसुद्धा जेव्हा तज्ञ डॉक्टरांच्या प्रायमरी आणि सेकंडरी समितीची खात्री पटली तरच लिव्हिंग विलची अंमलबजावणी होऊ शकते. या समित्यांमध्ये कोणाचा समावेश असेल याचा अध्यादेश महाराष्ट्र सरकारने १७ जुलै २०२६ रोजी काढला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे अखेरचा निर्णय हा गार्डियन व्यक्तींच्या लेखी संमतीसह JMFC कोर्टाला कळविणे गरजेचे आहे आणि JMFC कोर्टाने पुढे उच्च न्यायालयाला कळविणे गरजेचे आहे. मात्र अजूनही लिव्हिंग विल बाबत म्हणावी तशी जनजागृती किंवा "system " तयार झालेली दिसून येत नाही. अजूनही सामान्य लोकांमध्येच काय तर डॉक्टरांमध्येही अधिक जागरूकता वाढवणे महत्त्वाचे आहे असे दिसून येते.
लिहिणे सोपे असले तरी प्रत्यक्षात उपचार थांबविणे हा निर्णय रुग्णांसाठी आणि प्रियजनांसाठी नक्कीच कठीण असतो आणि त्यामुळे मला असे वाटते की प्रथम कुटुंबातील सदस्यांशी या बद्दल मोकळेपणाने बोलले पाहिजे !
मृत्यूपत्राचा कायदा येऊन १०० वर्षे झाली, तरी अजूनही लोक मृत्युपत्र करायला कचरतात. त्या तुलनेने लिव्हिंग विलचा कायदा खूपच नवीन कायदा आहे पण "सुखान्त" व्हावा असे वाटत असेल एक प्रयत्न म्हणून तर आत्ताच आपण चांगले, धडधाकट असताना लिव्हिंग विल करून ठेवा.
ॲड. रोहित एरंडे ©
Comments
Post a Comment